Russia VS Ukraine : भारताची चिंता का वाढली ?

रशिया युक्रेन युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. पण हे युद्ध लांबले तर मात्र भारतावर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. हे दुष्परिणाम केवळ आर्थिक नाही तर चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताच्या धोरणाला मारक देखली ठरु शकतात....त्यामुळेच भारताची चिंता वाढली आहे.

Update: 2022-02-24 09:51 GMT

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला सुरूवात केली आहे. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. पण भारतासाठी या संघर्षामधून काही महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर युक्रेनच्या समर्थनार्थ युद्धात उतरण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच युरोपातील देशही रशियाविरोधात उतरण्याची शक्यता आहे. पण युक्रेनवर हल्ला कऱण्याची गरज रशियाला का वाटली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले की रशियाच्या ३ महत्त्वाच्या मागण्या आहेत.




 


रशियाच्या ३ मागण्या

१. 'नाटो'चा पूर्व युरोपमधील विस्तार थांबवण्यात यावा आणि युक्रेनला नाटोचा सदस्य करुन घेऊ नये

2. रशियाच्या आसपास अमेरिकेने क्षेपणास्त्र आणि अश्वस्त्र तैनात करणं सुरू केले आहे ते थांबवावे

३. युरोपमध्ये १९९७ पूर्वीची सुरक्षा संरचना पुन्हा स्थापन करण्यात यावी.

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताचा इंधन खर्च वाढणार

या वादात भारताने सध्या शांततेच्या मार्गाने वाद सोडवला जावा अशी भूमिका घेतली आहे. कारण भारतावर या युद्धाचे परिणाम जास्त होणार आहेत. युद्ध सुरू झाल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्स विक्री केले आहेत. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलर इतक्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. हा दर २०१४ नंतरचा उच्चांकी दर ठरला आहे. यामुळे देशाचा इंधनावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढून महागाई वाढण्याची शक्यता आहे.

भारताच्या संरक्षण सज्जतेवर दुष्परिणाम?

भारतासाठी या युद्धामुळे चिंता वाढण्याचे कारण म्हणजे रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा लष्करी साहित्य पुरवठादार आहे. भारताकडे असलेल्या ५० टक्क्यांच्यावरील शस्त्रं ही रशियन बनावटीची आहेत. तसेच रशियाकडून भारताला येत्या काळात क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा दिली जाणार आहे, पण हे युद्ध आणखी चिखळले आणि रशियावर निर्बंध आले तर भारताला होणारा हा शस्त्रपुरवठा थांबू शकतो.




 


युक्रेन-रशिया वादाचा फायदा घेऊन चीनची खेळी?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी वाढत गेले तर रशिया चीनची मदत मिळवू शकतो अशी शक्यता आहे. पण असे झाले तर या दोन्ही देशांची मैत्री भारताला डोकेदुखी ठरु शकते. त्यातच एकीकडे पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला कऱण्याची घोषणा केली आणि दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रशियामध्ये पाऊल ठेवले. इमरान खान हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या युद्धामुळे त्यांचा दौरा रद्द झालेला नाही. या पार्श्वभूमीवर रशिया-चीन आणि पाकिस्तान यांचे त्रिकुट एकत्र आले तर भारताची चिंता वाढू शकते.


 



भारतावर जगभरातून दबाव?





 


रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा मित्र आहे. पण अमेरिकेला भारताने रशियाविरोधात भूमिका घ्यावी असे वाटते आहे. तर युक्रेनने देखील मोदी यांचे पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील वाद हा संघर्षाने नव्हे तर शांततेने आणि सुसंवादाने मिटावा अशी भूमिका भारताने घेतली आहे. पण हे युद्ध आणखी लांबले तर अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांची आपल्याला असलेली गरज लक्षात घेता भारताची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशीच सगळ्यांची इच्छा आहे.

Tags:    

Similar News