लग्न ही माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गनिर्मित नाही. त्यामुळे या व्यवस्थेशी जमवून घेण्यासाठी प्रत्येकाला काही ठराविक कालावधी लागतो. काहींना कमी तर काहींना जास्त कालावधीची गरज भासते आणि ते व्यक्तीसापेक्ष आहे. अशा वेळी पहिले लग्न असफल ठरले तर दुसऱ्या लग्नात त्याचे पडसाद कमी अधिक प्रमाणात उमटतातच. पहिल्या लग्नाच्या असफलतेची कारणं किंवा त्याचे प्रतिबिंब घेऊन दुसरे लग्न सफल होत नाही. हे खरे असले तरी पहिल्या असफल ठरलेल्या लग्नाचे परिणाम मनावर खोलवर जखम करून गेलेले असतात. अनेकदा ही जखम दुसऱ्या लग्नाने आधी चिघळते आणि मग जसजसा काळ जातो तसतशी ती जखम कोरडी होत जाते.
हळूहळू आदितीही मोकळी होत होती. “कसा आहे ओंकार?” हा माझा प्रश्न ऐकताच आदिती अचानक काहीशी गंभीर झाली. “सगळं ठीक आहे ना?” अस विचारताच काहीशी कावरी बावरी होत उत्तरली “हो सगळं ठीक आहे. खरं तर मला माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. नक्की काय ते मलाही कळत नाहीये. मला ओंकार खूप चांगला वाटतो; पण एक भिती सतत वाटत राहते. आम्ही दोघे जवळ आलो तर, परत मागच्यासारखं सगळं सुरू होईल, असं वाटतं. या भीतीपोटी मी त्याच्याशी नीट बोलूही शकत नाही. माझा पहिला नवराही लग्न झालं, तेव्हा खूप काळजी घ्यायचा; अगदी ओंकारसारखीच! पण रात्र नको वाटायची. ते किळसवाणे प्रकार आणि नंतर नंतर तर मी नाही म्हटलं की रात्रीतून होणारी ती मारहाण, अजूनही आठवते मला. ओंकार अनेकदा मनमोकळेपणाने बोलतो माझ्याशी, पण मला नाही त्याच्याशी बोलता येत. सुरवातीला ओंकारने प्रयत्न केला माझ्याजवळ येण्याचा! पण मी अवघडलेली वाटले की तो स्वतःहून दूर होई. तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा सांग, मला घाई नाही, असं तो म्हणाला. त्याला काय सांगू आणि कसं, तेच कळत नाहीये." शेवटचं वाक्य बोलता बोलता तिला रडूच कोसळलं.
पहिल्या लग्नापेक्षा दुसऱ्या लग्नात जुळवून घेताना अनंत अडचणी येतात. या अडचणी केवळ उभयतांनीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने समजून घेणे गरजेचे असते. दुसऱ्या लग्नात शारीरिक ओढ तुलनेने कमी असते, मात्र होरपळलेलं मन प्रेमाच्या सहवासासाठी आसुसलेलं असतं. त्यासाठी एकमेकांना समजून घेणं आवश्यक असतं. या साऱ्यांना पुरेसा अवधी देणं गरजेचं असतं. अनेकदा कौटुंबिक दबावाखाली येऊन अथवा आपल्या अपत्याला पूर्ण कुटुंबाचे सुख मिळावे, या हेतूने दुसरे लग्न केले जाते. यात काहीही गैर नाही; मात्र, लग्नाचा पूर्णतः उद्देशच वेगळा असल्याने दांपत्याला भावनिक आणि त्या बरोबरीने शारीरिक जवळीक साधण्यासाठी वेळ लागतो. प्रापंचिक इतर जबाबदाऱ्यांसोबत इतर अनेक ओझी या वेळेस ते वागवत असतात. याची जाणीव कुटुंबातील इतर सदस्यांनी ठेवायला हवी. केवळ लग्न झाले म्हणून उभयतांनी एकमेकांत लगेच रमायला हवे, ही अपेक्षाच मुळात चुकीची ठरते. पहिल्या लग्नाप्रमाणे दुसऱ्या लग्नातील आपल्या जोडीदाराविषयी तितक्यात उत्कट भावना असतीलच, असे नाही. किंबहुना, त्या कमीच असतील कारण प्राधान्य आणि अनुभव या दोहोंचीही सांगड घालून दुसऱ्या लग्नाची मानसिक तयारी वधू-वरांनी केलेली असते.
विवाह असफल होणे म्हणजे काही पाप झाले आहे, अशा भावनेनेच समाज घटस्फोटितांकडे पाहतो. त्यामुळे या धक्क्यातून सावरणंच मुळी घटस्फोटितांना कठीण जातं. मग दुसऱ्या लग्नाचा विचार हा जोडीदार हवा, यापेक्षाही इतर काही गरजांना डोळ्यांसमोर ठेवून केला जातो. आपल्याकडे लग्नापूर्वी समुपदेशन खूप कमी जण करून घेतात, त्यात दुसऱ्या लग्नाच्या वेळेस वास्तविक समुपदेशनाची नितांत गरज असते; मात्र त्याकडे काणाडोळा केला जातो. एक जखम भरून निघून त्यावर हळूवार फुंकर कशी घालायची आणि आपल्या जखमेबरोबरच नवीन जोडीदाराच्या मनावर झालेल्या आघातांची तीव्रता कशी कमी करायची, याचे मार्गदर्शन निश्चितच गरजेचे आहे.
ओंकारला आदितीबद्दल जेव्हा सांगितलं, तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं. आदितीच्या या दुःखात तो पहिल्या बायकोचा अकस्मात झालेला मृत्यू विसरून गेला. आपल्याला काही काळ का असेना, पण प्रेमाचा सहवास मिळाला, आदितीला माणूस मिळूनही प्रेम मिळू शकलं नाही; तर, उलट तिला त्या प्रेमाच्या जागी हिंसेलाच बळी पडावं लागलं. हे सत्य स्वीकारताना त्याला अतिशय त्रास झाला. मात्र आपण तिला प्रेम देऊन तिची कमी भरून काढू शकतो, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने त्याच्या प्रयत्नांत काही कसूर बाकी ठेवली नाही. ओंकारने दिलेली माया आणि प्रेम यामुळे आदिती आता सावरली. आपण असा काही विचार करत होतो हे आठवले तरी, हमसून हमसून रडणारी आदिती, आता खळखळून हसते. तिचं हे हसू पाहून सर्व घरच आनंदात नहातं.
प्रियदर्शिनी हिंगे