मुंबईत इमारत सोडून झोपडीत राहण्याकडे कल
मुंबईतील झोपडपट्ट्या कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. पण तरीही नागरिक इमारत सोडून झोपडपट्टीत रहायला का येतात?, इमारत नको झोपडीच बरी असं नागरिक का म्हणतात? या प्रश्नाचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट;
सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात 15 हजार झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये 65 लाख नागरिक राहतात. त्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने माहुल गाव आणि गडकरी खान येथे घरं दिले आहेत. मात्र तरीही हे नागरिक पुन्हा झोपडी बनवून झोपडपट्टीत रहायला आले आहेत. पण याचे नेमके कारण काय आहे? हे विचारले असता, आम्हाला ज्या ठिकाणी जागा दिली आहे. तिथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. ती जागा जंगलात आहे. तसेच त्या ठिकाणी रात्री रस्त्यावर साप दिसून येतात. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला तिकडे नको, अशी भूमिका स्थानिक महिलेने व्यक्त केली.
दुसऱ्या एका महिलेने इमारत सोडून झोपडीत रहायला का आलात? या प्रश्नावर उत्तर देतांना सांगितले की, तिकडे आमच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा नाही, दवाखाना नाही, लाईटची सुविधा नाही. रात्री रस्त्यावर साप दिसतात. शौचालयाच्या फरशा निघालेल्या आहेत. एवढंच नाही तर त्या भागात पोलिस स्टेशनही नाही. त्यामुळे रात्री आम्हाला कुणी मारून टाकलं तर कुणाला कळणारही नाही, अशी परिस्थिती आहे. आम्हाला महापालिकेने आधी दिलेल्या 12 नंबर इमारतीत स्थलांतरीत केले तर आम्ही जाऊ. मात्र दुसऱ्या ठिकाणी दिलेल्या जागेवर आम्हाला जाऊ शकत नाही, असं मत स्थानिक महिलेने व्यक्त केले.
तसेच पुढे बोलताना महिला म्हणाली की, आम्ही हॉटेलमध्ये चपात्या बनवण्याचे काम करतो. त्यामुळे आम्हाला कामासाठी मुंबई शहरात येणं परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही आमच्या झोपडीतच सुखी आहोत. आम्हाला इमारत नको, आमची झोपडीच बरी वाटते, असंही महिला म्हणाली. यावरुन नागरिकांना सुविधा न मिळाल्याने ते अस्ताव्यस्त असलेल्या दाटीवाटीच्या झोपडीतही राहण्यास तयार होत असल्याचे चित्र देशाच्या आर्थिक राजधानीसाठी लाजिरवाणे आहे.