World Happiness Report : आनंदी देशांच्या यादीत भारत मात्र 'दुःखी', पण ही मोजणी करतात तरी कशी?

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास विभागाने आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. तर या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र भारत आनंदी देशांच्या यादीत तळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अहवालावर चर्चा सुरू झाली आहे.;

Update: 2022-03-20 16:20 GMT

नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आनंदी देशांच्या यादीत फिनलँडने सलग पाचव्या वर्षी पहिला नंबर कायम राखला आहे. तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्तेची सुत्रे हाती घेताना झालेला हिंसाचार आणि तालिबानच्या भीतीच्या छायेखाली असलेला अफगाणिस्तान यामुळे अफगाणिस्तान या आनंदी देशांच्या यादीत सर्वात शेवटी 146 व्या क्रमांकावर आहे. मात्र या यादीत भारताची कामगिरी काही उज्वल नाही. तर आनंदी देशांच्या यादीत भारतही दुःखी असल्याचे समोर आले आहे. या 146 देशांच्या यादीत भारताचा 136 वा क्रमांक आहे. पण हा अहवाल नेमका कसा मोजला जातो?

जगभरातील विविध देशांचे वेगवेगळे निर्देशांक विचारात घून वेगवेगळे अहवाल तयार केले जातात. त्यामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण, भुक निर्देशांक, गरीबी यासह अनेक विषयांचा या अहवालांमध्ये अंतर्भाव असतो. त्यातच समाजाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाची मुल्यमापन केले जाते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी भुतानच्या धर्तीवर आनंदी देशांची यादी तयार करण्याचा ठराव प्रकरण तीनमधील 65/309 नुसार 19 जुलै 2011 पास केला. तर या ठरावानुसार 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट' (World Happiness Report) 1 एप्रिल 2012 रोजी जाहीर करण्यात आला.

गेल्या दहा वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास विभागाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कतर्फे प्रसिध्द केला जातो. तर या यादीसाठी गॅलप वर्ल्ड पोल डेटा प्रायोजक आहे. त्यानुसार यंदा आनंदी देशाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आनंदी देशांच्या यादी निर्मीतीची प्रक्रीया-

2012 पासून दरवर्षी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तयार केला जातो. त्यासाठी गेल्या तीन वर्षात देशातील 1000 लोकांचे मत घेतले जाते. त्यानुसार त्या देशातील लोकांना काय वाटतं त्यावरून देशातील आनंदी लोकांची संख्या काढली जाते. तर यासाठी 10 पेकी गुणांकण केले जाते. तर या गुणांकणानुसार जगभरातील 146 देशातील आनंद मोजला जातो. मात्र अनेकदा हा अहवाल व्यक्तीसापेक्ष असल्याची टीका केली जाते. मात्र अशाच प्रकारच्या वर्गवारीतील विविध देशांची वर्गवारी आणि आर्थिक, पर्यावरण, सुरक्षा आणि गुन्हेगारी या मुद्द्यांवर आधारीत असलेल्या अहवालातील देशांचा क्रमांक आणि या अहवालातील क्रमांक जवळपास समान असल्याचे दिसून येते. त्यापैकी 2019 साली प्रसिध्द करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक अहवालाची वर्गवारी जवळपास अशाच प्रकारे असते. त्यामुळे या अहवालाची विश्वासार्हता वाढते.

या अहवालात कोणता देश पुढे कोणता मागे?

गेल्या पाच वर्षांपासून फिनलँड पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नेदरलँड, लक्झेंबर्ग, स्वीडन, नॉर्वे, इस्राईल आणि न्यूझिलंड हे देश पहिल्या दहा आनंदी देशात आहेत. तर विशेष म्हणजे पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका या देशांचा क्रमांकही आनंदी देशांच्या यादीत भारताच्या वरचा आहे. मात्र 146 देशांच्या यादीत भारताचा 136 वा क्रमांक आहे. तर अफगाणिस्तान, लेबनॉन, झिम्बाम्वे, रवांडा, बोतस्वाना, लेसोथो, सिएरा लिओन, टांझानिया, मलावी आणि झांबिया हे सर्वात दुःखी देश आहेत. मात्र या देशांपाठोपाठ खालून 11 व्या क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताची जगभरात नाचक्की होताना पहायला मिळत आहे.




 


भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच असमानता, धार्मिक तेढ, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, स्रियांवरील अत्याचार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याबरोबरच गेल्या काही वर्षात देशात मॉब लिंचिंगचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर भारत दुःखी असल्याचे स्पष्ट होत आहे.

2012 ते 2022 आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान-

  • 2012- 111
  • 2013 – 111
  • 2014 – 139
  • 2015 – 117
  • 2016 – 118
  • 2017 – 122
  • 2018 – 133
  • 2019 – 140
  • 2020- 144
  • 2021- 139
  • 2022- 136

वरील दहा वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2012 आणि 2013 साली भारताने 111 वा क्रमांक कायम राखला आहे. मात्र 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर या देशाची आनंदी यादीतील घसरण सुरू झाली. ती 2017 पर्यंत एका मर्यादेपर्यंत होती. मात्र त्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. तर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने 3 अंकाने उसळी घेतली असली तरी भारत तळाच्या देशांमध्ये कायम आहे.

यंदा संयुक्त राष्ट्रांनी आनंदी देशांची यादी जाहीर केली. त्यामध्ये भारताचा क्रमांक अत्यंत खालचा असल्याचे दिसून आल्याने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून या अहवालावर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

काँग्रेसने या अहवालावर आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी शेजारी देशांपेक्षा भारत तळाला असल्याचे म्हटले आहे.

आनंदी देशांच्या यादीत येण्यासाठी काय करायला हवे?

• आनंदी देशांच्या यादीत येण्यातील प्रमुख अडथळा म्हणजे देशातील बेरोजगारी, गरीबी. त्यामुळे संबंधीत देशातील सरकारांनी दारिद्र्य निर्मुलनाच्या योजनांना प्राधान्य द्यायला हवे.

• ज्या देशांमध्ये उपासमार, बेरोजगारी, स्थलांतरितांचे प्रश्न, असमानता समाजमाध्यमांमुळे निर्माण झालेले प्रश्न याकडे संबंधीत देशांच्या सरकारांनी लक्ष देऊन त्यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात.

• लोकांना आपल्या देशात सुरक्षित वाटायला हवे, त्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवायला हवा. त्यादृष्टीने संबंधीत देशाच्या सरकारांनी पाऊले टाकायला हवेत.

• लोकांचा प्रशासनावर आणि आपल्या देशातील सरकारवर विश्वास असायला हवा. तसेच देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कार्य केले तर आनंदी देशांच्या यादीत आपल्या देशाचा क्रमांक वाढू शकतो.



Tags:    

Similar News