यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले...! काय म्हणाल्या? वाचा

महिला व बालकल्याण मंत्र्यांना डावलून राज्याचे महिला धोरण आंमलात आणणाऱ्या महायुती सरकारवर यशोमती ठाकूर यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.;

Update: 2024-03-08 11:24 GMT

राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभाग मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या एक्स हँडल वरून पोस्ट लिहीत महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महिला व बालकल्याण मंत्र्यांना डावलून राज्याचे महिला धोरण अंमलात आणण्याची घोषणा करणाऱ्या महायुती सरकारला म्हणावं तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चौथे महिला धोरण आणण्याची त्यांनी संकल्पना मांडली आणि त्याचं १०० टक्के काम ही पूर्ण झाले, मात्र; LGBTQIA+ समुदायाला वगळून हे धोरण अंमलात आणायला पाहिजे अशी मागणी झाली आणि हे धोरण रखडले, त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे धोरण अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र धोरण अंमलबजावणीची घोषणा करताना या धोरणासाठी काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींचा सरकारला विसर पडला, असं ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, या धोरणात त्यांना काहीही नाविण्य दिसले नाही, असंही त्या म्हणाल्या. केवळ महिला धोरण जाहीर करायचे आहे, म्हणून सरकार राबवत असलेल्या योजनांनचाच उल्लेख या धोरणात पुन्हा एकदा केल्याचे दिसते आहे. महिला आणि समाजातील अन्य घटकांचा जो सर्वसमावेशक विचार होणे गरजेचे होते त्याचा यात पत्ता नाही. त्यामुळे हेच सरकारला द्यायते होते, तर गेले सव्वा वर्षे मसुदा तयार करण्यात का वाया घालवली? असा परखड सवाल त्यांनी केला.

महिला सुरक्षेबाबत कोणतीही ठोस भूमिका या धोरणात नाही, महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणतेही नव्या उपाययोजना नाहीत. इतकेच काय महिलांचा मूलभूत अधिकार असलेल्या शौचालयाच्या समस्येलाही यात स्थान नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या व्यापक विचारांची छाप असलेले धोरण तयार केल्याचा आनंद व्यक्त करत समस्त महिलांना "जागतिक महिला दिनाच्या" मनापासून शुभेच्छा दिल्या.


Similar News