कसा असावा निवड समिती सदस्य...

Update: 2017-08-18 05:13 GMT

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अतिविद्वान प्रशासकांनी निवड समिती सदस्य ठरवताना किमान त्यांनीच नेमणूक केलेल्या तांत्रिक सल्लागार कमिटीचे मार्गदर्शन घ्यावे. या कमिटीतील एक सदस्यही समितीवर घ्यावा. खेर तर पाच जणांची गरजही नाही.

१) भारतीय संघाचा कर्णधार

२) प्रशिक्षक – तांत्रिक समितीचा

३) एक सल्लागार- मंडळाचा

४) एक प्रशासनातील प्रतिनिधी व

५) एकच निवड समिती सदस्य ज्याचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असेल.

ज्याचा उपयोग आपल्याला केवळ निवड समिती सदस्य अर्थात तोच या समितीचा अध्यक्ष असेल. अशा व्यक्तीचा शोध मंडळ घेईल का? तसे झाल्यास तर आमचे अनुकरण करू लागतील. मेक इन इंडियाचे स्वप्न सत्यात उतरेल. पण त्यासाठी मंडळ प्रशासकांनी परस्परांच्या हातात हात नि गळ्यात गळे घालणे आवश्यक आहे. कृपया पायात पाय घालू नयेत...!

मन हा वाहता वारा आहे. व विचार त्यावरील पाहारा आहे. सार्वजनिक जीवनात तुमच्या वाणीस – शब्दास पैशाएवढेच महत्त्व असते. या दैवी देणगीचा वापर योग्यरीत्या योग्य ठिकाणी योग्य वेळी करणे ही एक कलाच आहे. सर्वांनी अचूक – मोजके योग्य भावार्थ, नेमके बोलले तर त्याचे परिणाम आपल्याच पक्षात येतात, यश – विजयाची माळ गळ्यात पडते. माझ्या महामंत्रात यशाचे रहस्य आहे, सर्वांनाच बोलण्याची मुभा आहे. मूलभूत हक्कच आहे. परंतु काय बोलू नये हे ज्याला कळले तो महान होतो.

मानवाला इंग्रजीतील ‘एनर्जी’ या शब्दाची अत्यंत गरज असते. ते जीवनसत्त्वच, पण याची निर्मिती आपण जे अन्न ग्रहण करतो त्या सोबत ATP – CP - पाणी यातून होते ती एनर्जी शाररिक – मानसिक – श्रम करताना वापरली जाते. अशी एनर्जी अनावश्यकरीत्या खर्च करू नये. तुमची कृती वेळोवेळी महत्त्वाचा बोध शिकवत असते.

सुनील गावस्कार ज्या दिवशी आपल्या देशाचे, आपल्या संघाचे प्रतिनिधित्व कोणत्याही स्तरावरील सामन्यात करत असे त्या दिवशी सकाळी सहापासून सांयकाळी सहा वाजेपर्यंत कोणाशीही बोलत नसे. आपली शक्ती बोलून खर्च करत नसे. परिणाम म्हणजे त्याने केलेले विक्रम. त्याचे नाव न घेतल्यास भारतीय क्रिक्रेटचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. सुवर्णाक्षरांत नोंदविलेले हे अजरामर नाव आहे. उदयोन्मुख, होतकरू गुणी खेळाडूंनी हे करून पाहावे. त्याने तुमची ध्येयपूर्ती नक्कीच होईल. सुनील गावस्करसारखा महान आघाडीचा फलदांज आजवर झाला नाही याची साक्ष त्याची शतके देतात. आपण अभ्यासपूर्व पाहिल्यास हे योगदान सामने वाचविण्यासाठी किंवा पराजय टाळण्यासाठी – जिंकण्यासाठी नव्हे. सर डॉन ब्रॅडमन यांची २९ शतकांची मर्यादा- विक्रम- मोडून पुढे गेल्यानंतरचा त्याचा खेळ व पुढची शतके पहा. त्यात महानता आढळून येईल.

भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना कर्णधार इम्रान खानने त्याच्या संघातील आघाडीचा फलंदाज मुद्दस्सर नजर यास गावस्करच्या जवळच क्षेत्ररक्षणास उभे केले व त्यास सांगितले तू झेल वगैरे नाही घेतला तरी चालेल पण त्याच्या पायांच्या हालचालींचे निरीक्षण करून तुलाही त्याच्यासारखे करता येईल का? अभ्यास करून प्रयत्न केलास तर तुला यश मिळ्ल्यास ते पाकिस्तानचे यश असेल. यावरून आपण आपले अंदाज बांधावेत. सनील गावस्करला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची गरज नाही. भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळाच्या निवड समितीवर निवड – प्रशासन यावर दोषारोप ठेवण्याची वेळ आल्यास काही दिवसांपूर्वी इंग्लडमध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफिची अंतिम लढत ज्या दिवशी होती त्याच दिवशी यांनी भारतीय संघ जो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार होता त्याची घोषणा केली. हे करण्यापूर्वी आज संघात आहे, दौऱ्याच्या संघात नाही याचा खेळांडूवर होणारा मानसिक आघात – येणारा दबाव याची जाण या समितीस अथवा मंडळ प्रशासनास नसावी का? ही जबाबदारी कोणाची? ती कशी निभवणार...

आम्हाला वेड लागले हे क्रिकेटचे गुणगुणत स्वतःची सुटका करून घेतली. वेस्ट इंडिज मालिकेत ३/२ विजय जरूर मिळवला परंतु वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईसने १२५ धावांचे नाबाद शतक मारत – ज्यात १२ षटकार ६ चौकारांचा समावेश होता - हा सामना एकहाती जिंकून दिला. त्या वेळी सर्व भारतीय गोलदाजांचा समाचार घेतला. आता या क्षणी कुलदीप यादव हा खेळाडू मिळालेला आहे. परंतु अश्विन – जडेजा यांना टक्कर देण्यास आपल्याकडे आपल्या बचाव फळीत तयार केलेले दुसरे राखीव कोट्यातील गोलंदाज तयार आहेत का? मंडळाचा मानस काय आहे? या समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवडला त्यात प्रथम शिखर धवन नव्हता. नंतर मुरली विजयच्या बदली संघात घेतला गेला. त्याने कसोटीत शतक ठोकले. सोबत चेतेश्वर पुजारा १५०.

या श्रीलंका दौऱ्यात भारतीय फलंदाज मोठमोठ्या धावसंख्या उभारणार यात शंकाच नाही. श्रीलंका संघाकडे आज भेदक गोलंदाज नाहीत. कर्णधार जायबंदी. त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांत नसेल. फलंदाजीचा त्यांचा डोलारा स्तुतीपात्र नसेल यामुळे मालिका ही भारतीय संघास फलदायी ठरेल. प्रत्येक सामन्यात सरावाची संधी. पण अति आत्मविश्वास धोकादायक, हेही लक्षात असू द्यावे.

या श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक प्रयोग करण्याची संधी होती. पण आपण त्यात पूर्ण अयशस्वी ठरलो. डावखुरा अष्टपैलू रैना याचा तर विसर पडलेला दिसतो. फलंदाज धावसंख्या उभारून देईल. प्रतिस्पर्धी संघाचे २० फलंदाज बाद करण्यासाठी मात्र ताकदीचे गोलंदाज हवेत. सामन्यांना हजेरी लावून निरीक्षण करणे हेही आपले काम असते, याचे भान निवड समितीने ठेवावे.

पुन्हा आठवण गावस्करची. सुनील गावस्करने त्याला आलेल्या अनुभवाने आपल्याच भारतीय निवड समितीस ‘पॅक ऑफ पोकर्स’ म्हटले तर मोहिंदर अमरनाथने बंच ऑफ पोकर्स म्हटले होते. गावस्कर विक्रमादित्य. त्याचे कोणी वाकडे करू शकला नाही परंतु मोहिंदरच्या कारकीर्दीस निवड समितीने पूर्णविराम लावला. पुढे तो निवड समितीचा अध्यक्ष झाला. वाणीने त्याचा घात केला... अध्यक्षपद सोडा त्याला बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला.

(क्रमश:)

 

Similar News