'ही' माणसं अशी गाडीच्या टपावर का बसत असतील?

Update: 2021-05-24 09:45 GMT

"Silence is the powerful enemy of social justice"

केळी, संत्रा यांचे बाग उतरवले की तो माल ट्रक, टिपर मध्ये भरून बाजारात नेल्या जातो. हे ट्रक टीपर भरणारे मजूर... मजूर नसून मजबूर असतात. ही मजबूर लोक प्रत्येक क्षणाला आपल्या जीवाला उदार झालेली असतात.

गाडी भरायच्या आधी

आणि

गाडी भरल्या नंतर सुद्धा...

ही बिचारी टपावर बसून च प्रवास करतात. कारण गाडी कॅरेट नी फुल झालेली असते.

(भलेही ती कॅरेट रिकामी असो वा भरलेली)

कारण गाडीचे वेट हे फुल असलेल्या कॅरेट वर गृहीत धरतात. आणि त्यात मजूर कुठं बसतील किंवा त्यांचं अस्तित्व सुद्धा गृहीत धरलेले नसतं. मग यातील कोणी कधी अचानक आलेल्या तारेला लटकून मरतो. कोणी गाडीला धक्का लागला की मरतो... किंवा कधी कुठलेही अनुचित घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली तरी मरतो. तर त्या घटनेचा पहिला विपरीत जीवघेणा परिणाम टपावर बसलेल्या मजबूर लोकांवर सर्वात आधी आणि सर्वात गंभीर होतो.

वरून त्या वर बसलेल्या बाबत ना गाडी मालकाला विशेष प्रेम असतं ना ही ज्याचा माल आहे त्यांना. त्यामुळे जसे गाडीचे नुकसान किंवा मालाचे नुकसान होऊ शकतं. तसं त्या गाडीवर बसलेल्यांच्या जीवांचे किंवा हातपाय तुटले तर त्या बाबतचे नुकसान गृहीत ही धरलेले नसते. गाडीला विमा असू शकतो, वर बसणारे कुठल्याही एम्प्लॉयमेंट योजनेचे लाभार्थी नसतात, त्यामुळे पुनर्वसन, कंपनशेशन वगैरे शब्दांचा मग काही अर्थ च उरत नाही.

पण हे लिहिण्याचे मग कारण काय....?

टिपर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून... आपली 'system'

टिपर चालवणारे म्हणजे व्यवस्थेचे वाहक... अन् त्या टिपर वर बसलेले मजबूर म्हणजे मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेले उपेक्षित मजबूर जेव्हा केव्हाही कुठलाही धक्का व्यवस्थेला बसायला लागला.

की त्याचे पहिले जीवघेणे पडसाद त्या मजबूर लोकांवर होतात. ही तीच लोक आहेत. जी दारिद्र्य रेषेच्या कार्ड साठी तर पात्र असतात. पण बहुतांश ते योजनेत समाविष्ट नसतात. उज्ज्वला योजनेसाठी लाभधारक ठरतात. पण हातावर असलेले पोट उज्ज्वला गॅस च्या खर्चात देखील गुद्मरायला लागतं. अश्या वेळी जेव्हा ' राष्ट्रीय' आपत्ती येते...(म्हणजे जेव्हा टिपर चे चालक धोक्यात येतात)

तेव्हा आधीच ऑक्सिजन वर असलेली ती मजबूर व्हेंटिलेटरवर वर जातात. तशी ही मजबूर स्वातंत्र्यापासून उपेक्षित च होती. त्यांना आर्थिक वाढीच्या किंवा विकासाच्या प्रक्रियेत स्थान च नसते. म्हणजे १९९१ साली आलेले आर्थिक आरिष्ट असो की, आता असलेला covid 19 असो. जेव्हा जेव्हा देशातील विशिष्ट घटक अडचणीत येतो.

तेव्हा ती घटना राष्ट्रीय होऊन जाते. पण त्या घटनेच्या आधी आणि नंतर ही मजबूर लोकांच्या अवस्थेत फारसा फरक पडत नाही. आणि पडलेला ही नाही. (LPG च्या फायद्यावर तुलनात्मदृष्ट्या चर्चा या निमित्ताने होऊ शकते)

Manual scavenging असो की टीबी, malaria, डेंग्यू असो.... ही मजबूर माणसे गरिबी, जाती व्यवस्था यांच्या प्रभावाने मरतच आलेली आहेत. बरं अशी कुठली आपत्ती नसली तर, जातीय, प्रांतीय, धार्मिक अत्याचाराला ही मजबूर माणसे बळी पडतात. त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे जेव्हा सगळे ठीक चालू असतं. तेव्हा देशाच्या इतर भागातून येणारे ही मजबूर माणसे 'परप्रांतीय' नावाखाली झोडपल्या जातात. बरं परप्रांतीय असणे. हा जर त्यांचा गुन्हा असेल तर मग प्रत्येक परप्रांतीय झोडपायला हवा ना? म्हणजे IT कंपनी मध्ये काम करणारा ही परप्रांतीय असतो.

मुंबईमध्ये येऊन उद्योग उभा करणारा, कलाकार, अभिनेता, गायक, बिल्डर व तत्सम अनेक जण ही परप्रांतीय असतातच. पण त्यांच्याकडे आदराने पहिल्या जाते. रस्त्यावर चा पाणीपुरी, भाजीपाला वाला यांच्याकडे आपण कसं पाहतो? कारण त्याचं काम ' हलक्या' दर्ज्याच ठरवलेले आहे.. आणि ते हलके का आहे? तर जातीय व्यवस्थेने त्यांना तसे काम करण्यास प्रवृत्त केलेले असतात.

ते त्यांच्या प्रदेशात ही vulnerable असतात.. आणि पोट भरण्यासाठी आलेल्या प्रांतात सुद्धा.... कारण या व्यवस्थेने त्यांना सक्षम बनविण्यासाठी विशेष असे काही प्रामाणिक पणे केलेले नसतेच. किंवा तशा संधीही निर्माण केलेल्या नसतात.

आज जेव्हा कोरोनाने त्या टिपर चे ड्रायव्हर (व्यवस्थेचे चालक) म्हणजे 'तथा कथित मोठी ' माणसे मरत आहे. तेव्हा आपण म्हणतोय की कोरोना गरीब, श्रीमंत, उच्च नीच्च न बघता बळी घेतोय. तेव्हा मला असं वाटतं की, आपल्या सर्वांचं आकलन नॅरो ठरतंय. कारण ' ही मोठी' माणसे त्यातील बरीच जणं ही योग्य वेळी, योग्य उपचार मिळवून चांगली ही होत आहेत. किंवा जी दुर्दैवाने जात ही आहेत (त्यांचं ही दुःख च आहे) ती बहुतांश ICU, व्हेंटिलेटर, चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, उपलब्ध सर्व वैद्यकीय सुविधा घेऊन दुर्दैवाने जात आहेत.

पण ती मजबूर...??? त्यांना साधं रेमडेसीवर, बेड, CT scan साठीचा खर्च सुद्धा manage करताना आयुष्याची मिळकत खर्च करावी लागतेय. हे सगळं अपवादाने मिळालेच तर त्या नंतर उपचाराच्या खर्चाने ही माणसे दारिद्रयाखाली खंगून जातील.

संविधानातील संधीची समानता आयुष्यभर न मिळालेल्यांच्या नशिबी सन्मानाचा उपचार आणि मृत्यू सुद्धा नशिबी नसणे... हा त्यांच्या नशिबाचा नसून, व्यवस्थेचा दोष आहे. इतके असूनही उद्या हा कोरोना संपला की, होणाऱ्या आनंदोत्सवात सुद्धा ही मजबूर माणसे तशीच मरणासन्न अवस्थेत राहणार. जशी ती कोरोना आधी होती आणि कारोना काळात तर ती त्या पेक्षा ही भयानक अवस्थेत आहेत..

अमर्त्य सेन त्यांच्या argumentative Indian या पुस्तकात म्हणतात की

"Silence is the powerful enemy of social justice"

आणि म्हणून विशेषतः अश्या काळात किंवा या संकटा नंतर तरी आपण आपल्या मुक असलेल्या समूहाच्या प्रश्नाबद्दल पोट तिडकिने बोलत राहू.

त्यामुळे फारसे परिवर्तन होऊन टिपर ची चालकी किंवा मालाची मालकी मिळेल की नाही माहिती नाही. पण निदान ५-१०% कॅरेट टिपर बाहेर फेकून. स्वतःचे सुरक्षित स्थान आपण या व्यवस्थेत पुढील पिढीला देऊ शकू.

सौरभ हटकर

Tags:    

Similar News