इनपूट - संदेश शिर्के
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाच्या गुन्ह्यात आजन्म जन्मठेप भोगत असलेल्या गुंड पप्पू कलानीच्या पायाशी लोळण घेऊन भाजपने निवडणूक लढण्यास सुरूवात केल्याने निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. मॅक्समहाराष्ट्र ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्यामाहितीनुसार निवडणूकी पुरतं सर्व नियम डावलून पप्पू कलानीला जेल मधून बाहेर आणण्याचं भाजप नेत्यांनी आश्वासन दिल्यानंतर कलानी परिवार आता पूर्ण शक्तिनीशी भाजपसाठी प्रचार करणार आहे.
ठाणे आणि उल्हासनगर महापालिका तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता असूनही पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी हा एक राज्यमंत्री,भाजप खासदार आणि नेत्यांच्या उपस्थितीत तलवार नाचवत स्टेजवर पोहोचला. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ओमी कलानीने भाजपसोबत हातमिळवणी केली आणि शूचितेच्या गप्पा मारणाऱ्या निष्ठावंत संघ आणि भाजप कार्यकर्त्यांचा जीव तडफडला. आचारसंहिता लागू असताना शस्त्र बाळगण्यावर बंदी असते मात्र थेट मुख्यमंत्र्यांचाच आशिर्वाद मिळाल्याने ओमी कलानी तलवार नाचवत स्टेजवर आले.
कोण आहे पप्पू कलानी?
किरण सोनवणे, स्थानिक पत्रकार
उल्हासनगर मधील राजकारण गेली 3 दशके गुन्हेगारी प्रवृत्तीने माखलेल्या राजकारणा भोवती फिरते आहे. त्यात पप्पू उर्फ सुरेश बुधरमल कलानी हा त्यातला प्रमुख मोहरा. जो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. गोपाळ राजवानीची हत्या झाली, तर सुरेश मंचेकर, श्यामकिशोर गारिकापट्टी, बच्ची पांडे, दीपक सोंडे, शेखर यादव, पंढरी वारिंगे, सागर आणि संजय हे तत्कालीन गँगस्टर एक तर मरण पावले किंवा काही जणांनी गुन्हेगारी विश्व सोडून उद्योगधंदे सुरू केले. तर काही जेलमध्ये जायबन्द झालेत. त्यामुळे उल्हासनागरातील गुन्हेगारी कारवायावर पूर्ण विराम लागला होता, उल्हासनागरची जी एक लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळख होती ती पुन्हा एकदा ठळक होऊ लागली होती. पण, Party with Difference अशी टॅगलाइन आणि सांस्कृतिक चेहरा घेवून राजकारण करणाऱ्या भाजपने मात्र पप्पू कलानीचा शहरातील राजकारणावर असलेला प्रभाव शक्तीचा वापर उल्हासनगर मधील सत्ता हस्तगत करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी याच्यासाठी आपल्या पक्षात प्रवेशाची दारे उघडी केली आहेत. वास्तविक 1995 च्या निवडणुकीत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यानी संघर्ष यात्रा काढून पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकुर यांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमीचा मुद्दा बनवून महाराष्ट्रातील सत्ता उलथवून टाकली होती. आता त्या गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या आत्म्याला भाजप काय उत्तर देणार हा सुद्धा प्रश्न आहे. मात्र "सत्तेसाठी वाट्टेल ते" ही नवी टैग लाइन घेवून भाजपा आता मैदानात आहे.
पप्पू कलानीला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शिक्षा झाली, त्यामुळे कलानी परिवार राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड संतापला आहे. त्यातच भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेत्यांनी पप्पू कलानीला स्पेशल ट्रीटमेंट देण्याचं वचन देऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ओमी कलानीला पक्षात रेड कार्पेट अंथरून दिलं. राज्यमंत्री रवी चव्हाण, खासदार कपिल पाटील तसेच इतर नेत्यांना ओमी कलानीशी चर्चा करायला सांगण्यात आलं होतं. या ऑपरेशनमध्ये गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सामील असल्याने निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी आता भाजपने ठेवलीय,पण असं करत असताना आपल्या कार्यकर्त्याचे खून पाडणाऱ्यांना तरी रेड कार्पेट द्यायला नको होतं अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करतायत.
जागांचे गणितओमी कलानीनं राष्ट्रवादीचे विद्यमान २० नगरसेवक आणि एक वर्षाआधी टिम ओमी कलानी नावानं ज्यांना उमेदवारी दिली होती, अशा एकूण ४० जागांची मागणी त्याच्या समर्थकांसाठी भाजपकडे केली आहे.