महाराष्ट्रात चाललीय ‘दंगल’

Update: 2017-07-29 05:57 GMT

साधारण चौदा-पंधराच्या दोघी जणी मॅटवर उभ्या... पंचांनी शिट्टी वाजवताच वॉर्मअप करत सज्ज... एकमेकींचा अदमास घेणाऱ्या... एका हातानं प्रतिकार, दुसऱ्या हातानं हल्ला असा खेळ सुरू झाला. कधी हिचं आक्रमण तर कधी तिचं, दोघी एकमेकींना झुंजवू लागल्या. एकीनं खेळ आक्रमक केला तशी कुस्तीला गती आली. तिनं प्रतिस्पर्धी खेळाडूचं डोकं धरून तिला खाली पाडायचा प्रयत्न केला त्याचक्षणी प्रतिस्पर्धीनंही चपळाई दाखवली. हिला काही कळायच्या आत तिचा हात धरला आणि एकामागून झपाट्याच्या हालचाली करत तिच्या दोन पायांत मुंडकं घालून तिला सफाईनं खाली पाडलं. दोन्ही खांदे मॅटला लावून तिला चित केलं. चित करणाऱ्या कुस्तीगीरच्या खात्यात एक गुण जमा!

हळूहळू कुस्तीचा डाव रंगू लागला. कधी चाल, प्रतिचाल, आक्रमण- प्रतिकार करत दोघी एकमेकींना चांगली झुंज देत राहिल्या... हा दंगल सिनेमाचा सीन नाही. पुण्यापासून 25 किमी अंतरावर असणाऱ्या आळंदीमध्ये जोग महाराज व्यायामशाळेत सकाळच्या वेळेत हा सराव सुरू होता. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच असणारे दिनेश गुंड यांनी स्वखर्चानं हा सगळा डोलारा उभा केला आहे.

एके काळी "बाप्याचा खेळ' असणाऱ्या कुस्ती या खेळावरची मक्तेदारी मुलींनी संपवली आहे. इंदापूर, राजगुरूनगर, सोलापूर, सासवड, ठाणे, संगमनेर, धरणगाव-जळगाव, सांगली, राहुरी, बीड, सोलापूर, परभणी, भंडारा, नागपूर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या क्रीडापटू याचे जिवंत उदाहरण आहेत.

इंदापूर तालुक्यातील माळवाडी हे छोटसं गावं. या गावातील हर्षदा गंगाराम जाधव हिनं जेव्हा कुस्ती खेळायला सुरुवात केली तेव्हा गावकऱ्यांनी नाकं मुरडली होती. कधी टोमणे तर कधी प्रत्यक्षच बोलून कुटुंबाला हैराण केलं. "कुस्ती काय बायांचा खेळ हाय का?', "गंगारामला काय कळतच नाय, बाहरेच्या माणसांपुढं पोरगी कुस्ती खेळणार हे बरं दिसतं का?' असं बोलू लागले.

खरं तर कुस्ती तिच्या घरात होती. वडिलांनी कुस्ती खेळली होती पण पुढे संसाराचा गाडा रेटताना कुस्ती मागे पडली. त्यांची इच्छा होती की, तिच्या भावांनी कुस्ती खेळावी, आखाडे गाजवावेत. त्यामुळे भाऊ कुस्ती खेळायचे. घरातलं वातावरण हर्षदाच्या मनावर बिंबत गेलं. वडील-भावांबरोबर ती स्वत:हून कुस्तीचे धडे घेत होती. पुढे भावांना तालमीचा कंटाळा आला तर हर्षदाची रुची वाढली. शेवटी तिनं वडिलांना विचारलंच "मला कुस्ती खेळायची आहे. तुमची इच्छा मी पूर्ण करेन.' मुलांकडून भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे त्यांनी हर्षदाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली पण परिसरात तिच्याशी खेळणार कोण? गावात मुलींसाठी तालमी नाहीत.मग त्यांनी तिला या आळंदीच्या व्यायामशाळेत पाठवलं. हर्षदानं17 वर्षांखाली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर नुकतंच तिनं 19 वर्षाखाली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिसरं बक्षीस मिळवलं.

जळगाव जिल्ह्याला महिलांच्या कुस्तीगटासाठी पहिलंच पदक, तेही सुवर्णपदक मिळवून देणारी रूपाली महाजन हिची परिस्थिती एकदम वेगळी. रूपाली धरणगावची. अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कुस्ती खेळणारी ती एकमेव मुलगी. तिलाही सुरुवातीला हर्षदासारखंच टीकेला तोंड द्यावं लागलं होतं. रूपाली सांगू लागली, शाळेतल्या मुलीसुद्धा नावे ठेवायच्या मैत्रिणीच नाकं मुरडतात म्हटलं की खूप वाईट वाटायचं पण तिकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्यायही नसायचा.

रूपालीचे आईवडील शेतमजुरी करणारे. घरची हलाखी. रूपालीला खेळांची आवड होती. वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग होताच. पण स्पर्धेच्या ठिकाणी तिला कुस्तीचं विशेष आकर्षण वाटायचं. शाळेत कराटे शिकवलं जायचं. त्यात तिनं विशेष कामगिरी केली होती. शिक्षकांनी एकदा सांगितलं, तालुक्याच्या शालेय स्पर्धांसाठी मुलींची कुस्ती आहे. आठवीतल्या रूपालीनं हमी भरली.

खेळण्याचं तंत्र माहीत नव्हतं. गावात कुस्तीगीर होते. त्यामुळं तिनं अगदी लहान वयात कुस्त्या पाहिल्या होत्या. पाहून पाहूनच खेळ समजून घेतलं होतं. मग घरातच ती गाद्या टाकून भावंडांना घेऊन सराव करू लागली. वडीलही पोरीच्या जिद्दीला पाहून प्रोत्साहन देऊ लागले. तालुका स्तरावर पहिल्यांदाच खेळली अन् तिला सुवर्णपदक मिळालं. तिचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर विभागात आणि शालेय राज्य स्पर्धेत 19 वर्षांखालील गटात तिनं प्रतिस्पर्धीला चीतपट करत सुवर्णपदक पटकावलं. रूपालीच्या या सर्वोत्कृष्ट खेळानं जळगाव जिल्ह्याला महिलांच्या कुस्तीगटासाठी पहिलं पदक मिळालं.

पण गावात पाय ओढणारे कमी नसतात. पोटदुखी वाटणारे काही मध्यमवर्गीय रूपालीच्या कुस्तीवरून निषेध करू लागले. पण तिच्या चमकदार कामिगरीनं त्यांना सडेतोड चपराक दिली. तिच्या पराक्रमानं सगळ्यांचे डोळे दिपले. रूपाली म्हणते,""माझी आई लई अडाणी हाये. तिला कायच कळतं नाही, कुस्तीत मी बरं वाईट कसंही खेळले तरी ती एकच म्हणते, रूपालीचा पयला नंबर आलाय!''

मात्र इथे तिचा खडतर प्रवास काही थांबला नाही. चांगल्या दर्जाची कुस्ती खेळण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच उत्तम आहाराचीही गरज असते. रूपालीच्या घरच्यांकडे आर्थिक स्त्रोत तुटपुंजे आहेत. त्यातूनही ते काही पैसे वाचवून तिच्यासाठी पाठवतात पण ते पुरेसं नसतं. रूपाली एक उत्कृष्ट खेळाडू आहे हे हेरूनच सध्या तिचे प्रशिक्षक तिला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

केवळ कुस्तीच्या प्रेमापोटी दुर्गम खेड्यातून पुण्यात थडकलेली संगीता टेकाम हे वेगळंच रसायन. भंडारा जिल्ह्यातील सुकडी तालुक्यातील तुंगसर या गावची. रानावनात राहणाऱ्या संगीताकडं शक्ती खूप पण कुस्तीचं तंत्र नव्हतं. संगीताचे आईवडीलही शेतकरी. त्यांना कुस्ती वगैरेविषयी काही माहिती नाही. पण गावातील एका कुस्तीप्रेमी गृहस्थांनी त्यांच्या मुलीसोबत कुस्ती खेळताना संगीताला पाहिलं. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेतर्फे संगीताच्या शाळेला कुस्तीची मॅट आली होती पण कुस्ती शिकवणारे शिक्षक नव्हते. मॅट तशीच पडून. मग एकमेकींच्या सोबतीनं पाच सहा जणी त्यावर खेळायच्या. त्याला कोणतेही तंत्र-नियम नव्हते. शेवटी या कुस्तीप्रेमी काकांनीच संगीताला पुण्यात पाठवलंय आणि तिच्या कुस्तीसाठी येणारा खर्चही ते उचलत आहेत. संगीतानं कुस्ती खेळणं आणि असं गाव सोडून बाहेर पडणं या दोन्ही गोष्टी तिच्या वडिलांना पटलेल्या नाहीत. अद्यापही त्यांचा राग कमी झालेला नाही मात्र आईची साथ आणि काकांचा पाठिंबा या जोरावर संगीता कुस्त्यांचे पट गाजवत आहे. शालेय राज्य स्तरावरील सुवर्णपदकावर संगीतानं नाव कोरलंय.

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रूपाली अडसुरे हिनं मावसभावाला खेळताना पाहिलं आणि ती कुस्तीकडं आकर्षित झाली. रूपाली अडसुरे दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे ती तिची आई मामाकडे रहायला आल्या. तिथं तिनं पाहिलं काका म्हणजे मावशीचे पती हे त्यांच्या मुलाला कुस्ती खेळायला प्रोत्साहन देत आहेत. तो आखाड्यावर कुस्ती खेळतोय. सहावी-सातवीत मग तिनंही मावसभावाबरोबर कुस्ती खेळायला सुरुवात केली. परिसरात खेळायला मुली नसल्यानं भावांबरोबर प्रॅक्टिस केली जायची. त्यावरही मुली हसायच्या. भावांबरोबर काय मारामारी करतात, शिवाय भावांच्या ताकदीपुढं निभाव तो काय लागणार म्हणून फार चिडवायच्या. ते चिडवणं खूप वाईट असायचं. पण कुस्तीचं प्रेम बळ द्यायचं आणि मग बाकी गोष्टी मागे पडायच्या.

तिचं कुस्तीतील खेळ पाहून तिचे काकाही चकित झाले पण तिचा मावसभाऊ तसा वयानं मोठा असल्यानं त्याचं आखाड्यात आणि तालमीत जास्त वेळ जाऊ लागला. शिवाय तो मातीत खेळायचा यामुळे रूपालीचा सराव मागे पडला. मग तिनं न्यूज चॅनेल्सवर अंकिता गुंड, रेश्मा माने या कुस्तीगिरांची नावं ऐकली. त्यांच्यासारखंच खेळायचं. आईचं मोठं नाव करायंच या ईर्षेने पेटली. मग तिला या तालमीविषयी माहीत झालं. आज रूपालीच्या खात्यातही राज्यस्तरावरचं सुवर्णपदक जमा आहे.

नागपूरच्या ओमेश्वरी बस्तीने बोलायला लागली तशी मुलींचं खी: खी: सुरू झालं. काही कळेना काय झालं ते. मग ओमेश्वरीनंच सांगितलं, माझी भाषा ऐकून हसतायेत. तिची नागपुरी पद्धतीची हिंदी-मराठी संमिश्र भाषा हा मुलींच्या दिवसभरातील विरंगुळ्याचाही एक भाग होता असं कळलं.

ओमेश्वरीनं राष्ट्रीय स्तरावर कुस्तीसाठी सलग तीनदा सहभाग नोंदविला आहे. घरातून काही प्रमाणात वारसा मिळाला. आतेभाऊ राज्य स्तरापर्यंत कुस्ती खेळलेला. त्याची कुस्ती पाहून आपणही असं खेळावं असं तिला वाटायला लागलं. घरातून पाठिंबा होता पण गावात सोयीसुविधा नव्हत्या. आतेभावाबरोबर ती सराव करायची पण त्यात सातत्य नव्हतं. आळंदीचं निवासी केंद्र माहीत झालं नि प्रश्न सुटला.

सासवडची यशश्री मात्र कसलीही पार्श्वभूमी नसताना, खेळातच करिअर घडवायचं या इच्छेनेच कुस्तीत दाखल झाली. यशश्री शालेय अभ्यासात हुशार विद्यार्थिनी. शाळेत खेळाला महत्त्व नव्हतं. सगळेच जण अभ्यासाचे गुणगान गायचे. इतर मैत्रिणींनाही शिक्षण घेऊन मोठं होण्याची इच्छा पण यशश्रीला आपण काहीतरी वेगळं करायला हवं असं पहिल्यापासून वाटत होतं. मग तिला मुलीही कुस्ती खेळतात अशी माहिती झाली पण सासवडमध्ये तर कुस्ती प्रशिक्षण किंवा तालीम नाही. वडिलांनी माहिती मिळवली तेव्हा आळंदीचा हा रस्ता सापडला.

तासगावच्या स्मिता माळीपुढं तर कुस्तीसाठी संपूर्ण कुटुंबालाच स्थलांतरित होण्याचा पेचप्रसंग निर्माण झाला. स्मिताचे आजोबा कुस्तीगीर. वडीलही कुस्तीगीर पण कुस्ती खेळतानाच वडिलांचा हात निखळला. मग त्यांनी शेती करायला सुरुवात केली. पण कुस्तीचं वेड काही केल्या जात नव्हतं. आपण नाही तर मुलांनी तरी खेळावं असं त्यांना वाटू लागलं. तिचे भाऊ कुस्ती खेळू लागले तशी स्मिताही त्यांच्यासोबत कुस्तीचे डाव खेळू लागली. तिचा बहारदार खेळ पाहून तिच्या वडिलांना वाटलं हिला रीतसर शिक्षण द्यावं.

आता कुस्तीचं प्रशिक्षण केंद्र म्हटलं की कोल्हापूरच, हा विचार करून त्यांनी कोल्हापूर गाठलं. पण तिथल्या तालीमवाल्यांनी सांगितलं, "मुलीची राहण्याची सोय होणार नाही. संपूर्ण कुटुंबालाच यावं लागेल.'' ही एक मोठी पंचाईत होती. सारं घरदार खेळापायी कसं नेणार? कुस्तीतून स्मिताला बाहेर पडावं लागतंय अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिच्या कॉलेजच्या क्रीडाशिक्षकांमुळे टळलं आणि आज तीही स्पर्धांमध्ये उत्तम कुस्ती खेळत आहे.

कुस्तीच्या खेळासाठी आपापली गावं घरं सोडून मुली आळंदीत राहायला आल्या आहेत. या व्यायामशाळेत सर्वात लहान मुलगी चौथी इयत्तेत तर मोठया मुली महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या पण सगळ्या जणींचं कुस्तीत नाव कमवायचं, हे स्वप्न सारखंच आहे!

आज राज्यात अंदाजे 300 तरी मुली कुस्ती खेळत आहेत मात्र सगळ्याच विखुरलेल्या आहेत. आळंदीत भेटलेल्या सर्व मुलींना कुस्ती खेळायची कशाला, या प्रश्नापासूनच अडथळे येतात. सरावासाठी प्रतिस्पर्धी मुलीच नाहीत किंवा दोन गावांत एक एक मुलगी असली तरी, अंतर फार अशा समस्या. गावांमध्ये अद्यापही प्रशिक्षण, सुविधा, सुसज्ज मॅटचा अभाव आहे. काही जणींच्या शाळेतील शिक्षकांना आवड आहे म्हणून ते शिकवतात मात्र त्यातही सातत्य नाही. स्पर्धेपुरतंच शिकवलं जातं मात्र त्याला ना सरावाची ना योग्य तंत्राची जोड.

काही ठिकाणी मुली नसल्यानं मुलांबरोबर सराव करावा लागतो. तर काही वेळा नातेवाईकच कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण करतात. रूपाली महाजनचा एक अनुभव बोलका आहे. तिनं शालेय राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवल्यानंतर जळगाव जिल्ह्याचं नाव झालं. त्यामुळे तिच्या शेजारील गावानं तिला सत्कारासाठी बोलावलं. रूपाली म्हणते, सत्कार झाल्यानंतर कुस्तीचं काही प्रात्याक्षिक दाखवावं, डावपेच दाखवावे असं संयोजकांनी सुचवलं पण माझ्यासमोर कुस्ती खेळायला कोणी येईचना! माझा खेळ सरस असण्याची मुलांना भीती वाटत असेल पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी मुलीकडून हरायचं म्हणजे ते गावात लाज काढल्यासारखं! कोणीच येईना म्हटल्यावर माझ्या एका चुलतभावासोबत कुस्ती लढवली, अर्थात मी जिंकले आणि मग लगेच भावांनी मला खांद्यावर उचलून मिरवणूक काढली. फुल हव्वा केली. पण ताई, आखाड्यात मुलगा-मुलगी अशी लढत फारशी लढवतंच नाहीत.''

 

हिनाकौसर खान- पिंजार

Similar News