Ground Report : मुंबईत रेल्वे स्थानकावरून का निघते अंत्ययात्रा?

मृत्यूनंतर माणसाला मोक्ष मिळतो असं म्हणतात. म्हणूनच की काय आपण त्याची मृत्यूनंतरची वाट सोपी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हा प्रवास देखील सोपा नाही. आज आपण मंगळावर जात आहोत पण मुंबईत मात्र अंत्ययात्रेला कब्रस्तानात जाण्यासाठी रेल्वे पादचारी पुलाचा वापर करावा लागतोय. हे असं का आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा आमचे प्रतिनिधी शुभम पाटील Ground Report

Update: 2022-08-07 14:58 GMT

मृत्यूच्या भयाने मुकाच राहिलो,
जगता जगता मरत राहिलो,
मेल्यानंतर हाल सोसवेना,
देहाची विटंबना बघत राहिलो...

जेव्हा कुर्ला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून अंत्ययात्रा जाताना पाहिली तेव्हा ही चारोळी आपसुकच तोंडावर आली. सध्याच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात वावरणाऱ्या प्रत्येक मुंबईकराची अवस्था ही अशीच झालीये. आपलं धावपळीचं आयुष्य जगणारा प्रत्येक मुंबईकर हा कुटूंबासाठी सगळी धावपळ करत असतो. या धावपळीत तो समाजाचंही देणं लागतो हेच विसरून जातो. आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे हे त्याच्या गावीही नसतं. त्यामुळे आयुष्यभर त्याच्या वाट्याला देखील तेच कष्टाचं जगणं येतं. आता हे असं का म्हणालो ते पुढे वाचल्यावर आपल्याला कळेल.

ऑफीसवरुन घरी जात असताना कुर्ला स्टेशनला नेहमी प्रमाणे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत होतो. इतक्यात समोरच्या प्लॅटफॉर्मवरून मुस्लिम समाजाची एक अंत्ययात्रा जाताना दिसली. ती पाहताक्षणी एक कमालीचा धक्का बसला. इतकी वर्षे रेल्वेने प्रवास करत असताना कधीच प्लॅटफॉर्मवरून अंत्ययात्रा जाताना पाहिली होती. त्या अंत्ययात्रेत जवळपास १५० ते २०० जण सहभागी झाले होते. प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या पादचारी पुलावरून ती अंत्ययात्रा जात होती. तो पुल चढताना खांदेकरी तो मृतदेह तिरका करून वर जिना चढत होते. तो चढताना या गर्दीत जर एखादी दुर्घटना घडली असती आणि तिथे चेंगराचेंगरीचा प्रसंदग उद्भवला असता तर काय झालं असतं हा प्रश्न मनात डोकावला. कारण प्रभादेवी (तेव्हाचं एलफिन्सटन) स्थानकात झालेल्या चेंगराचेगरीचं उदाहरण अजुनही ताजच होतं. म्हणून मग मी या संपुर्ण प्रकाराच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं. साधी विचारपूस केली तर एक धक्कादायक वास्तव समोर आलं.




 


गेल्या अनेक वर्षांपासून अशा पध्दतीने कुर्ला स्थानकातून अंत्ययात्रा या निघतेय. कुर्ला पुर्वेला असलेल्या कुरेशीनगरमधील कब्रस्तानात जाण्यासाठी कुर्ला पश्चिमेतील नागरिकांना रेल्वेचा प्रवासी पुल वापरावा लागतो. इतकंच नाही तर कुर्ला पुर्वेतल्या स्थानिकांना थेट हार्बर लाईनच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरून अंत्ययात्रा काढावी लागते. आधीच या हार्बर लाईनच्या एका प्लॅटफॉर्मवर अप आणि डाऊनच्या रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्यात त्यात अंत्ययात्रा देखील त्या फलाटावरून जाते. या अंत्ययात्रेत किमान २०० ते ३०० नागरीक सहभागी झालेले असतात. अशात रेल्वे प्लॅटफॉर्मवर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी मी स्थानिक नागरिक तसेत सामाजिक कार्यकर्ते आसिफ नाईकवाडी यांच्यासोहबत बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले, " इथे वसलेला मुस्लिम समाज आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मानाने एकच कब्रस्तान आहे जे कुरेशी नगरला आहे. आणि तिथे जाण्यासाठी सोयीची वाट नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून इथला मुस्लिम समाज स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार आणि शासनाकडे याची मागणी करत आला आहे. सद्यस्थितीत नव्या पादचारी पुलासाठी लागणारा निधी मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वेला सुपुर्द केला आहे. या गोष्टीला दीड ते दोन वर्षे झाली पण अजुनही रेल्वेने कामाला सुरूवात का केली नाही हेच कळत नाही. मुस्लिम समाजालाही गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवरून अंत्ययात्रा काढून प्रवाशांना त्रास देण्याची इच्छा नसते पण दुसरा कोणता मार्गच नसल्याने आमचा देखील नाईलाज आहे. रेल्वे अधिकाऱ्यांशी देखील या प्रकरणी आमचं बोलणं झालं. पण रेल्वे अधिकारी काही आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. निधी मिळाला आहे आम्ही करून देऊ अशी उत्तरं आम्हाला आजवर मिळाली आहेत. अजुनही हे काम का झालं नाही याचं उत्तर मात्र आम्हाला रेल्वे अधिकारी देऊ शकलेले नाहीत."




 



सामान्य मुंबईकराच्या नशिबी असाच नाईलाज आलेला प्रत्येकवेळी आपल्याला पाहायला मिळतो. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण गेले वर्षभर साजरा करतोय. पण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठलेल्या भारताची आर्थिक राजधानी मुंबईत मात्र अजुनही जनतेला मृत्यूनंतरसुध्दा संघर्ष करावा लागतोय. पण यासाठी जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले असतात त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मी केला. कुर्ल्याचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकपर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यांना या एकुण परिस्थितीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "कुर्ला पुर्व परिसरात कुरेशीनगर परिसरात एकच कब्रस्तान आहे. कुर्ला पुर्वेचे बहुतेक नागरीक हे ७ नंबर प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या अंत्ययात्रा कुरेशीनगर येथे कब्रस्तानसाठी नेली जाते. त्यामुळे मी सातत्याने या संदर्भात मागणी करत होतो आणि ती मागणी मान्य देखील झाली आहे. मुंबई महापालिकेने ९ ते १० कोटींचा निधी मध्य रेल्वेला दिला आहे. रेल्वे देखील पुढील काही महिन्यात शक्यतो या पावसाळ्यानंतर या पादचारी पुलाच्या बांधकामाला सुरूवात होईल."

स्थानिक आमदार मंगेश कुडाळकरांनी हा चेंडू अलगदपणे रेल्वेच्या गोटात टाकला पण रेल्वेचं यावर काय म्हणणं आहे. त्यांची या प्रकल्पाची तयारी कुठवर आली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला माहिती देताना म्हटलं की, "प्रस्तावित पादचारी पुलाच्या टेंडरसाठी चे काम सध्या सुरू असून पुढच्या १५-२० दिवसांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. टेंडर दिल्यानंतर लगेच कामाची सुरुवात करता येईल."

स्थानिक आमदार आणि रेल्वे प्रशासनाच्या प्रतिक्रीया वाचल्यानंतर आता आपल्या लक्षात आलं असेल की मुंबईकरांवर ही अवस्था का आली आहे. मुंबईकर हा आत्मकेंद्री होत चालला आहे असं मी जे सुरूवातीला का म्हणालो हे देखील आता आपल्याला कळालं असेल. तरी काही जागृक नागरीक हे आपापल्या परीने शक्य होईल तसे परीसरातील समस्यांबाबत आवाज उठवत असतात. जर प्रत्येक मुंबईकराने जागृकता दाखवली तर काय होईल याचा अंदाज आपण लावूच शकता. उदा., कुर्ला येथील हा पादचारी पुल या आधीच बांधून तयार झाला असता आणि या अंत्ययात्रा रेल्वे प्लॅटफॉर्मवरून नेण्याची वेळ आली नसती.

प्लॅटफॉर्मवरच्या या अंत्ययात्रा थांबवायच्या असतील तर रेल्वेने प्रस्तावित पादचारी पुलाचे टेंडर लवकरात लवकर काढायला हवेत आणि जलद गतीने कामाला सुरूवात करायला हवी. रेल्वेने जर यापुढेही या कामाला विलंब केला तर रेल्वे परीसरात या अंत्ययात्रांमुळे होणाऱ्या भविष्यातील दुर्घटनांची जबाबदारी घेण्याची तयारी देखील ठेवावी.


Full View

Tags:    

Similar News