तालिबानमुळे अफगाणिस्तान – भारत संबंध घडणार की बिघडणार?

Update: 2021-08-27 09:04 GMT

अफगाणिस्तान हा देश भौगोलिक दृष्ट्या आशिया खंडातील महत्वाचा देश आहे. त्यामुळे जर आपण इतिहासात डोकावलं तर आधी रशिया आणि नंतर अमेरीका या दोन्ही महासत्तांनी अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात कसा राहील यासाठी प्रयत्न केलेले दिसुन येतात. सद्यस्थितीत अफगाणिस्तानवर तालिबानने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तालिबानचा इतिहास पाहता सध्या अफगाणिस्तान २० वर्षे मागे गेल्याचं तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानवर ओढावलेल्या या संकटांचे भारतावर काय परिणाम होणार हे जाणुन घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, "अफगाणिस्तानचे भारताच्या दृष्टीने एक वेगळे महत्व आहे. अफगाणिस्तान वरच्या या संकटाचा भारतावर सर्वप्रथम आर्थिक परिणाम होईल. अफगाणिस्तान आणि इराणच्या चाबहार बंदर दरम्यान सुरू असलेल्या चाबहार प्रकल्पात भारताची जवळपास ९ अब्ज डॉलर्सची गुंतवणुक आहे. त्यादृष्टीने काय करता येईल याचा विचार भारताने केला पाहिजे. चाबहारमुळे आपण मध्य आशियाई राष्ट्रांत सुध्दा जाऊ शकतो. तालिबान त्यासाठी किती मदत करणार? तालिबानशी आपले संबंध कसे असणार? हे अजुन तितकेसे स्पष्ट नाही. भारताने आपली भुमिका अजुनही स्पष्ट केलेली नाही. तालिबानचे पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI शी संबंध आहेत त्यामुळे पाकिस्तान तालिबानला भारताच्या विरोधात पाठिंबा देईल. पाकिस्तान तालिबानला भारताच्या विरोधात नियंत्रित करू शकतो."

भारत यापुढे कोणती पाऊले उचलू शकतो असं आम्ही त्यांना विचारलं त्यावर ते म्हणाले, "भारताची अजुन भुमिका स्पष्ट कुठे झाली आहे? तालिबानशी चर्चा करणार की नाही, तालिबानच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर त्याला मान्यता देणार की नाही हे ठरलेलंच नाही. शेवटी परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय धोरणाचा विस्तार असतो. त्यामुळे सरकार तालिबानशी न बोलण्याची भुमिका घेणार का? पण एका बाजुला सरकार तालिबानशी गुप्त चर्चा करतंय. भारत तालिबानशी उघड उघड चर्चा करणार का? कारण अनेक राष्ट्र तालिबानशी चर्चा करत आहेत. तालिबानी प्रमुख मुल्ला बरादरने तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतदेखील बैठक केली आहे."

२००१ मध्ये तालिबानच्या पाडावानंतर भारताने अफगाणिस्तान सोबत चांगले संबंध प्रस्थापित करत अनेक विकासकामे आतापर्यंत केली आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तान संसद भवन, सलमा धरण, जरांज-डेलाराम महामार्ग, स्टोअर महल, इंदिरा गांधी इन्सटिट्युट ऑफ चाइल्ड हेल्थ अशा अनेक विकास कामांचा समावेश आहे. तालिबानने देखील याकरीता भारताचे आभार मानले आहेत. परंतू ही विकासकामे असणाऱ्या सर्व प्रांतांवर सध्या तालिबानचे वर्चस्व आहे. अफगाणिस्तानमधील या सत्ताबदलाचा भारतावर काय परिणाम होईल यासंदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, " भारतावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक परिणाम होणार नाही. अफगाणिस्तानातील निर्वासितांचा फार मोठा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान पुढे असणार आहे. पाकिस्तान तसेच तालिबानने देखील आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान हा भारताला छळू शकतो. दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये चांगले संबंध होते. परंतु तालिबान आल्यानंतर ते तसेच राहतील असं वाटत नाही. कारण १९९६ ते २००१ या कालावधीत देखील अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार होतं परंतु भारताने त्याला तेव्हा मान्यता दिली नव्हती. त्यामुळे आता आलेल्या तालिबान मध्ये आणि भारतामध्ये फारसं काही सख्य असेल असं वाटत नाही परंतु फारसं वितुष्टही नसेल. तालिबनने सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना कुणाशी तरी जुळवून घ्यावेच लागेल. शिवाय तालिबानचा जो मूळ चेहरा आहे तो बदलला असेल असं मला वाटत नाही. पाकिस्तान आणि तालिबान यांचं जर उघडपणे जुळलं तर मग सुरक्षेच्या दृष्टीने भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालिबान देखील गोंधळाच्या मनस्थितीत असल्याने भारताला फक्त wait and watch ची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही."

तालिबानने सत्तेत येताच आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपुर्वी भारत – अफगाणिस्तानमधील आयात – निर्यात तालिबानने पुर्णतः बंद केली आहे. भारतीय निर्यात संघटना (FIEO) ने अफगाणिस्तानमधील गोंधळामुळे येत्या काही दिवसांमध्ये सुक्या मेव्याच्या किंमती गगनाला भिडण्याची चिंता व्यक्त केली आहे. भारत अफगाणिस्तान मधून सुमारे ८५ टक्के सुका मेवा आयात करतो. भारतीय निर्यात संघटनेचे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी इंडिया टुडे या वृत्तसमुहाशी बोलताना सांगितले की, "आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. तेथील आयात भारतात पाकिस्तान मार्गे येते. या क्षणी, तालिबानने पाकिस्तानला माल नेणे बंद केले आहे, त्यामुळे भारतातील आयात अक्षरशः थांबली आहे. जर व्यापार पुन्हा सुरू झाला नाही, तर सध्याच्या सुक्या मेव्याच्या साठ्याचे भाव वाढतील आणि व्यापाऱ्यांना पुरवठ्याचे पर्यायी स्त्रोतही शोधावे लागतील."

डॉ. सहाय यांच्या वक्तव्याला दुजोरा देत, नवी दिल्लीतील सर्वात मोठ्या सुक्या मेव्याची मंडई असलेल्या खडी बावडीमधील व्यापारी गौरव जग्गी म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून आम्ही सुक्या मेव्याच्या किंमतींवर झालेला परिणाम पहात आहोत. बदाम, अक्रोड, जर्दाळूचे दर दुप्पट आणि तिप्पट झाले आहेत. त्याचा ग्राहकांवर परिणाम होत आहे, गेल्या काही दिवसांपासून किमती सातत्याने वाढत आहेत. सध्याचा काळ हा सुक्या मेव्याचा कापणीचा हंगाम आहे परंतू पुरवठा ठप्प झाल्यामुळे नवा साठा लवकर येण्याची आम्ही अपेक्षा ठेवलेली नाही."

अमेरीकेने काढता पाय घेतल्यानंतर तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये आयसिससारखी दहशतवादी संघटना सहज बाँबस्फोट घडवुन आणते. ज्यात ६० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातो. या घटनेनंतर इतर देशांनी आता अफगाणिस्तानातील आपले दुतावास सुरू ठेवायचे की नाही याबद्दल विचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित नसलेल्या अफगाणिस्तानसोबत भारत आपले व्यापारी संबंध कसे हाताळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News