अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. या दुर्घटनेत घटनेच्या दिवशीच 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांची संख्या वाढवून ती सध्या 14 पर्यंत गेली आहे.
6 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात आग लागल्याची माहिती कळताच एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान तातडीने आयसीयू विभागातील रुग्णांना दुसऱ्या विभागात हलविण्यात आले तर 6 जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अग्निशमन विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत 14 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
दरम्यान आधीच कोरोना संसर्गामुळे श्वास घेण्यास अडचण असताना , त्यात आगीमुळे आयसीयू विभागात सर्वत्र धूरच धूर पसरल्याने गुदमरुन या रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील राजकिय नेत्यांची घटनास्थळी धाव
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांसह मदत कार्य सुरू केले. त्याचबरोबर आदर्शगाव हिवरेबाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव यांनी घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी मदत केली. आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनेची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ , राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिली.
यावेळी भाजप खासदार डॉ.सुजय विखे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री राम शिंदे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी घटनास्थळी धाव माहिती घेतली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले , जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. आणि तातडीने रुग्णांना मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शाकिर पठाण ने वाचवले पाच रुग्णांचे जीव
घटनेची माहिती मिळताच आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. शाकिर पठाण या युवकाने आयसीयूत दाखल होत 5 रुग्णांचे प्राण वाचवले. या बोलताना शाकिर म्हणाला की, "मी जेव्हा अतिदक्षता विभागात शिरलो तेंव्हा सर्वत्र धुरच धूर होता, आत काहीच दिसत नव्हतं, रुग्णांचा आरडाओरडा सुरू होता. मला शक्य होईल तसं मी रुग्णांसह त्यांचे बेड आयसीयूतून बाहेर खेत होतो.त्यात माझे हात देखील भाजले. मात्र, त्यावेळी जास्तीत जास्त रुग्णांना बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न होता".
अग्नितांडवास जबाबदार कोण?
शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असताना घटनेस नेमकी कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होत होता. रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट झाले होते का? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आयसीयू विभाग सुरू करण्यास परवानगी होती का? घटना घडली तेंव्हा आयसीयू विभागात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी नव्हते का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर रविवारी (दि. 7 नोव्हेंबर) दिवसभर जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे फिर्याद दाखल करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर पोलिसांनी स्वतःच फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 304, 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच या चौकशीत जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. सोबतच दुर्घटनेची चौकशी करून आठ दिवसांत संपूर्ण अहवाल मागून घेणार असल्याचे म्हटले. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. दरम्यान घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना तातडीने मदतीचे चेकचे वाटप देखील करण्यात आले.
अग्नितांडव प्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई
या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकासह एक वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स आणि एक वॉर्ड बॉय यांचं निलंबन करण्यात आलं. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली. ज्यामध्ये डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांचा समावेश आहे. दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी अटकेत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.काही अटींसह त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
चोर सोडून संन्यासाला फाशी
दरम्यान , ज्यावेळी घटना घेतली त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 304, 304 (अ) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले होते. घटना घडली तेंव्हा रुग्णांचे नातेवाईक आयसीयू विभागात जाऊन रुग्णांना बाहेर काढत होते मात्र, संबंधित कर्मचारी आयसीयू विभागात उपस्थित नव्हते असं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, खऱ्या अर्थाने या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता 'चोर सोडून संन्यासाला फाशी' दिल्याचा आरोप करत परिचारिका संघटना आणि डॉक्टर्स संघटनेने काम बंद आंदोलन केले. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काम बंद ठेवण्यात आले. त्याचबरोबर संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, भंडारा येथील अग्नितांडव प्रकरणानंतरही शासन- प्रशासनाने बोध घेतला नाही का? महाराष्ट्रात रुग्णालयात आग लागण्याच्या घटना वारंवार का घडतात? रुग्णालय प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कठोर कारवाई का झाली नाही? फायर सेफ्टी ऑडिट बाबत जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत .