चंद्रकांत पाटलांनी बुजवले अमेरिकेतील खड्डे???

Update: 2017-12-05 13:29 GMT

राज्यातील सर्व मुख्य रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्राकांत पाटील भलतेच घाईवर आलेत असं दिसतंय. पाटील यांनी खड्डेमुक्तीचा ध्यास घेतल्यामुळे राज्यभरातील महाराष्ट्रातील राज्य महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या नादात रस्त्याचे काम पुर्ण झाल्याचे जे फोटो चंद्रकांत पाटील यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेत त्याचे जिओ टॅगिंग मात्र अमेरिकेतील एका शहराचे आहे. त्य़ामुळे रस्ता आणि त्याची कामे महाराष्ट्रातील रस्त्यांची आहेत की अमेरिकेतीस जर्सी शहरातील असा संभ्रम निर्माण होतो.

पीडब्लूडी मधील कलाकार अधिकारी आणि कंत्राटदारांनी जिओटॅगिंग मध्येही घोटाळा तर केला नाही ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील आधारवड-टाकेड-म्हैसवळण घाट- इगतपुरी उपविभाग रस्त्याच्या कामाचा फोटो आपल्या ऑफिशिएल ट्वीटर अकांऊटवर शेअर केलाय. मात्र त्याला देण्यात आलेले जिओ टॅगिंगमध्ये अमेरिकेतील जर्सी शहरांचे अक्षांश आणि रेखांश देण्यात आलेत.

खरं तर रस्त्याच्या कामांचा दररोज आढावा घेण्यासाठी मंत्रालयात 'वॉर रूम' तयार करण्यात आली आहे. खड्डेमुक्तीसाठी वार्षिक देखभाल-दुरुस्तीची निविदा काढण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणच्या महत्वपूर्ण रस्त्यांची १० किलोमीटर रस्त्याची कामे दोन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात आली आहेत. या दरम्यान या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. राज्यभर विविध रस्त्यांची युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. संबंधीत खात्याच्या वरिष्ठांना याची माहिती तात्काळ मिळावी जिल्हानिहाय ऑनलाईन माहिती तसेच विभागनिहाय माहिती वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जात आहे. या ऑनलाईन प्रक्रियेत खड्ड्याची आधीची, खड्डे भरतानाची आणि भरल्यानंतरची फोटो अपलोड केले जातात, त्यामुळे या रस्त्यांची स्थिती ऑनलाईन पाहता येते.

काम नेमकं कुठे सुरू आहे हे कळावं म्हणून जिओटॅगींग करणं बंधनकारक आहे. मात्र, जर राज्यातल्या रस्त्याला अमेरिकेचं जिओटॅगिग होत असेल तर कुठल्याही कामाला कुठलंही जिओटॅगिंग करून बिलं काढली जाऊ शकतात. जिओ टॅगिंगमध्येही घोळ होऊ शकतो हे खुद चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिशिएल ट्वीटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटनेच सिद्ध केलंय. त्यामुळे राज्यात खड्डे भरण्याच्या कामात ही खोट्या जिओ टॅगिंग करून घोटाळा झाला असण्याची शक्यता 'मॅक्समहाराष्ट्र'ला वाटत आहे. या खोट्या जिओटॅगिंगचा माग काढण्यासाठी 'मॅक्समहराष्ट्र' ने एसआयटी बनवली असून आपल्यालाही असा कामांची काही माहिती असल्यास maximummaharashtra@gmail.com या आमच्या ईमेल वर कळवावी.

Tags:    

Similar News