राज्यात पल्स पोलिओ मोहीमेला धक्का, २ घटनांनी महाराष्ट्र हादरला
भंडाऱ्यातील हॉस्पिटलमधील आगीची घटना ताजी असताना असाच हलगर्जीपणाचा प्रकार पल्स पोलीओ मोहिमे दरम्यान राज्यात दोन ठिकाणी घडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.;
यवतमाळ/पंढरपूर : पोलीओ निर्मुलनासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहीमेला राज्यात दोन ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील आरोग्य केंद्रात १२ लहान मुलांना पोलिओचा डोस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या कापसी (कोपरी)येथे पोलिओ लसीकरण मोहीमे दरम्यान ही घटना घडली आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जिवावर उठला असून याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे. तर जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
डोस देताना बाळाच्या पोटात प्लास्टिकचा तुकडा गेला
तर दुसरी धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा सूक्ष्म तुकडा गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पंढरपूर येथील प्राथमिक भाळवणी आरोग्य केंद्रात रविवारी पोलिओ लसीकरणा दरम्यान हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. लस देताना वैद्यकीय केंद्रातील एक महिला लांबूनच बाळांच्या तोंडात लस टाकत होती. अशीच बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच ड्रॉपरचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेले. हा प्रकार येथील वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर बाळाला तिथल्या शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी पाठवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकाराला येथील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी, अन्यथा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही सामाजिक संघटनांनी दिला आहे.