#Covid19 : टीम इंडियाला कोरोनाचा धोका, पाचवी टेस्ट रद्द

Update: 2021-09-10 09:02 GMT

भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची टेस्ट मॅच रद्द करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या टेस्टबाबत दोन दिवस चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी क्रिकेट फॅन्स आणि इतर सहकाऱ्यांची माफी मागितली आहे.



टीम इंडियामधील एक सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळल्याने इतरांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारतीय टीम मैदानात उतरु शकणार नाही असेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पत्रामध्ये म्हटले आहे. या आधी झालेल्या बैठकीत टीममधील अनेक खेळाडूंनी पाचवी टेस्ट न खेळण्याची भूमिका मांडलीय. कोरोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा या खेळाडूंसोबत कामाला होते. याआधी झालेली टेस्ट मॅच संपेपर्यंतही परमार हे भारतीय टीमसोबतच होते.


या आधी टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि बॉलिंगचे प्रशिक्षक भरत अरुण यांना बाधा झाली आहे, त्यात आता परमार कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे टीमने गुरुवारी प्रॅक्टिस केली नाही. दरम्यान टीममधील सर्व खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान ५ टेस्टच्या मालिकेमध्ये १ सामना पावसामुळे ड्रा झाला होता. भारताने २ तर इंग्लंडने १ टेस्ट जिंकली आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार झाली होती. पण आता निर्णायक सामाना रद्द झाल्याने या मालिकेत कोण विजयी ठरणार हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

Tags:    

Similar News