‘“बहूँ नही, बेटी पढाओ” या Twitter trend चं करायचं काय ?
आपल्या पतीला जातीयवाचक बोलताना ज्योती मोर्या यांचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओने जातीव्यवस्थेची मानसिकता ज्या पध्दतीने समोर आली त्याच पध्दतीने महिलांच्या शिक्षणाचा मुद्दा देखील समोर आला. या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांचा लेख
ज्योती मोर्या यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरला नी त्यानंतर ‘“बहूँ नही, बेटी पढाओ” हा ट्रेण्ड सुरु झाला. या प्रकरणाच्या मेरीट मध्ये मला जायचं नाही, पण या निमित्ताने सुरू झालेल्या या ट्रेंड चा आपण परामर्श घेऊयात. केवळ एका महिलेच्या व्हिडीओ नंतर सगळ्याच महिलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घ्या, अशी मतं राजरोस पणे सोशल मिडीयावर व्यक्त केली गेली. हा व्हिडीओ तत्कालीक कारण ठरला असला तरी, या मागची खोलवर रूजलेली मानसिकता ही महिलांच्या शोषणाच्या कारणांच मूळ सांगणारी आहे. दर्शना पवारची हत्या ही याच मानसिकतेतून झालेली आहे. लेशपाल सारखे काही थोडके पुरुष या मानसिकतेचे बळी ठरत नाही.
शेवटी कुटुंब आणि कुठलंही नातं हे जर आपल्याला टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये दोघांच्याही सामंज्यस्याचा करार हे फार गरजेचं असतं आणि सामंज्यस्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केवळ सून नाही तर यात सर्व कुटुंबाचा सहभाग तितकाच महत्वपूर्ण असतो. नवरा बायकोच्या नात्यात फायदा-नुकसानीचा किंवा वरचढपणाचा भाव निर्माण झाला तर नात्यात कटूता येते. अशा नात्यांमध्ये गुंतवणूकीचाच मुद्दा असेल तर तो भावनिक, आर्थिक, सामाजिक स्वरूपाचा असावा. तो व्यावसायिक असेल तर अनेक धोके निर्माण होतात.
जेव्हा नवरा-बायको दोघंही नोकरी करत असतील तर त्यावेळेला एक परिवर्तनाची सुद्धा गुंतवणूक गरजेची आहे. शेवटी माणूस हा समाजशील प्राणी आहे. सामाजिक स्तरावरती वावरत असताना परिवर्तनाची गुंतवणूक नसेल तर अनेकदा संवाद खुंटून स्पर्धा किंवा कटूता निर्माण होऊ शकते . याबाबतचा संवाद हा घरात-कुटुंबात पहिल्यापासून असायला हवा.
पुरुषप्रधान संस्कृती असलेला हा देश असला तरी तो आता स्त्रीप्रधानतेकडे न जाता त्याची वाटचाल समानतेकडे झाली पाहिजे. मात्र बाई शिकलीये आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि समजा तिचे कुणासोबत संबंध निर्माण झाले तर आपला तिच्यावरचा मालकी हक्क जो आहे, तो आता संपुष्टात येतोय की काय? ही भीती या प्रकरणामुळे अनेक पुरुषांना वाटू लागली आहे. स्त्री घरातून बाहेर पडली, सहकारी पुरुषांसोबत बोलू लागली म्हणजे तिचं अफेअर सुरू झालं अशा साशंकतेतूनही अनेक महिलांच्या करिअर ला ब्रेक लावण्याचे प्रकार झाले आहेत.
खासकरून उत्तर भारतामध्ये हा trend सुरू झालेला आहे. कुणाची बायको जर शिकायला गेली असेल तर आता त्या व्यक्तीकडे संशयाने पाहिलं जातंय. त्याला बोललं जातंय की, तुझी बायको शिकायला पाठवली आहेस तेव्हा ‘madam’ सारखं करून बसेल आणि तुझं काहीच होणार नाही. या भीतीमुळे आता इतर महिलांनाही त्यांचे हक्क नाकारले जातात. आत्तापर्यंत त्र्याण्णव पुरुषांनी आपल्या बायकांना अर्धवट शिक्षण सोडून तू घरी बस, मला तुला त्या madam बनवायचं नाहीये. अशी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.
लग्नानंतर महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे अनेक पुरुष तर संशयाने इतके ग्रासले आहेत की आता ते आपल्या बायकांकडून लिहून घेऊ लागलेले आहेत की, तुला उद्या चांगली नोकरी लागली आणि तू कोणाच्या प्रेमात पडली किंवा मला जर सोडून दिलंस, तर त्या बदल्यात तू मला काय देशील? काही पुरुष तर बायकांना तू शिकू नकोस तू घरातच ठीक आहे मी कमवतो तुला शिकायची गरज नाही असं सांगायला लागले आहेत. ही मानसिकता पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे. मुळात महिलांना शिक्षणाची परवानगी घेण्याची गरज का लागावी हा मोठा प्रश्न आहे. अजूनही समाजात ही मालकीची भावना कमी होताना दिसत नाही.
एक महिला शिकली, कमावती झाली की त्या घराची दशा बदलते. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतात. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतात. बचत करतात. एखाद्या कमावत्या महिलेचा पगार हा तिच्या कुटुंबाच्या कल्याणासाठीच वापरला जातो. अनेकदा तर कमावत्या महिलेच्या पैशावर सत्ता आणि सुख उपभोगताना आपण अनेक पुरुषांना पाहिलंय.
आपल्या कुटु्बाच्या उन्नतीसाठी महिलांची अधिक श्रम घेण्याची तयारी असते. हे सर्व करण्यासाठी वारंवार घरच्यांची परवानगी मात्र तिला घ्यावी लागते,आणि अटी-शर्थींसह तिला ती मिळते. घरचं करुन बाकी करायचे, तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही इ. इ. कानावर सर्रास पडणारी वाक्यं म्हणजे या अटींचेच उदाहरण आहे. स्त्री ला एका चौकटीत स्वातंत्र्य द्यायचं आणि या चौकटीला जरा धक्का लागला तर गहजब करायचा अशी समाजाची रीत आहे. अगदी तंत्रज्ञानाच्या युगातही ही मानसिकता असल्याने पुरुष घाबरतात नी धडाधड बाहेर पडून ट्वीटर ट्रेंड सुरू करतात. या घाबरलेल्या-भेदरलेल्या पुरुषांपासून समाजाला खरा धोका आहे.