Sachin Vaze Case: शरद पवारांच्या मौनाचा अर्थ काय?
सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार शांत का? सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे का? शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संजय राठोड, सचिन वाझे प्रकरणावरून दुरावा निर्माण झाला आहे का? काय राजकीय विश्लेषकांचं मत?
गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत आहे. या सर्व प्रकरणावर शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. मनसुख हिरेन प्रकरण सरकारला हाताळताना अपयश आलं. असं पवारांचं मत असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळेच शरद पवार यांनी सचिन वाझेवर प्रकरणावर बोलण्यास टाळलं आहे.
सचिन वाझे यांना NIA ने 13 फेब्रुवारीला रात्री उशीरा अटक केली होती. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, यावर पवारांनी मौन धारण केलं. मी काय सांगू शकणार नाही. असं म्हणत पवारांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
25 फेब्रुवारीला अंबानीच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. मात्र, ज्या मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळला. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस विधानसभेत केला. आणि सरकारला कात्रीत अडकवण्याचा प्रयत्न केला. तसंच हिरेन यांच्या पत्नीने देखील सचिन वाझे यांनी त्यांच्या पतीचा खून केला असा आरोप केला होता. हे सगळं होत असताना महाविकास आघाडी सरकार या सर्व प्रकरणावरून बॅकफूटला गेले.
हे सगळं होत असताना इतर प्रकरणात शरद पवार स्वत: हस्तक्षेप करुन महाविकास आघाडीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, संजय राठोड प्रकरण असो किंवा संजय वाझे यांचं प्रकरण असो शरद पवार यावर बोलताना पाहायला मिळाले नाही. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांच्या मौनाचा अर्थ काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी आम्ही बातचीत केली... ते म्हणाले...
पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार या सरकारचे मार्गदर्शक आहेत. मात्र, प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणा वेगळ्या आहेत. या यंत्रणांबाबत शरद पवार काही बोलणार नाहीत. कारण गृहमंत्री, सरकारमध्ये असलेले व्यक्ती हे सगळे वेगळे आहेत. प्रत्यक्ष काम करणारे व्यक्ती वेगळे आहेत. त्यामुळं या सर्व प्रकरणांमध्ये तपास होत असताना पवार बोलले नसावेत. आणि ते बरोबरच आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे संजय राठोड प्रकरण असो किंवा आत्ताचे संचीन वाझे प्रकरण असो हे दोनही प्रकरण सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळली. या दोन्ही प्रकरणात सरकारची अब्रू गेली. आपल्याच सरकार संदर्भात शरद पवार नापसंती कसे दर्शवणार? त्यामुळं पवार बोलायचे टाळतात.
विशेष बाब म्हणजे या दोनही प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनासमोर पाहायला मिळाल्या. कारण संजय राठोड असो अथवा सचिन वाझे असो हे शिवसेनेसंदर्भातील व्यक्ती. आणि गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेचं प्रकरणं असल्यामुळे राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्री स्वत: यामध्ये लक्ष घालतील असा विचार राष्ट्रवादीने केला तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असल्याने शिवसेनेने या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एकंदरींत महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने हे सर्व घडलं. असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.
या सर्व प्रकरणांनी ठाकरे सरकार अडचणीत आले आहे का? असा प्रश्न केला असता विजय चोरमारे यांनी अडचणीत येणार नाही. मात्र, जी अब्रू गेली ती काही कमी नाही. यापेक्षा अधिक काही घडेल असं वाटत नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
या सर्व प्रकरणावर आम्ही राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले...
पवारांचं मौन राहणं योग्य आहे. या सर्व प्रकरणामध्ये अजुनही तपास सुरु आहे. आणि तपास सुरु असताना शरद पवार शक्यतो भाष्य करण्याचे टाळतात. पहिल्या टप्प्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर ते बोलतील. सध्या अपुर्ण माहितीवर बोलण्याचं ते टाळत आहेत.
सध्या सरकार या प्रकरणाने अडचणीत आले आहे का? असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी सरकार अडचणीत आलं आहे. हे खरं आहे. मात्र, सरकार पडेल असं काही नाही. मात्र, या सर्व प्रकरणाने शिवसेना एकटी पडल्याचं दिसून येतंय. विधानसभेत शिवसेना एकटी पडली. विशेष म्हणजे भास्कर जाधव सोडता, अनिल परब सोडता. शिवसेनेकडून कोणी बोलताना दिसलं नाही. राष्ट्रवादीच्या वतीनं देखील यावर स्पष्ट बोलताना पाहायला मिळालं नाही. कॉंग्रेसचे नाना पटोले सोडता कोणीही बोललं दिसत नाही.
एकंदरींत या सरकारमध्ये समतोल दिसला नाही. मात्र, सरकार पडेल असं काही नाही. राष्ट्रपतींची राजवट आणण्याचं प्रयत्न करु शकतात.. मात्र, तसं सध्या राज्यात वातावरण नाही. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस एक एक फाईल तयार केली जात असल्याचं बोलले होते. त्यामुळं सध्या अशा प्रकरणांच्या फाईल एकत्रीत करुन राज्यपाल राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. सध्या 5 राज्यांच्या निवडणूका आहेत. त्या तोंडावर सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करेल असं वाटत नाही. असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणतात... शरद पवार यांच्या विधानामुळे तपास यंत्रणांवर दबाव येऊ नये. म्हणून शरद पवार शांत आहे. आणि त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. म्हणून शरद पवार शांत असावेत.
पाहिलं तर शरद पवार त्या अर्थाने या सरकारचा भाग नाही. ते मार्गदर्शक आहेत. मात्र, एक बाब निश्चित आहे. या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये दुरावा वाढल्याचं दिसून येतं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुर्वी जसं ट्युनिंग होतं तसं राहिलेलं नाही.
या सर्व प्रकरणांनी सरकार पडेल का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर संजय आवटे म्हणाले... अशा प्रकारचे प्रयत्न सक्षमपणे सुरु आहेत. मात्र, त्या सक्षमतेने महाविकास आघाडी त्यांच्याविरोधात उभी आहे. हे वाटत नाही. भाजपच्या प्रयत्नांना महाविकास आघाडी म्हणून हे तीनही पक्ष समक्षमपणे उत्तर देताना दिसत नाही. असं मत संजय आवटे यांनी व्यक्त केलं आहे.
एकंदरीत शरद पवारांच्या मौनाबाबत सर्व तज्ज्ञांची मत पाहिली तर शरद पवार तपास सुरु असल्याने बोलत नसावेत. असं मत व्यक्त केलं आहे. मात्र, सरकार पडेल का? यावर तज्ज्ञांच्या मते इतक्यात ते पडणार नाही. त्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये समतोल नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे हे असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे मुख्य आहेत. जून २०२० मध्ये वाझे यांचे निलंबन मागे घेण्यात येऊन त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले होते. १९९०च्या दशकात वाझे यांची ठाण्यात बदली झाली. तेव्हा मुंबईत माफियांचा धुमाकूळ सुरू होता. वाझे यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केले. सचिन वाझे यांनी आतापर्यंत अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. पण २००२मध्ये मुंबईतील एका बॉस्बस्फोटाची चौकशी करत असताना ख्वाजा युनूस याला ताब्यात घेण्यात आले होते. पण या ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा आरोप झाला आणि काही अधिकाऱ्यांवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला त्यात सचिन वाझे हे सुद्धा होते. त्यानंतर याच प्रकरणा त्यांनी २००४मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सचिन वाझे यांचे निलंबन रद्द झाले आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमचे नेतृत्व वाझे यांनीच केले. तर अर्णब गोस्वामींना अडचणीत आणणाऱ्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.
या गोंधळामुळे 9 मार्चला विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली.