रशिया युक्रेन वादाचे कारण ठरलेली NATO काय आहे?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचे ढग संपूर्ण जगावरही पसरू लागले आहेत. पण या वादाचे नेमके कारण काय आहे, 'नाटो' या वादाचे मूळ कारण असल्याचे सांगितले जाते, पण नाटो म्हणजे नेमके काय ते पाहूया....;

Update: 2022-02-25 06:15 GMT

रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाचे मोठे कारण म्हणजे NATO सांगितले जाते. पण हे NATO काय आहे, ते आपण पाहूया.... NATO (North Atlantic Treaty Organisation) म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटना....NATO ही एक लष्करी संघटना आहे. या संघटनेची स्थापना १२ देशांनी १९४९ साली केली होती. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडा या देशांचाही समावेश आहे. या संघटनेच्या नियमानुसार संघटनेचा सदस्य असलेल्या कोणत्याही देशावर हल्ला झाला तर या संघटनेतील इतर देश त्या देशाच्या मदतीला येतील.

NATOची स्थापना का झाली?

NATOच्या स्थापनेमागे सगळ्यात मोठे कारण सांगितले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर रशियाचा वाढता विस्तार रोखण्यासाठी NATO स्थापना करण्यात आली होती. यानंतर मग रशियाने देखील नाटोला उत्तर देण्यासाठी नवीन संधटनेची स्थापना केली. वॉर्सा करार नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेमध्ये युरोपमधील साम्यवादी देश सहभागी झाले. ही सुद्धा एक लष्करी संघटना होती. पण १९९१मध्ये रशियाचे विघटन झाले आणि इथूनच खऱ्या अर्थाने या वादाला वेगळे वळण लागले. वॉर्सा करार संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाटोमधील सदस्य देशांची संख्या ३० झाली आहे.



 



आता युक्रेनचा या वादाशी संबंध काय ते पाहूया....

१९९१ मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. त्यामधून अनेक छोट्या छोट्या देशांची निर्मिती झाली. युक्रेन देखील यापैकीच एक छोटासा देश...युक्रेनची सीमा ही रशिया आणि युरोपला लागू आहे. पण युक्रेन हा नाटो संघटनेचा आजतागायत सदस्य झालेला नाही. पण युक्रेन नाटोचा सदस्य होऊ शकतो, अशी शक्यता आहे. आणि हाच रशियासाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. युक्रेनला नाटोचे सदस्य करुन घेणार नाही, अशी खात्री अमेरिकेसह इतर सदस्य राष्ट्रांनी द्यावी अशी भूमिका पुतीन यांनी घेतली आहे. पण अमेरिकेने मात्र युक्रेनला नाटोचा सभासद करुन घेण्याची तयारी केली आहे. कोणत्या संघटनेचा सभासद व्हायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार युक्रेनला आहे, कारण युक्रेन हा एक स्वतंत्र देश आहे, अशी अमेरिकेची भूमिका आहे.



रशियाचे म्हणणे काय?

रशियासाठी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, कारण युक्रेनमध्ये रशियन वंशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रशियाचे इथे भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नाते आहे. तर दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना नाटोच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांचा रशियाला घेरण्याचा डाव असल्याचा संशय आहे. त्यामुळे नाटोने या परिसरातील लष्करी हालचाली थांबवल्या पाहिजेत, अशीही पुतीन यांची भूमिका आहे. त्याचबरोबर पूर्वेत नाटोचा विस्तार करणार नाही, असे आश्वासन अमेरिकेने दिले होते, पण ते आश्वासन पाळले गेले नाही, असा पुतीन यांचा आरोप आहे.


 



युक्रेनमध्ये रशियाला कोण पाठिंबा देत आहे?

युक्रेनमधील लोकांनी मदतीचे आवाहन केले आहे म्हणून रशियाने पुढाकार घेत कारवाई केल्याचा दावा पुतीन करत आहेत. वास्तविक पाहता ८ वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये रशिया धार्जिण्या राष्ट्राध्यक्षांविरोधात उठाव झाला आणि त्यांना आपले पद सोडावे लागले होते. या दरम्यान रशियाने क्रिमीयावर हल्ला करत तो प्रदेश आपल्या भागाला जोडून घेतला. खरे पाहता नाटोनं युक्रेनमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नव्हता. पण त्यानंतर पूर्व युरोपमधील सदस्य देशांमध्ये नाटोने आपले सैन्य उतरवले होते. त्यामुळेच युक्रेन नाटोचा सदस्य होऊ नये यासाठी रशियाचे सर्व प्रयत्न सुरू असून त्यांनी आता थेट युद्धाची भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत, त्यांचे वर्चस्व असलेले दोन प्रांत सगळ्यात आधी ताब्यात घेतले होते.




 


Tags:    

Similar News