Special Report : बहिणीच्या कापलेल्या मुंडक्यासोबतची सेल्फी पाहून समाज त्याला प्रतिष्ठा देईल?

सैराट चित्रपटाच्या शेवटाने समाजातील जातीव्यवस्थेचे एक भीषण वास्तव मांडले....अशीच एक घटना प्रत्यक्षात महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी घडली...औरंगाबाद जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या मुलीला खोट्या प्रतिष्ठेपायी तिच्या भावाने आणि आईने मारुन टाकले....केवळ मारले नाही तर तिचे शीर धडावेगळे करत सेल्फीही काढला....या सेल्फीमधून त्याला काय संदेश द्यायचा होता? समाजातील जातीव्यवस्थेमागची मानसिकता कशी बदलू शकते, सिनेसृष्टी त्यात कसे योगदान देऊ शकते, याचा शोध घेणारा सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2021-12-19 08:25 GMT

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला. प्रेमविवाह केलेल्या बहिणीच्या गावी तिचा भाऊ आईसोबत गेला, तिच्याच घरात संतापात त्याने गरोदर असलेल्या बहिणीच्या गळ्यावर कोयत्याने सपासप घाव घातले. हालचाल होऊ नये म्हणून जन्मदात्या आईने तिचे पाय धरले होते. धडावेगळ झालेलं बहिणीचे मुंडके केसाने धरून त्याने घराबाहेर आणले. त्याच्यासोबत सेल्फी घेतला. खुनच करायचा उद्देश असेल तर त्याने मुंडक्यासोबत सेल्फी का घेतला असेल? त्याला त्याने केलेला हा पराक्रम कोणाला तरी दाखवायचा होता. तो कोणाला दाखवायचा असेल? प्रेमविवाह करून समाजामध्ये गेलेली तथाकथित इज्जत बहिणीचे शीर कापून हातात घेतलेल्या सेल्फिने समाजातून भरून काढण्याचा त्याचा इरादा असेल का? प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या कुटुंबीयांवर अशा प्रकारचा सामाजिक दबाव असतो. मुलीला संपवल्यानंतर समाजात गेलेली ती तथाकथित इज्जत समाज परत देतो का ? अशा खुनाने त्या समाजाला समाधान होते का? तो ते समाधान उघडपणे खून करणाऱ्या व्यक्तीइतकेच उघडपणे व्यक्त करतो का ? की प्रेमविवाह करणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक दबाव टाकणारा समाज अशा खुनानंतर हळहळ व्यक्त करणाऱ्या गर्दीत देखील गुपचूप जाऊन मिसळतो.


 



प्रेमाविवाहांना विरोध करणारा हाच समाज पुन्हा या घटनेने हादरून जातो. त्याला वेदना होतात. या घटनेमध्ये समाज माध्यमावर झालेल्या चर्चेत काही लोक प्रतिक्रीया देतात की त्यांनी पोटच्या मुलीला मारले. मुलाला हात देखील लावला नाही, असे घडलेल्या घटनेचे समर्थन देखील करतात. अशा घटनांमध्ये प्रत्यक्ष खून करणारा खुनी ही एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर खटले चालतात, त्याला शिक्षा मिळते. पण सामाजिक दबाव टाकून हे कृत्य करावयास भाग पाडणारा, असे करण्यास प्रेरित करणारा समाज मात्र त्याच्या अंगावर उडालेले रक्ताचे डाग पुसून पुन्हा त्याची पारंपरिक व्यवस्था जतन करायला तयार असतो. खुन्याला शिक्षा होते पण हिंसेला उत्तेजना देणारी ही व्यवस्था पुन्हा इतरांच्या इज्जतीचा हिशोब ठेवण्यासाठी अबाधित राहते. ही सामाजिक व्यवस्था अगोदर समजून घ्यायला हवी. ही समजून न घेता केवळ कायद्याची अंमलबजावणी करून अशा घटना थांबणार नाहीत. ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

समाजामध्ये आजही सर्वच जाती धर्मात प्रेम विवाहांना प्रखर विरोध होतो. यामध्येही आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेम विवाहांना होणारा विरोध यापेक्षाही अधिक तीव्र असतो. याचा दुसरा अर्थ केवळ ठरवून केलेल्या विवाहांना समाज मान्यता असल्याचे दिसून येते. या संदर्भात ग्रामीण भागात वाढलेले सांगली जिल्ह्यातील वेजेगाव येथील पत्रकार मनोज देवकर सांगतात " लग्न ठरवताना आजही कुळी-ढाळी पाहिल्या जातात. माझ्या समाजात शहाण्णव कुळी, वरचा की खालचा असे चेक केले जाते. या पलीकडे जाऊन कुणी जातीतच प्रेमविवाह केल्यावर देखील त्याला विरोध होतो. त्यांच्या कुटुंबातील इतर भावंडांची लग्ने ठरण्यास अडचणी येतात. समाजाकडून अशा कुटुंबांना दुय्यम वागणूक मिळते. पण मुलीने आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यास तिच्याशी नातेसंबंध तोडण्यात येतात. ती मेली म्हणून तिच्या वस्तू जाळल्या जातात. काही कुटुंबे तर त्या मुलीचे श्राद्ध तसेच तेरावे देखील घालतात. अशा प्रकारचे लग्न केलेल्या कुटुंबाची समाजातील इज्जत तसेच प्रतिष्ठा कमी झाली असे मानले जाते, ग्रामीण भागात ही व्यवस्था अजूनही टिकून आहे."

मुलीच्या प्रेमविवाहानंतर कुटुंबियांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. कुणी ती कायमची मेली असे म्हणून तिचे श्राद्ध घालून तिच्या वस्तू जाळते. कुणी तिच्याशी कायमचे नातेसंबंध तोडतात. तर कोण तिचा गळा आवळून खून करते. कोयत्याने धड वेगळे करते. यामध्ये त्या मुलीने कुटुंबाची इज्जत समाजामध्ये धुळीस मिळवली अशी भावना आणि त्यातून संताप असतो.

अशा दोन जोडप्यांना आम्ही भेटलो त्यातील दोन्ही उच्चवर्णीय मुलीने खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न केले आहे. दोन्ही जोडपी उच्चशिक्षित आहेत. या जोडप्यांना मुलांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. मात्र मुले होऊनही दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी इतक्या वर्षात एकदाही फोन केलेला नाही. संपूर्ण नातेसंबंध तोडून टाकले आहेत.

तर सामाजिक जाणीव असलेल्या एका प्रेमी युगुलांचे लग्न उच्च जातीय असलेल्या मुलीच्या वडिलांच्या पुढाकाराने झालेले आहे. पण मुलांना पाठींबा देणारी अशी कुटुंबे फारच कमी आढळतात. ज्या तरुणांना प्रेमविवाह करायचे आहेत त्यांना नातेसंबंध तोडण्याची तयारी असावीच लागते.

वैशाली रायते ही उच्च शिक्षित असलेली उच्चजातीय कुटुंबातून आलेली तरुणी सांगते. "प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या कुटुंबावर मोठा सामाजिक दबाव असतो. या मुली व्यतिरिक्त लग्नाच्या वयात आलेली काही भावंडे असतील तर त्यांची लग्ने होण्याची चिंता कुटुंबियांना असते. यामध्ये बहुतांश कुटुंबांमध्ये अशी वेळ येऊ नये म्हणून मुलीवर अगोदर पासूनच बंधने घातली जातात. तिच्या बाहेर फिरण्यावर बंदी घातली जाते. शिक्षणासाठी बाहेर जाण्यावर मर्यादा घातल्या जातात. यातूनही एखाद्या मुलीबाबत अशी काही शंका आल्यास अगोदरच आईवडील त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट करून घेण्याबाबत धमकी देतात." यातून जी मुलगी स्वतः स्वावलंबी आहे स्वतंत्र विचार करू शकते मानासिकदृष्ट्या जी खंबीर आहे, तीच निर्णय घेते. अन्यथा कुटुंबियांच्या दबावाला बळी पडावेच लागते. एखाद्या मुलीने अशा निर्णयासाठी वेळ घेतला आणि त्यापेक्षा लहान मुलीचे लग्न झाले तर यावर शंका उपस्थित केल्या जातात. या सगळ्यात कुटुंबाला मुलीच्या सुखापेक्षा एका गोष्टीची काळजी असते ती गोष्ट म्हणजे कुटुंबाची समाजातील इज्जत आणि प्रतिष्ठा."



 


कुटुंबांच्या इज्जत आणि प्रतिष्ठेचा मुलीच्या खाजगी आयुष्याशी काय संबंध आहे ? हे जाणून घेण्यासाठी या विषयातील अभ्यासक असलेल्या शिरीष वाघमारे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते सांगतात  "सुरवातीपासूनच जातीची, धर्माची, वंशाची उच्च समजली जाणारी इज्जत ही स्त्रीच्या योनीमध्ये आहे, असा एक समज समाजात रूढ आहे. त्यामुळे मुलीने अशा प्रकारचा विवाह केल्यास , दुसऱ्या मुलाशी प्रेम केल्यास ही इज्जत समाजात धुळीस मिळाली अशी तीव्र भावना तयार होते. असा विचार देखील कोणी मुलगी करत असेल तर ती इज्जतीशी छेडछाड समजले जाते. या विरोधात व्यक्त होणाऱ्या भावना या अतिशय हिंसक आणि तीव्र असतात. हा समज अनेक जातीत आहे. प्रत्येक जात ही तिच्या खालच्या जातीतल्या जातीसंदर्भात अशा प्रकारचे वर्तन करताना दिसून येते. पण आपल्यापेक्षा उच्च जातीय कुटुंबात मुलगी गेल्यास यावेळी काही प्रमाणांत समजून घेतले जाते. तसेच मुलाने खालच्या जातीची मुलगी केल्यानंतरही काही प्रमाणात समजून घेतले जाते."



 


चित्रपट, साहित्य, कला या क्षेत्रातदेखील स्त्रीच्या लैंगिकतेला काचेचे भांडे असेच समजले जाते. स्त्रीची अब्रू गेली म्हणजे सर्वकाही संपले, सर्वस्व संपले अशाच प्रकारे चित्र रंगवले गेले आहे. याबाबत भारतीय चित्रपट दिग्दर्शक दिलीप भोसले सांगतात " सैराट या मराठी चित्रपटाने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. पण अंतिमतः यातून कोणता संदेश जातो? आंतरजातीय विवाह केल्यानंतर ही अवस्था होते. हा संघर्ष करून देखील अशा विवाह इच्छुकांना रस्त्यावर येण्यासाठी खुनावण्याचे धाडस हा चित्रपट करत नाही. मग तो करावा की नको? असे द्वंद्व यातील परिणाम पाहून निर्माण होते. आंतरजातीय विवाह केलेल्या तसेच तो यशस्वी झालेली अनेक जोडपी देखील समाजात आहेत. त्यातील काहींना कुटुंबाने स्वीकारलेलेही आहे. याच वाटेवर नव्या तरुणांना येण्याचा तसेच त्यांना सुरक्षितता देण्याचे आवाहन करणारे प्रेरणा देणारे चित्रपट यायला हवेत. या संघर्षातून त्यांचा उभा राहिलेला संसार देखील साहित्य कला क्षेत्रातून दाखवला पाहिजे. तरच या विचाराने प्रगल्भ झालेले समाजमन तयार होईल. अन्यथा हे केल्यावर अशीच शिक्षा द्यायला पाहिजे असा नेगेटिव संदेश यातून जाईल."



 


एड. धम्मसागर भारती यांनी आजवर अनेक आंतरजातीय प्रेमविवाह लाऊन दिलेले आहेत. अनेक जोडप्यांना त्यांनी संरक्षण देखील दिलेले आहे. ते सांगतात "अशा प्रसंगी या जोडप्यांना कायदेशीर मदत देखील होत नाही. पोलीस देखील पारंपरिक विचार करून त्यांना त्रास देत असतात. बऱ्याचदा ते अशा जोडप्यांना आई वडिलांच्या हवाली करतात. कायद्याचे संरक्षण देऊन या कुटुंबाना सुरक्षित वाटेल अशी भावना निर्माण होत नाही. यावर कायद्याच्या पातळीवर अधिकाऱ्याना देखील जागृत करणे गरजेचे आहे." औरंगाबादच्या या घटनेच्या अगोदर देखील असे अनेक खून झालेले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होईल. पण ज्या समाजाच्या दबावाने असे टोकाचे पाउल उचलले जाते त्या समाजाच्या डोक्यात या विषयी जनजागृती करण्याचे काम करायला हवे. यासंदर्भात पाठ्यपुस्तकामधून, साहित्यातून तसेच कलेच्या माध्यमातून जागृती करणे गरजेचे आहे. अशा विवाहोईच्छुक तरुणांना कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.

Tags:    

Similar News