आम्हाला कुणी वाली हाय का न्हाई रं? सुकेळी धनगरवाडा ग्रामस्थांची आर्त हाक

धनगर आदिवासी ढोर नाय, माणूस हाय, माणुसकीची भीक नको हक्क हवा म्हणत येथील बांधव वर्षानुवर्षे आक्रोश करतायेत पण इथल्या मुर्दाड प्रशासनाला यांची कीव येत नाही, हंडाभर पाण्यासाठी महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2022-04-10 11:45 GMT

आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेला असताना स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या धनगरवाड्यात पोहचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आलंय. रायगड जिल्ह्यात विकासकामाबाबत भयानक व बकाल स्थिती दिसून येतंय. नागोठणे पासून जवळच असणारा सुकेळी धनगरवाडा हा मुंबई - गोवा हायवेपासून अगदी अडीच ते तीन कि.मीच्या अंतरावर वसलेला आहे. ऐंनघर या जिल्ह्यातील अत्यंत श्रीमंत ग्रामपंचायतीत या गावाचा समावेश आहे. मात्र पिढ्यानपिढ्या खपल्या पण इथंल्या माणसाला मूलभूत व पायाभूत नागरी सुविधा नाही दिसल्या ही परिस्थिती आहे.

पाणी हे माणसाचं जीवन आहे, मात्र इथल्या माणसांची पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी धडपड व संघर्ष सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना रखरखत्या उन्हात पायाला फोड येइपर्यंत पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागतेय. डोंगर दर्याखोऱ्यातील वाट तुडवीत जावे लागतेय. कधी काटेरी कुटेरी व दगड धोंड्याची वाट तुडविताना अनेकदा डोक्यावरील दुडी घेऊन कोसळून जखमी देखील व्हावे लागतेय. डोक्यावर हांडे तर कमरेवर तान्हेले बाळ घेऊन पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पाण्यासाठी घरातील वृद्ध व गर्भवती महिलेला देखील नाईलाजाने बाहेर पडावे लागते. ही वेदनादायी स्थिती पाहून संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून खळकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही.



 


या गावात जवळपास २५ ते ३० घरे आहेत. येथील लोकसंख्या ही जवळपास २२५ च्या आसपास असून यांच्या वेदनेवर कुणी फुंकर मारीत नाहीत. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या या गावातील बहुतांशी लोक हे शेती, दुग्धव्यवसाय मोलमजुरी करतात. भटक्या जमातीतीच्या या गावाचा विकास अजूनही झालेला नसून धनगरवाड्यात पाणी, रस्ता, शौचालये इत्यादी अनेक प्रकारच्या मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. विशेषता या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील ग्रामस्थांना व महिलांवर आर..कुणी पाणी देत का पाणी? असे म्हणत आम्हाला कुणी वाली हाय का न्हाई? असे बोलून डोक्याला हात लावायची वेळ आली आहे.

दरम्यान भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्षांच्या वाटचालीकडे प्रवास करत असताना येथील ग्रामस्थांवर अजून देखील अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे. भारत तसेच जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जीवावर प्रगती करत आहे. एकीकडे भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन एकही गाव पाणी, रस्ता, शाळा, शौचालये इत्यादींपासून वंचित राहणार नाही, यासाठी अनेक योजना राबवित असूनदेखील मात्र या सुकेळी धनगरवाड्यात अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. या वाड्यात कोणकोणत्या सुविधा नाहीत हे पाहण्यासाठी अद्याप पर्यंत एकही शासकीय अधिकारी पोहचलेला नाही.



 


इतर काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेंतर्गत दोन–दोन नळ घरापर्यंत पोहचले आहेत. परंतु सुकेळी धनगरवाड्यातील लोकांच्या नशिबी आजही डोंगरातून वाहत येणाऱ्या ओहळाचे पाणी पिणेच नशिबी आलेले आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत बांधलेले विहीर ही नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे मुळात नदी किनारी बांधली होती. दरम्यान पावसाळ्यातील पाण्याच्या पुरात ही विहीर जमीनदोस्त होवून दिशेनाशी झालेली आहेत. त्यामुळे येथील लहान मुले, माणसे ही ओहळाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. या पाण्यात गुरे-ढोरे ये-जा करत असल्याने हे पाणी दूषित होते. असे वाहते पाणी प्यायल्याने येथील ग्रामस्थ व लहान मुलं सतत साथीच्या आजाराला बळी पडून येथील लोकांना वारंवार दवाखान्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर ओहळाच्या ज्या ठिकाणावरून पिण्याचे पाणी आणले जाते ती वाट अडचणीची असल्यामुळे येथील गर्भवती, वयोवृद्ध महिलांना डोक्यावरून पाणी वाहून नेताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.याठिकाणच्या धनगरवाड्या ची परिस्थिती अतिशय गंभीर आहे .येथे पिण्यासाठी पाण्याची कोणतीच सोय नसून येथील नागरिकांना ओहोळाचे पाणी प्यावे लागत आहे आणि विहीर देखील जमीनदोस्त झाली आहे. तसेच शौचालय देखील नसून या गावात जाण्यासाठी साधी पायवाटच आहे. येथे कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही. त्यामुळे महिलांचे अतोनात हाल होतायत.

सुकेळी धनगरवाडा मुंबई-गोवा हायवेपासून अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावर असतानादेखील येथील परिस्थिती भयानक अशी पहावयास मिळत आहे. राज्यात मोनोट्रेन, मेट्रो, स्काय वॉक, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण इत्यादींच्या योजना राबवण्याचे धोरण चालू असताना अजूनही शासनाच्या कोणत्याच योजनेखाली धनगरवाड्यात रस्ता होऊ शकला नाही. यामुळे येथील नागरिकांचे पावसाळ्यामध्ये ये जा करताना मोठ्या प्रमाणात हाल होतात. शिवाय येथील ग्रामस्थ शेती व दुग्ध व्यवसाय करत असल्याने दूध विकण्यासाठी शहराकडे यावे लागते. परिणामी रस्ता नसल्यामुळेच येथील लोकांना शेतीतून पिकलेली उत्पादने विकण्यासाठी डोक्यावरच वाहून आणावी लागतात. या गावात रस्ता नसल्यामुळे येथील लहान मुलांना सुकेळी येथील राजिप शाळेत चालत जावे लागते. त्यामुळे मुलांना शाळेत जाण्याची इच्छा असून देखील पाच ते सहा किलोमीटर आंतर चालायला लागत असल्यानेच मुले शाळेत जाण्याचा कंटाळा करतानाची गंभीर बाब दिसून येत आहे.



 


याबरोबरच बऱ्याच वेळा आजारी माणसे, वयोवृद्ध, गर्भवती महिला यांना दवाखान्यात नेण्यासाठी प्रवासी रस्ता नसल्या कारणाने वाहन जात नाही परिणामी रुग्णांना लाकूड व कांबळ्याची झोळी करून हायवे पर्यंत आणावे लागते.दरम्यान यामध्ये गेल्या अनेक वर्षात रुग्ण, गर्भवती महिला, वयोवृद्ध, लहान आजारी मुले, गंभीर स्वरूपाची अपघातग्रस्त माणसं दगावल्याच्या अनेक घटना या पूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत तेथील स्थानिक लोकांना आम्हाला पायाभूत तसेच मूलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी कोणी वाली आहे का नाही? अशी बोलण्याची वेळ आली आहे.

येथील स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणुकीच्या वेळीच तिथे पोहचून विकास कामे करण्याची खोटी आश्वासने देतात , भुलथाप देतात आणि येथील भोळेभाबडे नागरिक या प्रतिनिधींवर प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवतात. त्यामुळे आता तरी शासनाने डोळे उघडून या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवाव्यात अन्यथा यापुढील एकही निवडणुकीला आम्ही मतदान करणार नाही याउलट मतदानावर बहिष्कार टाकू असा निर्धार येथील नागरिकांनी व सुशिक्षित तरुणांनी एक मताने केला आहे.

त्याचप्रमाणे सुकेळी धनगरवाडा गावात सार्वजनिक पुरेशी सार्वजनिक शौचालय नाहीत. गेल्या काही वर्षांपूर्वी बांधलेले एक शौचालय बांधण्यात आले होते. परंतु त्या शौचालय ठेकेदारांनी पाणी व्यवस्था न केल्याने गावात एकही शौचालय नाही परिणामी लहान मुले, महिला व ग्रामस्थांना विधी करण्यासाठी उघड्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक आरोग्यविषयक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ येथील सर्वेक्षण करून गावामध्ये लोकोपयोगी सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी येथील ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे.


 


सुमारे गेली ३० ते ३५ वर्ष येथील नागरिकांनी वनवास सहन केला आहे व अजूनही सहन करावा लागत आहे असे विदारक चित्र असताना अजून किती वर्ष हा वनवास सहन करावा लागणार आहे असा प्रश्न या भयानक वास्तवतेतून दिसून येतो.शासनाने आमच्या गावाला विकासकामे दिली, तर या कामाच्या बांधकामासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ अंग मेहनत,कष्ट करू अशी तयारीसुद्धा येथील वंचित नागरिकांनी दाखवली.यावरून येथील नागरिकांची शासनाविरोधी नाराजी दिसून येते.

त्यामुळे आतातरी सुकेळी धनगर वाड्यातील आमच्या समस्या सुटतील की नाही? या प्रकारचा प्रश्न मनात ठेवून येथील पुरुष व महिला सध्यातरी पायाभूत सोयी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.

सुकेळी धनगरवाडीतील पाणी प्रश्नावर पाणीपुरवठा अधिकारी सुजाता हिंगोले यांनी म्हटले की जमिनीच्या भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यास सांगून तत्काळ या गावातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोरवेल (कूपनलिका) उपलब्ध करून देवू असे सांगितले. येत्या पुढील काही दिवसातच येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. सुकेळी धनगरवाड्याच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यात येतील व त्यानुसार आम्ही सतत पाठपुरावा करू असे देखील सौ.सुजाता हिंगोले या महिला अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Full View

Tags:    

Similar News