बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या शहाजनपूर चकला या गावातील 4 मुलांचा, सिंदफना नदीत वाळूमाफियांनी केलेल्या खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. 9 ते 13 वयोगटातील या मुलांच्या मृत्यूने, गावावर शोककळा पसरली आहे. या वाळू माफियांनी सिंदफणा नदीमध्ये 10 ते 15 फुटापर्यंत खोल असे खड्डे केले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज कळत नाही. .तच ती मुलं गेल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ऊसतोड कामगारांची ही मुलं होती. त्यांचे आई-वडील कर्नाटकात ऊसतोडणीसाठी गेले होते.
या वाळूमाफियांविषयी अनेकवेळा तक्रारी केल्या, मात्र याची दखल ना पोलिसांनी घेतली ना महसूल प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहेय या मुलांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वाळूमाफियांसह कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांची मागणी
दरम्यान या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. या घटनेकेड सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे ? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे म्हणणे काय?
यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. तसेच तो वाळू उपसा अधिकृतपणे सुरू होता की अनधिकृतपणे सुरू होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. अधिकृत उपसा असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात खोल खड्ड् का केला गेला, याची चौकशी केली जाईल असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.