धक्कादायक ! डॉक्टरांची चूक भोवली, फॉल्टी वॉल्व वापरल्याने वोक्हार्ट रुग्णालयात महिलेचा मृत्यू

मेडिकल, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कित्येक किस्से तुम्ही ऐकले असतील. ऑपरेशनदरम्यान चुकीचं इंजेक्शनपासून ते औषधांच्या वापराने रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र आज मुंबईतील नामांकित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडलं आहे, असचं सत्य या रिपोर्ट मध्ये मांडलं आहे. जे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. पण हे धक्कादायक सत्य काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...;

Update: 2023-07-13 08:12 GMT

तारीख होती 5 जून 2023.

स्थळ- चेंबूरमधील कामगारनगर येथील म्हाडा कॉलनी

विकास दळवी आपली पत्नी कविता दळवी यांना पत्नीच्या हृदयाचा वॉल्व बदलायचा होता. त्यासाठी विकास दळवी, कविता दळवी आणि मुलगी मालविका दळवी हे मुंबईतील नामांकित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाले होते. विकास हे कविता दळवी यांना हसत खेळत वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र येताना कविता दळवी यांचा फक्त मृतदेहच बाहेर आला.

कविता दळवी यांना 5 जून 2023 रोजी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर 6 जून रोजी कविता दळवी यांना ताप आला. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर 7 जून रोजी कविता दळवी यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर 10 जून रोजी कविता दळवी यांचे एरोटिक वॉल्व बदलण्याचं ऑपरेशन करण्यात आलं.

डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितल्याप्रमाणे कवितासाठी वापरण्यात येणार एरोटिक वॉल्व 3 लाख रुपये किंमतीचा Tissue पासून बनवलेला मेरिल लाईफ कंपनीचा वॉल्व होता.

10 जून रोजी कविताचं ऑपरेशन झालं. मात्र ऑपरेशनदरम्यान कॉम्प्लिकेशन निर्माण झाल्याने आम्ही पेसमेकर बसवला असल्याचे डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितले. त्यावेळी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, असं विकास दळवी यांनी डॉक्टरांना सांगितले. यानंतर तीन दिवस कविताच्या छातीत दुखत होतं. मात्र डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी ऑपरेशनमुळे दुखत असण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर तीन दिवसांनी कविताला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी कविताला काही खाऊ घातलं तर तिची उलटी व्हायची. ही गोष्ट आम्ही डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टरांनी 2D इको ही टेस्ट केली. यामध्ये कविताच्या हृदयात बसवण्यात आलेला वॉल्व फॉल्टी आहे. त्यामुळे वॉल्वमधून 4 ते 5 टक्के रक्ताची गळती होत आहे. म्हणून पुन्हा ऑपरेशन करावं लागणार असल्याचे डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितले.

तुम्ही काही काळजी करू नका. या ऑपरेशनची भरपाई आम्ही कंपनीकडून घेऊ, असं डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही वोक्हार्ट हॉस्पिटलने आम्हाला 19 लाख 86 हजार 690 रुपयांचे इस्टिमेट दिलं आणि काही पैसे भरायला सांगितले. तेव्हा तातडीने आम्ही फक्त 2 लाख रुपयेच भरू शकत असल्याचे सांगितले. यानंतर हॉस्पिटलने 17 जून रोजी दुसऱ्या शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान नर्स वारंवार येऊन ऑपरेशनची अपडेट देत होती. त्यावेळी नर्सने फॉल्टी वॉल्व आम्हाला आणून दाखवला. त्यावेळी आम्ही त्या वॉल्वचा फोटो घेतला, असं विकास दळवी यांनी सांगितलं.

या ऑपरेशन नंतर डॉ. गुलशन रोहरा यांनी कन्सल्टिंग रुममध्ये आम्हाला बोलावलं आणि ऑपरेशन व्यवस्थित झाल्याची माहिती दिली. मात्र यावेळी पेसमेकर बसवण्याची गरज पडली नसल्याचसुद्धा डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितलं.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी डायलेसिस करावं लागणार असल्याचं सांगितलं. तसंच पायात गाठ असल्याने अँजिओथेरपी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानुसार ती शस्त्रक्रीयाही पूर्ण करण्यात आली. यावेळी मी भेटायला गेलो त्यावेळी आम्ही कविताला भुलीचं इंजेक्शन देणार आहोत. कारण भुल असेल तर लवकर Cure होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी पाहिली तिच कविताची शेवटची हालचाल. त्यानंतर कविताची हालचाल मला दिसलीच नाही, असं विकास दळवी यांनी सांगितलं.

तारीख 20 जून 2023

वेळ सकाळी 10 वाजून 40 मिनिटांची

मी कविताला भेटण्यासाठी आत गेलो. त्यावेळी ती निपचित पडली होती. तिला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी थोडा लांबच थांबलो. पण त्यानंतर मी डॉक्टरांशी बोलून जेवणासाठी गेलो. माझ्यानंतर मालविका आतमध्ये गेली. तेव्हा कविताचा हात थंड पडला होता. मालविकाने नर्सला विचारले. त्यावेळी एसीमुळे हात थंड पडला असेल, असं उत्तर देण्यात आलं. त्यानंतर मालविका बाहेर आली. 12 वाजून 10 मिनिटांनी डॉक्टर मालविकाला भेटले. त्यांनी तुझ्या वडिलांना बोलव असं म्हटलं आणि मालविकाने मला फोन केला.

मी आतमध्ये गेलो. त्यावेळी कविताच्या शरीराला लावलेली सगळी उपकरणं काढून झाले होते आणि डॉक्टरांनी कविताचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मी कविताला हालवून जागवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या बाबूचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मी पोलिस केस करणार असल्याचे सांगितले आणि डॉक्टरांनी माझ्या कानात तुम्ही एरोटिक वॉल्वच्या कंपनीच्या विरोधात केस करा, असं सांगितलं. त्यामुळे आमची शंका आणखी वाढली.

त्यानंतर आम्ही आग्रीपाडा पोलिस ठाण्यात केस दाखल केली. पुढे पोस्ट मार्टमसाठी कविताचा मृतदेह नायर हॉस्पिटलला नेण्यात आला. पण हसत खेळत रुग्णालयात दाखल झालेली माझी पत्नी गेली कशी या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे.

या घटनेनंतर आम्ही वोक्हार्ट हॉस्पिटलला भेट दिली आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वोक्हार्ट हॉस्पिटलने दिलेल्या उत्तरात म्हटलंय की, घडलेल्या घटनेबद्दल आम्ही त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीत संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू.

आम्ही 10जून रोजी कविता दळवी यांची सर्जरी केली. त्यावेळी संबंधित वॉल्व काम करत होता. त्यानंतर आम्ही संबंधित रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर रुग्णाला काही त्रास सुरु झाल्याने 16 जून रोजी आम्ही तातडीने रुग्णाची 2d इको टेस्ट केली. मात्र त्यामध्ये वॉल्वमध्ये दोष असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी फॉल्टी वॉल्व रिप्लेस केला.

त्याबरोबरच आम्ही प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली. मात्र 48 तासानंतर पेशन्टच्या पायात गाठ आढळून आली. त्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला.

आम्हाला रुग्णांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना सर्जरीपुर्वी आणि सर्जरीनंतर पूर्ण माहिती दिली होती.

हॉस्पिटलची बाजू जाणून घेतल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने मेरिल लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या एरोटिक वॉल्व बनवणाऱ्या कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी कंपनीला मेल पाठवला. मात्र 27 जून रोजी मेरिल लाईफ कंपनीला मेल पाठवला. मात्र तब्बल 13 दिवसानंतरही मेरिल लाईफ कंपनीने उत्तर दिले नाही. त्याबरोबरच पोलिसांनीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाय. त्यामुळे हा सगळा आटापिटा कुणाला वाचवण्यासाठी सुरु आहे, असा सवाल उपस्थित होतोय.

Tags:    

Similar News