महिलेच्या भगिरथ प्रयत्नातून निर्माण झाली हक्काची बाजारपेठ
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यात अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून नवी चळवळ उभी राहत आहे. मात्र ग्रामिण उद्योजक आणि महिला बचत गटांच्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी अहमदनगर शहरात माधुरी चोभे यांची खरेदीवाला मेगामार्ट ही अनोखी संकल्पना यशस्वी झाली आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यात महिला धोरण राबवण्यात येत आहे. तर महिलांसाठी शासन अनेक योजना राबवत असते. तर अनेक महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून स्वतःची आणि कुटूंबियांची उन्नती साधली आहे. मात्र ग्रामिण भागातील महिला बचत गटांसमोर बाजारपेठेचा प्रश्न असतो. त्यामुळे या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी माधुरी सचिन चोभे यांनी अहमदनगर शहरात लोकरंग किराणा दुकानाची सुरूवात केली.
माधुरी चोभे या व्यवसायिक प्रवासाबद्दल सांगताना म्हणाल्या की, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला आणि ग्रामिण भागातील उद्योगांना ( बचत गट उद्योग) येणाऱ्या अडचणींबाबत फेसबुकवर चर्चा करत होतो. त्यातून आम्हाला लोकरंग मेगामार्ट ही शेतकरी, ग्रामीण उद्योजक आणि महिला बचतगटांसाठी फायद्याची ठरेल अशी संकल्पना मांडली. यामध्ये शेतकरी, ग्रामिण उद्योजक आणि महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना व्हावा, असे नवे मॉडेल तयार केले. त्यानुसार चार वर्षांपुर्वी आषाढी एकादशीच्य निमीत्ताने त्याची सुरूवात केली, असे माधुरी चोभे सांगतात.
या व्यवसायाला सुरूवात केल्यानंतर अहमदनगर सारख्या निमशहरी भागात या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांना लोकरंग मेगामार्ट हे आपले वाटायला लागले. त्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या सूचना द्यायला सुरूवात केली. त्यातूनच या व्यवसायिक मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करता आल्या, अशी माहिती माधुरी चोभे सांगतात.
दरम्यान कोरोनाचे संकट आले. सगळ्या व्यवहाराची चाकं बंद पडले. सगळं जग स्थिरावलं होतं. पण नेमकं त्यावेळी माधुरी चोभे यांचे पती सचिन चोभे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधुन कोरोना नियमांचे पालन करून किराणा मालाचे आणि शेतमालाचे वितरण करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे कोरोना जगासाठी संकट असताना आमच्यासाठी कोरोना संधी सिध्द झाली, अशी आठवण माधुरी चोभे यांनी सांगितली. त्यामुळे त्यातून मिळालेल्या सकारात्मकतेमुळे व्यवसाय वाढीला मदत झाली. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार अनेक नवनवे उत्पादने लोकरंगच्या माध्यमातून विक्रीस ठेवण्यात आले. त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे महिला असूनही आत्मविश्वास वाढत गेला, असे माधुरी चोभे सांगतात.
व्यवसायाचे मॉडेल :
पुर्वीचे लोकरंग तर आताचे खरेदीवाला मेगामार्ट ही संकल्पना Amazonच्या धर्तीवर आधारीत असली तरी त्यामध्ये जास्तीत जास्त खरेदीतून नफा वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य भाव आणि ग्राहकांनाही भरघोस सुट देता येईल, अशी या खरेदीवाला मेगामार्टची संकल्पना आहे. तर यामध्ये विक्रीआधारीत नफा नाही तर खरेदी आधारीत नफा या व्यावसायिक मॉडेलचा अवलंब केला आहे. तसेच आम्ही आमच्या दुकानातील प्रत्येक वस्तुवर सुट देण्याचा प्रयत्न करतो. तसेच ज्या उत्पादकांकडून खरेदी करतो त्यांनाही त्याचा योग्य मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच आम्ही आमच्याकडे शेतकऱ्यांकडून किंवा ग्रामिण उत्पादकांकडून आलेल्या मालाचे मोफत सॅम्पल ऑर्डरमध्ये टाकून देतो. त्यामुळे लोकांना ते उत्पादन आवडले तर पुन्हा त्याची खरेदी करण्यासाठी लोक संपर्क साधतात. त्यामुळे लोकांचा या अनोख्या संकल्पनेकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती माधुरी चोभे देतात. तर याच व्यावसायिक मॉडेलअंतर्गत खरेदीवाला डॉट कॉम या इंटरनेट आधारीत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसीत करण्याचा निर्णय घेतला.
लोकरंग मेगामार्ट ते खरेदीवाला.कॉम प्रवास : लोकरंग मेगामार्टला शेतकरी, ग्रामिण उद्योजकांपासून ते महिला बचत गट आणि ग्राहकांचे समाधान होत होते. त्यामुळे चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी, ग्रामिण उद्योजक, महिला बचत गट तर भरघोस सुट मिळते. त्यामुळे ग्राहकांना चोभे यांचे दुकान फायद्याचे वाटू लागले. त्यातूनच ग्राहक आणि विक्री करणारे शेतकरी दोन्हींचा लोकरंग मेगामार्टवरचा विश्वास वाढत होता. त्याचाच फायदा पुढे व्यवसाय वाढीसाठी केला गेला.
सध्या इंटरनेटचा काळ असल्याने ई-कॉमर्स कंपन्यांचे वारे वाहत होते. त्यामुळे वाऱ्याची दिशा ओळखून खरेदीवाला डॉट कॉम या वेबसाईटची तयार करण्याविषयी आमच्या टीमसोबत चर्चा केली. तर सर्वांनी एकमुखाने या नव्या संकल्पनेला पाठींबा दिला. त्यामुळे आम्ही लोकरंग मेगामार्टचे नाव बदलून खरेदीवाला डॉट कॉम असे नाव दिले. तर या संकल्पनेचाही आम्हाला मोठा फायदा झाला, असे चोभे यांनी सांगितले.
खरेदीवाला डॉट कॉम वर असलेले उत्पादने :
खरेदीवाला डॉट कॉमच्या माध्यमातून किराणामालासह शेतीमाल आणि ग्रामिण उद्योजकांनी तयार केलेले उत्पादने खरेदीवाला डॉट कॉमच्या माध्यमातून विक्रीस ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सध्या 28 ते 29 उत्पादने विक्रीस ठेवण्यात आले आहेत. या उत्पादनांमध्ये ग्रामिण भागात उत्पादन केलेले मसाले, शेतीमाल आणि किराणा यांचा सामावेश आहे. तसेच पुढील काळात इंद्रायणी तांदुळ, खपली गहू, शेत गहू यांसह शुध्द वाणांचे उत्पादन ठेवण्यात येणार आहेत. तर त्या उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांना आरोग्यदायी माल पुरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे माधुरी चोभे यांनी सांगितले.
ई-कॉमर्स वेबसाईटवर ज्याप्रकारे उत्पादनांची बुकींग केली जाते. त्याप्रमाणे खरेदीवाला डॉट कॉम या वेबसाईटवर किंवा कंपनीच्या व्हॉट्सअपवर क्रमांकावर ऑर्डर दिल्यानंतर काही तासात ती पुर्ण केली जाते. हे या कंपनीचे वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीच्या संचालिका माधुरी चोभे यांनी सांगितले आहे.
सध्या किराणामाल, शेतमालासह होम अप्लायन्सेसची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. त्याबरोबरच व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्याचे प्रयोजन असल्याचे चोभे सांगतात.
व्यवसायाचा विस्तार :
लोकरंग किराणामाल आणि मेगामार्टपासून सुरू झालेला प्रवास खरेदीवाला डॉट कॉम पर्यंत पोहचला आहे. तर पुढील वर्षभरात या संकल्पनेचा महाराष्ट्रभर विस्तार करण्यात येईल. तसेच मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचे ध्येय आहे. त्यासाठी आमची संपुर्ण टीम काम करते, असे माधुरी चोभे यांनी सांगितले. तर त्यामध्ये अन्न प्रक्रीया उद्योग आणि बचत गटांच्या जास्तीत जास्त उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ग्रामिण भागात महिला बचत गटांनी शिवलेल्या गोधड्यांची विक्रीही आम्ही खरेदीवाला डॉट कॉमच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच विविध उत्पादक कंपन्यांशी करार करून एकत्रित दिवाळीपर्यंत तीन ते चार उत्पादने लाँच करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच बायोमी या कंपनीचे उत्पादन असलेले जीवाणूंची गणणा करणारे यंत्र विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
व्यवसायातील अडचणी : व्यवसाय सुरू करताना इतर महिलांना येणारी अडचण असते ती म्हणजे घरच्यांचा पाठींबा मिळवणे. परंतू तो पाठींबा मला सहज मिळाला. त्याबरोबर व्यवसायात येणाऱ्या अडचणींध्ये आरोग्यदायी आणि गावरान शेतमाल मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्या प्रकारचा शेतमाळ मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्याबरोबरच ग्रामिण भागातील ग्राहकांना घरपोहच उत्पादन मिळणार यामुळे त्याचे अधिक पैसे घेतले जातील का? असा गैरसमज आहे. त्यामुळे या अज्ञानामुळेही ग्राहकांपर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत.
हा व्यवसाय सुरू करण्यापासून माझ्यासोबत माझे पती सचिन चोभे आणि माझा पुर्ण परिवार यासह आमचे वर्गमित्र संतोष वाघ, पांडूरंग काळे, महादेव गवळी, विनोद सुर्यवंशी या सर्वांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे व्यवसायाविषयी नवनवीन संकल्पना राबवता येतात, असे माधुरी चोभे यांनी सांगितले.
माधुरीचा सामाजिक क्षेत्रासोबतच नवे काही करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे तिच्या प्रयत्नाला आम्ही भक्कमपणे पाठींबा दिला. त्याबरोबरच तिच्या डोक्यातून येणाऱ्या नव्या संकल्पनांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे माधुरी चोभे यांचे पती सचिन चोभे यांनी सांगितले.
व्यवसायाचा टर्नओव्हर :
लोकरंग मेगामार्ट सुरू केले त्यावेळेस यातून फार काही नफा मिळत नव्हता. मात्र व्यवसायाच्या गणितात सुधारणा केल्यानंतर आता वार्षिक टर्नओव्हर हा 60 लाखांच्या आसपास पोहचतो. त्यात आणखी वाढ करून ग्राहकांना कशा पध्दतीने चांगले आणि दर्जेदार उत्पादन देता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत. तसेच पुढील वर्षभरात महाऱाष्ट्रातील जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये खरेदीवाला डॉट कॉम पोहचवण्याचा प्रयत्न आहे.