Special Report : लघवीपासून पाणी, अभियंत्याचा अभिनव प्रयोग

सार्वजनिक मुताऱ्यांमधील अस्वच्छता आणि त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम यावर कायम चर्चा होते. पण यावर पर्याय काय असेल याबाबत कधीच चर्चा होत नाही, पण सांगली जिल्ह्यातील एका तरुण इंजिनीअरने यावर अनोखा उपाय शोधून काढला आहे. पाहा सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट...;

Update: 2021-09-29 03:29 GMT

सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये असलेली अस्वच्छता आपण अनुभवली असेल. येथे प्रवेश करताच दुर्गंधी पसरलेली असते. महागडे टाइल्स, सिरॅमिकचे भांडे वापरलेले असतात. पण ते काही काळात सुस्थितीत दिसत नाहीत. या भांड्यात लोकांच्या थुंकण्याच्या सवयीमुळे चोक अप होऊन भांड्यातच मूत्रसंचय होऊन दुर्गंधी पसरलेली असते. अनेकजण येथे वाईट सवईमुळे उपलब्ध असूनही फ्लशचा वापर करत नाहीत. सार्वजनिक शौचालयात असलेले नळ अनेकदा चालूच अथवा लिक असतात. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. अनेकदा तर अनेक ठिकाणी नळांना पाणीच नसल्याने पाण्याचा वापरच होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. यामुळे हवा प्रदूषण होते. घाण साचल्याने मच्छर आणि त्यातून रोगराई पसरते. लोकांच्या सोयीसाठी बनवलेल्या अशा मुताऱ्या हळूहळू रोगराईचे आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे केंद्र बनतात. आतील घाणीचे साम्राज्य पाहून कुणी याचा वापर करत नाही. त्यामुळे अनेकजण उघड्यावरच काम उरकतात. सार्वजनिक मुतारींची नीगा ठेवायची असेल तर त्याला व्यवस्थापन असणे महत्त्वाचे. व्यवस्थापन करायचे असेल तर त्यामध्ये मनुष्यबळ आणि त्यावर अतिरिक्त खर्चदेखील होतो.



 


भारतात सर्वच ठिकाणी मुताऱ्यांमध्ये मुत्राचा निचरा होण्यासाठी पाण्याचाच वापर केला जातो. बहुतांश ठिकाणी पाणी जपून वापरा असे बोर्ड लागलेले असतात. मात्र सार्वजनिक शौचालये तसेच मुताऱ्यांमध्ये जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या देशाची लोकसंख्या १३६ कोटी आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे जवळपास दोनशे शहरे आहेत. या लोकसंख्येपैकी अशा सार्वजनिक मुताऱ्यांचा वापर करणारी संख्या लक्षात घेतल्यास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये पाण्याचा अपव्यय रोखणारा अनोखा प्रयोग सांगली जिल्ह्यातील विटा या शहरात यशस्वी झाला आहे. या प्रयोगाला प्रोत्साहन मिळाले तर देशातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबून याउलट पाण्याची निर्मिती देखील होऊ शकते.



 


बाबू पवार या सांगली जिल्ह्यातील विटा येथील तरुण इंजिनिअरने हा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्याच कल्पनाशक्तीमधून तयार झालेला तंत्रज्ञानातून लघवीपासून पाणी तयार करण्यात येते आहे. त्याच पाण्याचा वापर बस स्टँडमधील मुतारीमध्ये करण्यात येतो आहे. विटा बस स्थानकात लघवीपासून पाणी आणि त्या पाण्याचाच वापर स्वच्छतेसाठी करण्याचा अभिनव प्रयोग सध्या प्रत्यक्षात केला जातो आहे.

या प्रयोगाबाबत बाबू पगार सांगतात "सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. वापर झाल्यानंतर अनेकजण फ्लशचा वापर करत नाहीत. पाण्याचा अतिरिक्त व्यय होतो. तसेच या ठिकाणांची स्वच्छता ठेवायची असेल तर यासाठी मेंटेनन्स जास्त येतो. ही अडचण लक्षात घेऊन मला ICT & Solar Based smart Urinal ही कल्पना सुचली. यावर मी काम सुरू केले. या कामासाठी विटा नगरपालिकेने प्रोत्साहन दिले. विटा शहरातील बस स्थानकात माझ्या स्वप्नातील हा प्रकल्प उभा राहिला. पुढे बोलताना त्यांनी स्मार्ट Urinal बाबत सविस्तर माहिती दिली.



 

कशी काम करते ही स्मार्ट मृतारी?

प्रवेशद्वारावर असलेल्या स्लॉटमध्ये एक किंवा दोन रुपयांचे नाणे टाकताच याचा दरवाजा उघडतो. आतील पंखे आणि लाईट सुरू होतात. लघवी करून बाहेर येताच दरवाजा बंद होतो. लाईट आणि पंखे बंद होतात. ऑटोमॅटिक फ्लश सुरू होतो. आतील स्वच्छता आपोआप होते. यातील बहुतेक यंत्रणा ऑटोमॅटिक आहे. या urinal च्या मागील बाजूस लघवीपासून स्वच्छ पाणी बनवण्याचा प्लॅन्ट आहे. यामध्ये साठवण्यात आलेल्या लघवी फिल्टर होते. तिचे पाण्यात रुपांतर होते. यामध्ये तयार झालेले पाणी रोपांना तसेच मुतारीमध्ये फ्लश करण्यासाठी वापरात येते.

या स्मार्ट मुतारीमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित आहे. यामध्ये कुठेही विजेचा वापर होत नाही. या मुतारीच्या पुढच्या भागात जाहिरातीसाठी स्क्रीन तयार करून कर उत्पन्नाचे साधन देखील केले आहे. यातून विजेची बचत होतेच तसेच विजेसाठीचा खर्च देखील पूर्णपणे वाचतो. बाबू पवार यांच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट्सच्या स्पर्धेसाठी बाबू पवार यांच्या या प्रोजेक्टची निवड झाली आहे.

बाबू पवार यांचा हा उपक्रम देशातील पर्यावरणाला बळकटी देणारा उपक्रम असून भारताच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील पाटोदा येथील आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे यांनी दिली आहे. त्यांनी पाटोदा येथील सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी सदर प्रकल्प उभा करण्याची इच्छा बाबू पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यांनी बाबू पवार यांचे अभिनंदन देखील केले आहे. अशा अभिनव प्रयोगांमधून पाण्याची, पर्यावरणातील प्रदुषणाची समस्या अत्यंत कमी खर्चात कमी होऊ शकते. तसेच पाण्याची बचत होऊन पाण्याची निर्मिती होऊ शकते.

या प्रयोगाची वैशिष्ट्ये

पर्यावरण पूरक

विजेची बचत

पाण्याची बचत

हवा प्रदूषण रोखणारा

स्वयंपूर्ण

जाहिरातीद्वारे उत्पन्न देणारा

त्यामुळे अशा प्रयोगशील व्यक्तींना सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारने हा प्रयोग भारतभर राबविल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. तसेच नव्याने झाडे तसेच इतर कामासाठी पाण्याची निर्मिती होणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा प्रयोग निश्चितच दिशादर्शक ठरेल.



 


हा प्रकल्प तर आता यशस्वी झाला आहे. आता या प्रकल्पाच्या पुढे जाऊन वैद्यकीय विभागाच्या मदतीने या मुताऱ्यांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने करण्याचा बाबू पवार यांचा मानस आहे. वापरकर्त्याच्या Urine च्या नमुन्याव्दारे बेसिक Urine report अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यावर त्यांनी काम सुरू केले आहे. या तरुण अभियंत्याच्या कामाला सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ते प्रोत्साहन मिळाल्यास त्यांच्या गुणवत्तेने ते देशातील अभिनव अशा प्रयोगाला जन्म देऊन देशाचे नाव जगात उंचावेल आणि स्वच्छतेच्या, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भारत नवे पाऊल टाकेल यात शंका नाही. आता राष्ट्रीय पातळीवर या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Similar News