आनंद महिंद्रांची ऑफर नाकारणारा महाराष्ट्रीयन रँचो कोण?

देशी जुगाड करून घरी बनवलेली महाराष्ट्रीयन रँंचोची जीप देशभरात पोचली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनी एक्सचेंज ऑफर दिली परंतु ती नाकारणारा महाराष्ट्रीयन रँचो पहा...मॅक्स महाराष्ट्रवर सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट....;

Update: 2021-12-23 00:45 GMT

सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावातील दत्तात्रय लोहार यांनी घरीच बनवलेली जीप सोशल मिडीयात चांगलीच वायरल होत आहे. अवघ्या देशभरात त्यांच्या जीपची चर्चा सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीत फोर व्हीलर गाडीच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कमी संसाधनाचा वापर करत त्यांनी बनवलेल्या या गाडीची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी tweet करत हि गाडी एकसचेंज करत नवीन बोलेरो गाडी देण्याची ऑफर या कुटुंबाला दिली आहे. या बदल्यात त्यांनी बनवलेली गाडी हि महिंद्रा कंपनीच्या रिसर्च संग्रहालयात ठेवण्याची मागणी त्यांनी या कुटुंबाला केली आहे.


आनंद महिंद्रा यांच्या या प्रतिक्रियेवर मॅक्स महाराष्ट्रने या कुटुंबाशी संपर्क केला असता त्यांनी आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या या कामाची दखल घेतल्याबद्धल त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी दिलेली गाडी स्वीकारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असून त्याबदल्यात त्यांनी एक अट ठेवली आहे. त्यांनी बनवलेली हि छोटी जीप अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बनवली असल्याने ती देण्यास या कुटुंबाने नम्रपणे नकार दिला असून काही दिवसातच यासारखी हुबेहूब गाडी तयार करून महिंद्रा याना देण्याची इच्छा या कुटुंबाने व्यक्त केली आहे. या गाडीशी कुटुंबातील सर्वांचेच भावनिक संबंध जोडले गेले असल्याने त्यांची हि इच्छा असल्याचे या कुटुंबाने सांगितले आहे.

यावेळी बोलताना दत्तात्रय लोहार यांच्या पत्नी राणी लोहार सांगतात "हि आमची लक्शुमी असल्याने ती देण्याची आमची इच्छा होत नाही. आम्ही त्यांना दुसरी हुबेहूब करून देऊ. आम्ही त्यांना नाही म्हणत नाही. दत्तात्रय लोहार यांनी यावेळी या गाडीच्या निर्मितीचा पटच मॅक्स महाराष्ट्रकडे मांडला.

लोहार यांची मुले त्यांच्या शाळेत चालत जात असायची. यावेळी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास काही पालक त्यांच्या गाडीतून धुरळा उडवत यायचे. आपल्याही वडिलांची अशी गाडी असावी आणि आपणही असेच गाडीतून शाळेत जावे अशी इच्छा मुले नेहमीच व्यक्त करत असायची. परंतु लोहार यांची परिस्थिती अतिशय बेताची आहे. या स्थितीत मनात असूनही मुलांचे स्वप्न पूर्ण करणे त्यांना शक्य होत नव्हते. परंतु मुलांनी व्यक्त केलेली इच्छा त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.




 

ते सांगतात "मी एका हाताने अपंग आहे. मुलांना टू व्हीलर गाडीने शाळेत सोडायचं तर मला हाताने ती गाडी झेपत नव्हती. चार चाकी गाडी खरेदी करायची माझी ऐपत नव्हती. मुलांची इच्छा ऐकून मी ठरवलं कि गाडी घरीच स्वतः करायची. परिस्थिती हलाखीची असल्याने मला साहित्य खरेदी करायला आणि साहित्याची जुळवाजुळव करायला दोन वर्षे गेली".

त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष काम सुरु केलं. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांचा हा प्रवास सोप्पा नव्हता. ते शाळेची पायरीदेखील चढलेले नाहीत. पण लहान पणापासून फाब्रीकेशनची कामे ते लहानपणापासून करत होते. लोहार काम, वेल्डिंगकामात त्यांचा हातखंडा होता. या कौशल्याच्या जोरावर त्यांनी फोर व्हीलर गाडीचे काही साहित्य तसेच काही टू व्हीलर गाडीचे साहित्य यांचे जुगाड करत हि गाडी बनविण्यास सुरवात केली सुरवातीला चाके आणि चेस बनविली. त्याच्या मजबुतीची ट्रायल काही दिवस घेतली. त्यानंतर उन लागू नये म्हणून गाडीवर छत बसवले. गाडीची वायरिंग केली. त्यांनी बनवलेल्या या गाडीत पाच लिटर पेट्रोल ची टाकी आहे. एका लिटर मध्ये हि गाडी चाळीस ते पंचेचाळीस किमी इतका प्रवास करू शकते. पन्नास ते साठ किमी च्या वेगाने हि गाडी चालवता येते. इतर गाडीप्रमाणेच या गाडीला इंडिकेटर, फोकस लाईट, पार्किंग लाईट, इंजिनचे तापमान वाढू नये म्हणून छोटा पंखा बसवलेला आहे. दतात्रय लोहार याना हि गाडी बनविण्यासाठी ६० हजार इतका खर्च आल्याचे ते सांगतात. अशक्य असलेले कुटुंबाचे स्वप्न त्यांनी स्वतः च्या कौशल्याच्या आणि जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले आहे.

स्वतःच्या या गाडीतून त्यांनी देवराष्ट्रे ते पंढरपूर असा प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी लोकांनी थांबवून त्यांचे कौतुक केले. ज्या मुलांसाठी त्यांनी हि गाडी बनवली ती त्यांची मुले आता स्वतः च्या वडिलांनी बनविलेल्या गाडीतून शाळेत जात आहेत. त्यांची गावातील लहान मोठी कामे ते या गाडीतून करत आहेत.


 



त्यांची पत्नी राणी लोहार सांगतात " माझे पती एका हाताने अपंग आहेत. त्यांना हातोडा तसेच इतर लागेल ते साहित्य देण्यासाठी मी त्यांना मदत केली. त्यांच्या सर्व मुलांनी देखील त्यांच्या कामात चांगलीच मदत केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हि गाडी बनवली असून कौशल्य असून आमचे कुटुंब गरिबीत आहे. त्यांच्या कौशल्याची कदर करत सरकारने त्यांच्या मनात असणाऱ्या नाविन्यपूर्ण कामासाठी मदत करावी."

नेहमी सायकलवरून कामावर जाणारे दत्तात्रय लोहार आता गावात चर्चेत आहेत. त्यांना दररोज शेकडो फोन येत आहेत. अनेक लोक त्यांना भेटायला येत आहेत. त्यांच्या गाडीसोबत सेल्फी घेत आहेत. शाळेची पायरीही न चढलेल्या इतरवेळी गावात कधी चर्चेतही नसलेले दत्तात्रय लोहार आज गावात त्यांच्या कर्तबगारीने सन्माननीय व्यक्ती ठरलेले आहेत.


Full View

Tags:    

Similar News