जसे कर्म तसे फल या न्यायाने या महाभागांना अपमानितसुद्धा व्हावे लागते ते त्यांच्या खेळाच्या अज्ञानाने व केलेल्या भाष्याने. उदा. मुंबईच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला तेव्हा मार्टिन नावाच्या खेळाडूंना आपल्या अध्यक्षांना धक्का देत मंचावरून जाण्याचा इशारा केला होता. तसेच आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष माल्कम स्पीड यांनी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांसहित सर्वांच्या क्रिकेटच्या ज्ञानासंबंधीचे वाभाडेच काढले होते. ‘तेव्हा जाए तो जाए कहां... समझेगा कौन वहां, दर्दभरे दिल की जुबां...’ म्हणण्याची परिस्थिती आली होती.
यास अपवाद म्हणजे कै. जगनमोहन दालमिया. ज्यांनी देशास कायमस्वरूपी सौरव गांगुली नामक रसगुल्ला भेट दिला. स्वत: प्रथम श्रेणी राष्ट्रीय स्पर्धांतून बंगालचे प्रतिनिधित्व केल्याने त्यांना खेळाचे ज्ञान होते. उद्योगपती असल्याने क्रिकेटचा वापर त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी करावयाचा नव्हता. आपल्या बुद्धीने, सदाचाराने त्यांनी एकहाती मंडळास संपत्तीवान केले. आमची ही मंडळाची आर्थिक परिस्थिती त्यांच्यामुळेच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज ते असते तर मंडळ न्यायालयीन कक्षेत आले नसते यात कुणाचे दुमत नसेल.
दालमियांना चांडाळचौकडीचा खूप त्रास सहन करावा लागला. मुंबई पोलिसांचा ससेमीरा-न्यायालय चकरांची माळ घालण्यात आली. परंतु बंगालच्या वाघाने राजकारण्यांना जागा दाखवली व निवडणुकीतही पाणी पाजले. हा असा एकटाच विक्रमवीर ज्याच्या प्रशासनास तोड नाही. या माणसाचा क्रिकेट विश्वात कुणीही अपमान केला असेल असे ऐकिवात नाही. ‘साथी हात बढाना… एक अकेला मिट जाएगा, मिलकर बोज उठाना’ याचे प्रतीक.
हा लेख लिहितानाच एक बातमी झळकली. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व माजी मंडळाच्या अध्यक्ष वगळता सर्वच पदांवर काम केलेले निरंजन शहा यांना सर्वोच्च न्यायालयाने मंडळाच्या कोणत्याही कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. वयाच्या सत्तरी पा केलेल्या उमेदवारांतील हे एक बडे प्रस्थ. माया-ममता-मोह-लोभ आजही सुटता सुटत नाही, याचे हे ज्वलंत उदाहरण. न्यायालयाने तंबी द्यावी एवढे अकलमंद पदाधिकारी होते याचेच हे उदाहरण.
पाटील-पवार-देशमुख -चव्हाण-भुजबळ -राणे -कदम-सावंत या नावाशिवाय पोलीस खाते पूर्णत्वास जात नाही. आता याचीच लागण क्रिकेटलाही लागलेली आहे. असे म्हणतात की मारनेवाले से बचाने वाला बडा होता है. सध्याच्या परिस्थितीत एकमेव मराठा क्रांतिकारक नेता आशीष शेलार याने क्रिकेटला संबोधून दु:खी कष्टी मजपाशी ये… मी तुला नवजीवन देईन, असे म्हणून जवळ घेण्याचा प्रयत्न देखील केला आहे. परंतु आरंभच आहे. सध्या हातात केवळ कमळच आहे. सुवासिक फुलांच्या गुच्छाचा पुष्पहार क्रिकेटला घालता आला, तरच यशाचा मानकरी ठरता येईल. रात्र वैऱ्याची आहे सावध राहा, अशी परिस्थती हितशत्रूंनी आणून ठेवली आहे. दलदल- चिखलात यशाची कमळे जर उगवली तर ‘घन:श्याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोद झाला... उठी लवकरी वनमाळीउदयाचळी मित्र आला...’ ही भूपाळी गात खेळास संजीवनी मिळू शकते. ‘ढल गया दिन हो गई शाम, जाने दो, अभी जाना है’ हे जरी कमळाने म्हटले तरी राजकारण्यांना विटी-दांडूचा खेळ प्रिय आहे.
आपल्या प्राप्त झालेल्या संपत्तीचे प्रदर्शन करून आपली श्रीमंती दाखवण्याची हौसही आहे ती श्रीकृष्ण जन्माष्टमीस गोविंदास बक्षीसरूपी जाहिरात करून बहाल करून दर्शवितात. नटनट्यांना सोबत घेऊन नाचविण्यात धन्यता मानतात. युवा पिढीला आपण किती आदर्श आहोत हे दर्शवितात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत टाहो फोडतात. परंतु पाण्यासारखा पैसा खर्च करताना शेतकऱ्यांना मदत करावी- व्हावी असा विचारदेखील यांच्या मनाला शिवत नाही. विटी-दांडूचा उपयोग सदैव त्यांच्या शाब्दिक सोयींसाठी करत असतात. आम्ही त्या गावचे नाही हे दाखविण्याचा पुरेपूरे उपयोग होतो. गोविंदाच्या बाबतीत तर न्यायालायाला हस्तक्षेप करावा लागतो.
शेवटी ललित मोदी ज्या सी. बी. ने मंडळास आर्थिक बळ दिले. आज तो इंग्लडच्या आश्रयास आहे. राजस्थान मुख्यमंत्री – दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाचा आशीर्वाद त्यास आहे- याची धरपकड कधी?
मल्ल्यासोबत मोदी दोघेही इंग्लडमध्येच अर्थात राजधानीतून राजकीय असा नेम धरून सोडल्यास एकाच दगडात दोघांनाही गार करणे शक्य होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ निवड समिती म्हणून पंचायतनाची निवड करून काही कालमर्यादेसाठी त्यांची नियुक्ती करते व त्यांच्यावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची निवड करण्य़ाची संमती देते. परंतु देशातील पाच विभागांतून प्रत्येकी एक प्रमाणे गठन करताना कोणते निकष लावले जातात, हे आजवर कोणालाही ज्ञात नसलेलं गूढचं आहे. ‘सुजलाम सुफलाम सगळ्यांचेच आम्ही खांब’ ही परिस्थिती आहे. यापूर्वी मंडळाने किमान २५कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडूच यासाठी पात्र ठरू शकतो, असे फर्मान काढले होते. याचा त्यांना आज कदाचित विसर पडत असेल. आमचे नवीन प्रशासन, पूर्वीच्या महाभागांनी जे महाप्रताप करून सोडविण्यासाठी यांच्यासाठी ठेवलेले आहेत, त्याची परीक्षा पूर्वतयारीची उत्तरे सापडणे कदाचित कठीण जात असेल. थोड्यांच्या चष्म्यांचीही कमतरता असेल. मंडळाची परिस्थिती मात्र एखाद्या बंडलासारखी झालेली आहे असे वाटते. क्रिकेटऐवजी कार्यालयीन खो-खो खेळले जात असावा असा वारंवार भास होतो. चिरंजीव हा अमरपट्टा केवळ कमरेस बांधलेला दिसतो. तो आर्थिक बाबतीत. अन्यथा मृगजळ. ‘किस्मत की हवा कभी गरम कभी नरम’ म्हणण्यास मात्र विसरत नाहीत.
खेळाचे अज्ञान- प्रशासनात अपरिपक्वता, खात्यात अनुभवाची कमालीची कमतरता- कल्पनाशून्य प्रशासक- निर्णय- कृती अंमलबजावणी यास लागलेली वाळवी, विश्वात करून घेतलेले हसे... समन्वयाचा अभाव याचा आखों देखा हालचा अध्याय सुरू आहे. घुमजाव अशोभनीय आहे. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं... या तत्त्वाने आता टिकाव धरणे शक्य होणार नाही याची नांदीच आहे. कृती म्हणजे ही निवड समितीची निवड.
“तेरे प्यार का आसरा चाहता हूँ... वफा कर रहा हूँ वफा चाहता हूँ...” हे मात्र एकदिलाने गातात. या पाच जणांत नियामक मंडळ जाहीररीत्या यांची पात्रता त्यांचे खेळाडू म्हणून मंडळाच्या कोणत्या स्पर्धेतून कोणत्या राज्यातर्फे कोणकोणत्या स्तरावरील सामान्यातून केलेली वैयक्तिक कामगिरी/देशाचे प्रतिनिधित्व केलेले असल्यास तपशील माहिती, खेळाडू तसेच निवड समिती सदस्यत्वाचा पूर्वानुभव -योगदानाची संपूर्ण माहिती स्वत: घेणे व आवश्यकतेनुसार मागणी करणाऱ्यास उपलब्ध करून देणे अशी पूर्तता करू शकेल का? अथवा मंडळाचा मागील दरवाजाने आलेले मंडळाचे पाहुणे म्हणून खोगीरभर्ती आहे असे समजावे.
मंडळ पारदर्शक प्रशासनास प्राधान्य देते असे म्हणते तर भारतीय संघाचा प्रशिक्षकाची निवड करताना ज्याप्रमाणे मंडळाची त्यांनीच नियुक्त केलेली सल्लागार-तांत्रिक समिती अर्ज केलेल्या अर्जदारांची मुलाखत घेऊन, त्यांच्याकडून अर्थातच तुम्ही केलेल्या आराखडे, कोष्टके किंबहुना वेळापत्रक ते देशाच्या खेळ-खेळाडू व संघास हितवाहक आहे. याची हमी लेखी स्वरूपात घेते. तर निवड समितीची निवड करताना या अनावश्यक पाच उमेदवारांकडूनही ते मंडळास कोणत्या नवीन संशोधनाद्वारे भारतीय संघाची रचना करणार आहेत. योजना निकाल देण्याचा-घेण्याचा कालावधी व अंतिम टप्प्यात तुमची निवड समिती सदस्य म्हणून केलेली नेमणूक तुम्ही सिद्ध करून दाखवणे बंधनकारक असेल-राहील.
आयसीसी, त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी नियुक्त केलेल्या त्यांच्या पॅनलवरील पंचांनी जर सामन्यात चुका केल्या त्याने निर्णायक क्षणी कोणत्याही संघावर त्याचा विपरित परिणाम झाल्यास त्यांच्यावर त्वरित कार्यवाही होते त्याला काही काळासाठी स्वत:ची करमणूक करून घेण्यासाठी घरी बसवले जाते.
याचा बोध घेऊन आपले मंडळ अशा प्रकारची कार्यवाही आपल्या निवड समिती सदस्यावर करू शकल्यास पारदर्शकता सिद्ध होईल. पात्रता नसलेले उमेदवार यापूर्वीही होते, पुनरावृत्ती तत्त्वावर आजही ती स्थिती आहे. बदल ही काळाची गरज आहे. क्रिकेट मंडळच काय आपण सर्वच भारतीय पाश्चिमात्यांचे अनुकरण करीत आलो आहोत. मग आपण काळासोबत मार्गस्थ व्हा. निवड समिती सदस्य आज मंडळावर कोणतेही संघ निवडून देत उपकार करीत नाही. लाखात मानधन घेऊन आपले देशप्रेम व्यक्त करीत आहेत.
(क्रमश:)