समाजासाठी झगडणाऱ्या भीमाच्या वाघिणीला कुणी देईल का घर ?
आयुष्यभर समाजासाठी झगडणाऱ्या बनुबाई येवले यांना स्वतः चे घर नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या शालिनीताई पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचे धाडस करणारी बनुबाई हलाखीत आयुष्य जगत आहे. ज्या समाजासाठी त्यांनी घरावर विस्तव ठेवला. तो समाज देईल का बनुबाईला एखादे घर?;
समाजासाठी स्वतःच्या घरावर विस्तव ठेवणाऱ्या बनुबाईना समाज देईल का हो घर
राज्यघटना केवळ आंबेडकरांनी लिहिलेली नाही. गांधी नेहरू स्वातंत्र्यासाठी लढत होते ज्या वेळी ते शिक्षा भोगत होते. त्यावेळी आंबेडकर ब्रिटीश सरकारमध्ये मंत्री होते. भारताची माहिती ते ब्रीटीशाना पुरवत होते. शालिनीताई पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा अनेक वादग्रस्त विधानांचा सपाटा लावलेला होता.
त्यांच्या या विधानानंतर बनुबाई येलवे अस्वस्थ झाल्या. केवळ तोंडी निषेध करणे त्यांना मान्य नव्हते. शालिनीताई कराड येथील टाऊन हॉलमध्ये येणार असल्याचे त्यांना समजले. स्वतः कर्करोगाशी झुंजत असलेल्या बनुबाईनी त्याना टाऊन हॉल येथे गाठले. गाडीतून उतरताच समोर जाऊन पोलिसांचे कडे भेदत त्यांचे तोंड काळे केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
बनुबाई येलवे नावाचा आंबेडकरी विचारांचां कृतीशील झंझावात अनेक दशक कराड परिसरात घोंगावत राहिला. अक्षरओळख नसलेल्या बनुबाई स्वतःवर झालेल्या अन्याय अत्याचारानंतर पेटून उठल्या. याला तोंड द्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले. पण वाचता येत नाही. लोकांची भाषणे त्यांनी ऐकलेली होती. बाबासाहेबांचा संघर्ष अनेक भाषणातून त्यांनी ऐकलेला होता. याच विचाराचा वारसा घेऊन त्यांनी रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे काम करत लढा सुरु केला.
त्या स्वतःला भीमाची वाघीण समजतात. त्यांनी आंदोलनात गायलेल्या या गाण्यातून त्यांच्या कामाची प्रेरणा आणि तत्व दिसून येते. त्या म्हणतात.....
लेक भीमाची,नव्या दमाची
वैऱ्याला झाडाला टांगीन
झाडाला टांगीन हाय मी भीमाची वाघीण
कुणी दावील मजला बोट मला आवडत नाही खोट
त्यज्या नरडीचा घेईन घोट
हाय मी भीमाची वाघीण
बनुबाईंचे काम डरकनाऱ्या वाघिणी प्रमाणेच होते. कुठे अन्याय अत्याचार झाल्याचे कळताच त्याच्या दुसऱ्या दिवशी कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून शेकडो महिलांचे नेतृत्व करणारा त्यांचा मोर्चा ठरलेला असायचा. त्या सरकारी कार्यालयात आल्या कि अधिकारी त्यांना घाबरायचे. हातात निळा झेंडा घेतलेल्या बनुबाईंनी अनेकांना न्याय मिळवून दिला. अनेक विधवांना पेन्शन मिळवून दिली. नवरा नांदवत नसलेल्या स्त्रियांचा संसार पुन्हा उभा करून दिला. रेशानिंग धान्याचा प्रश्न असो वा विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न असो त्यांनी तो सोडवला. एकदा तर त्यांनी चक्क कार्यालयात अधिकार्यांसमोर बोंबाबोंब आंदोलन केले. जोवर मुलाना दाखले मिळत नाहीत तोवर थांबणार नाही असे फर्मावले मुलांचे दाखले तात्काळ निघाले.
त्यांचे काम अनेक वर्षापासून तहसीलदार कार्यालयात बसून पाहणारे नायब तहसीलदार बी एम गायकवाड त्यांच्याबद्दल सांगतात " गोरगरीब, विधवा, अपंग यांचे प्रश्न घेऊन नेहमी कार्यालयात येत असायच्या. त्या खूपच तळमळीने आणि आक्रमकपणे लोकांच्या समस्या मांडतात. अन्यायाविरोधात कायम त्या संघर्ष करतात. सामान्यांसाठी काम करणारी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत त्यातीलच त्या एक आहेत.
या कार्यालयात लिपिक पदावर असलेले राजेंद्र चव्हाण सांगतात बनुताई येलवे यांनी अन्याय कधीच सहन केला नाही. त्यांनी अनेक आंदोलने केली.त्यांच्या आंदोलनांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बळ होते. त्यांनी संविधानाच्या मार्गाने अतिशय आक्रमकपणे सामान्यांच्या समस्या सोडवल्या.
त्यांची आंदोलने देखील अनोखी असायची. त्यांच्या गावी नदीमध्ये वाळूतस्कर बेकायदा जिलेटीनचा वापर करून स्फोट करायचे. त्या स्फोटाने नदीतील अनेक मासे मृत होत होते. स्फोटामुळे नदी काठावर असलेल्या दलित वस्तीतील घरांचे देखील नुकसान होत होते. अनेकदा अर्ज करूनही याची दखल घेतली जात नाही हे पाहून बनुबाईनी काय केले त्या स्वतः सांगतात. " मी ते मेलयाल मोठमोठ मासं गोळा केलं. ते गाडीत भरून तहसिलदाराच्या गेटवर नेऊन टाकल. माशाच्या वासान तहसीलदार हैराण झाले. कर्मचार्याना म्हणाले मी तहसीलदार आहे का कोण हाय ? हि घाण का म्हणून हिथ टाकल्या. यावर मी त्यांना माजी समस्या सांगितली. तिथूनच ते घटनास्थळावर माझ्याबरुबरन आले. वाळू तस्करांच्या गाड्या जप्त केल्या". प्रश्न सुटेपर्यंत त्यांनी कधीही माघार घेतली नाही. गरिबांना रेशनिंग मध्ये दिला जाणारा किडका सडके धान्य त्यांनी तहसील कार्यालयात नेऊन फेकले होते.
महापुरामुळे अनेक गरिबांचे नुकसान होत होर्ते. पण खऱ्या नुकसानग्रस्तांची नावे तलाठी जाणीवपूर्वक वगळत होते. सांगूनही तलाठी बनुबाईंचे ऐकत नव्हते. तेच तलाठी जोशी नावाच्या तहसीलदार साहेबांच्या सोबत गावात आले होते. बनुबाइनी तहसीलदारांचा यथोचित सत्कार केला. पण गरिबांना त्रास देणाऱ्या तलाठ्याचा सत्कार फुल देऊन कसा करायचा म्हणून त्यांनी पिशवीतून आणलेला चपलांचा हार त्या तलाठ्यांच्या गळ्यात अडकवला.
बनुबाई अक्षर अडाणी होत्या पण त्यांचे संघटन कौशल्य चांगले होते. त्या परिसरात त्या पांढरी साडी वाली बाई म्हणून ओळखल्या जात होत्या.अंगठेबहाद्दूर असणाऱ्या त्यांच्या मागे आवाज देताच शेकडो महिला जमा व्हायच्या. त्यांनी परिसरात मोठे संघटन उभे केले होते. स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा दबावगट निर्माण झाला होता . त्यांनी विलास उंडाळकर यांच्या विरोधात आमदारकी निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना आठ हजार मते मिळाली.
अहोरात्र समाजासाठी राबणाऱ्या बनुबाईंचे स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होते. पण चळवळीचा घेतलेला वसा त्यांना सोडवत नव्हता.त्यांची मुलगी कमल सावंत या सांगतात " आई अडाणी होती पण एक दिवस वाघ होऊन जगा हे बाबासाहेबांचे वाक्य तिने ऐकलेले होते. ती आयुष्यभर स्वाभिमानाने जगली. कुणापुढे झुकली नाही. वाळू तस्कर पैसे घेऊन यायचे पण तो पैसा तिने नाकारला. ती गरिबीत जगली पण वाघासारखीच जगली.
बनुताई ऐन उमेदीच्या काळात स्वतःच्या घरावर विस्तव ठेवून समाजासाठी अहोरात्र झटल्या. यावर त्यांची मुलगी किरण सावंत उद्विग्न सवाल करतो . "ज्या समाज्यासाठी आईने स्वतःचे आयुष्य वेचले त्या समाजाने तिला काय दिले? या पडक्या मातीच्या भिंती ? हे गळके घर? कि आई ज्या ओल्या जमिनीवर झोपते ती झिरपणारी भुई? आयुष्यभर प्रामाणिक काम करणाऱ्या आईला शेवटचे आयुष्य काढायला साधे घर नाही कि त्या घरात झोपायला जागा नाही.
किरण सावंत यांनी मुलगी म्हणून उपस्थित केलेल्या या सवालाचे उत्तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून द्यायची हिम्मत समाजाची आहे का ? बनुबाइनि कार्यकर्ती म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडताना त्यांचे आयुष्य देशोधडीला लावले पण समाज म्हणून त्यांना जगवण्याचे कर्तव्य समाजाने पार पाडायला हवे. त्यांनी स्वतःसाठी कधी आंदोलने केली नाहीत. बाबासाहेबांच्या विचारांनी निळा झेंडा घेऊन डरकनारी हि वाघीण पडक्या घरात आजाराने निपचित पडली आहे. तिला साथ देण्याची जबाबदारी आपण पेलायला हवी. ती जर नाही पेलली तर उद्या हातात निळा झेंडा घेऊन समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराविरोधात डरकनारी पांढर्या साडीची दुसरी भीमाची वाघीण कशी घडेल?