ग्राऊंड रिपोर्ट: शहराप्रमाणे ग्रामीण भागात का वाढतायत कोरोनाचे रुग्ण?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात हाहा:कार उडाला आहे. पण याची नेमकी कारणं काय आहेत, हे शोधणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
कोरोनाच्या संकटाला आता 1 वर्ष होऊन गेले आहे. पहिल्या लाटेत प्रामुख्याने शहरांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसले. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती त्या तुलनेत बरी होती. पण आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरांपेक्षाही ग्रामीण भागात अधिक जाणवत आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 19 हजार 639 रुग्ण आढळले आहे. तर ग्रामीण भागातील 934 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच ग्रामीण भागातील 484 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट..
गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाने देशात आणि राज्यात एन्ट्री केली,त्यावेळी फक्त शहरांमध्येच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण आढळून आले होते, पण त्यांचे प्रमाण खूपच कमी होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र परिस्थिती भयावह झाली आहे आणि ग्रामीण भागही या तडाख्यातून सुटलेला नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात मार्च महिन्यात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. गेल्या काही महिन्यात जिथे तीनशे रुग्ण सापडत होते तिथे हा आकडा दोन हजारांच्या घरात गेला. पण यावेळी रुग्ण फक्त शहरातच नाही तर, ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागले.
16 एप्रिल रोजीच्या आकडेवारीनुसार औरंगाबादच्या ग्रामीण भागात एकूण 19 हजार 639 रुग्ण आढळले हेत. ज्यात सिल्लोड तालुक्यात एकूण 924 रुग्ण आढळून आले होते. 80 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पैठण तालुक्यातील एकूण 3 हजार 221 जण पॉझिटिव्ह सापडले असून, तालुक्यातील 135 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. फुलंब्री तालुक्यात 1 हजार 95 रुग्ण वरील तारखेपर्यंत आढळून आले होते. तर 82 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. औरंगाबाद तालुक्यात 3 हजार 145 रुग्ण,तर 102 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद-जळगाव बॉर्डरवरील तालुका असलेल्या सोयगावमध्ये 259 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. 58 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. खुलताबाद तालुक्यात 799 रुग्ण आढळले आहे, तर 62 गावात कोरोनाने आतापर्यंत एन्ट्री केली आहे.
वैजापूर तालुक्यात एकूण 2 हजार 493 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 23 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळाला. गंगापूर तालुक्यात 4 हजार 395 रुग्ण आढळून आले आहेत. 116 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तर कन्नड तालुक्यातील एकूण 3 हजार 308 रुग्ण आढळले असून, सर्वाधिक176 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत आम्ही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. ग्रामीण भागात सुद्धा शहराप्रमाणे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याची चिंता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलतांना व्यक्त केली. लोकांचा मुक्त संचार यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच शहराशी संपर्क, मास्क न घालणे, दुचाकीवर ट्रीपल सीट बसणे अशा कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं त्यांनी सांगितले. एकूणच सरकारतर्फे वारंवार आवाहन करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसले.
चाचण्यांचे प्रमाण कमी
ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाबत अनेक संभ्रम आहे. लक्षणे जाणवत असली तरी अजूनही ग्रामस्थ कोरोना चाचणी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. अनेक नागरिक लक्षणे असताना स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. किंवा घरगुती उपचार घेण्याचा पर्याय अवलंबत आहेत. त्यामुळे असे लोकं सुपर स्प्रेडर ठरत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.
लसीकरणाचा दरही कमी
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरणाबाबत लोकांमध्ये अजूनही विश्वासार्हता निर्माण झालेली नाही. त्याचबरोबर अफवांमुळे संभ्रम असल्याने लोकं लसीकरण करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.
बाजारपेठ असलेल्या गावात अधिक संख्या..
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची अनेक कारणं आहेत, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ग्रामीण भागात खास करून ज्या गावांमध्ये बाजारपेठा आहेत तिथे रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आले आहे. तसेच आद्योगिक भाग असलेल्या ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण अधिक असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांच्या गावांमध्ये अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. या लोकांची कोणतीही चाचणी होत नसल्याने त्यातील काही जण पॉझिटिव्ह असतील तर ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची कारणं?
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे लोकांचा जवळच्या शहरांशी येणार संपर्क....गाव ते शहर आणि पुन्हा शहरातून गावाकडे रोजचे अपडाऊन हे महत्त्वाची कारण ठरले आहे.
ग्रामीण भागात असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये, बँकांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी शहरात राहतात. ते रोज अपडाऊन करतात. यात धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागातून रोज ग्रामीण भागात अपडाऊन करतात. त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क येतो, आणि तिथूनच कोरोना पसरत असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे.
तर ग्रामीण भागातील अनेक जण किराणा, मंडई आणि इतर व्यवसायांसाठी लागणारा माल आणण्यासाठी शहरात नियमित जात असतात. यावेळी त्यांचा शहरातील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क येतो. यामुळे सुद्धा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.
रिपोर्ट येत आहे उशिरा...
ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे कोरोनाच्या चाचण्यांच्या अहवालाला लागणारा उशीर....ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट यायला किमान दोन ते तीन दिवस लागत आहेत. त्यामुळे या काळात टेस्ट केल्यानंतर संबंधित व्यक्तीने घरात क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे, पण लोक हा नियम न पाळता बाहेर फिरत आहे. त्यामुळे जर तो पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर रिपोर्ट येण्याच्या आधी दोन दिवसांच्या काळात तो अनेकांना पॉझिटिव्ह करत असतो. विशेष म्हणजे शहरात आरटीपीसीआरचा रिपोर्ट त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढण्याचे रिपोर्ट मिळण्यातील दिरंगाई हे एक कारण ठरत आहे.
सार्वजनिक कार्यक्रम धुमधडाक्यात
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही ग्रामीण भागात लग्न सोहळे, साखरपुडा, खासगी कार्यक्रम, अंत्यसंस्काराला लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. अनेक ठिकाणी लपूनछपून शेतात लग्नसमारंभ धुमधडाक्यात केले जात आहेत. या सोहळ्यांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता यासारख्या नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण वाढीसाठी हे सुद्धा एक कारण समजलं जातं आहे.
आजार अंगावर काढण्यामुळे रुग्णवाढ
ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप आल्यावरही नागरिक आजार अंगावर काढत आहे. तसेच अनेकजण दवाखान्यात जाण्यापेक्षा वाफ घेणे किंवा इतर घरगुती उपचार करत आहेत. त्यामुळे सुद्धा कोरोना बाधित रुग्ण ट्रेस होत नाही, आणि त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा
कोरोनाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असतांना काही स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करूनही गावातील लोकं बिनधास्तपणे बाहेर फिरत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांचे या सर्व बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.
धार्मिक स्थळे बनले केंद्र
राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे व फक्त पूजापाठ करणाऱ्या व्यक्तींना सूट देण्यात आल्याचं आदेशात म्हंटले गेले आहे. पण ग्रामीण भागात अजूनही धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. तसेच धार्मिक मुद्दा असल्याने प्रशासन सुद्धा याकडे कानाडोळा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बोगस डॉक्टरांचा उपचार ठरतोय घातक
ग्रामीण भागात गावा-गावात बंगाली डॉक्टर असून, कोणतीही पदवी नसताना हे डॉक्टर रूग्णांवर उपचार करतात. विशेष म्हणजे कोरोनाचे लक्षण असलेल्या रूग्णांवर सुद्धा हे डॉक्टर नेहमीप्रमाणे उपचार करतात. त्यामुळे अनेक जण हेच औषधे घेऊन घरी राहून उपचार करतात, आणि कोरोना चाचणीसाठी जात नाही. त्यामुळे हे कारण सुद्धा ग्रामीण भागातील रुग्ण वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे कारण जाणून घेण्यासाठी, शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण आगाज यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. तसेच ग्राम दक्षता समिती गंभीरपणे काम करत नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात होणारे लग्नसमारंभ, साखरपुडा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याच डॉक्टर आगाज म्हणाले.
पॉझिटिव्ह रुग्ण काय म्हणतात..
ग्रामीण भागातील रुग्ण वाढण्याची कारण शोधत असताना, कोरोनाची बाधा झालेल्या काही लोकांशी आम्ही बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लोखंडे म्हणाले की, शेतात सध्या काम नसल्याने काही दिवसांपासून जवळ असलेल्या खाजगी कंपनीत काम करण्यासाठी जात आहे. एक दिवस कंपनीत सर्वांची टेस्ट करण्यात आली असता, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याचवेळी माझ्यासोबत काम करणाऱ्या गावातील आणखी एकाचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला. आम्हाला लागण कुठून झाली हे कळलंच नाही. पण वेळीच चाचणी केल्याने कुटुंबातील आणि गावातील इतरांना आमच्या पासून लागण झाली नाही,यांच आनंद वाटतो असही लोखंडे म्हणाले. एकूणच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव, प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आणि नागरिक पाळत नसलेले नियम यामुळे कोरोना वाढल्याचे दिसते आहे.