पालकमंत्र्यांनी घोषणा केलेल्या त्या 86 रुग्णवाहिका कुठं आहेत..? विवेक पंडीत यांचा सवाल
पालकमंत्र्यांनी घोषणा केलेल्या त्या 86 रुग्णवाहिका कुठं आहेत..? विवेक पंडीत यांचा सवाल मोखाड्यातील अजय पारधी या ६ वर्षांच्या मुलाची मृत्यूनंतरची अवहेलना आणि भिवंडीमध्ये कोळशाखाली दबून तीन बहिणीचा झालेला मृत्यू ह्याला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी केला आहे. केवळ अँम्ब्युलन्स चालकांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, ह्या प्रकरणातील जबाबदार व्यक्तीवर कारवाई व्हावी, ह्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हार कॉटेज रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विवेक पंडित यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा कागदावर सक्षम व भक्कम असल्याचे भासवले जाते. मात्र जव्हारमधील सहा वर्षीय अजयच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. "24 जानेवारी पासून त्रंबकेश्वरपासून सुरू झालेला त्याच्यावरील उपचारांचा घटनाक्रम जव्हारच्या कुटीर रुग्णालयात त्याच्या मृत्यूनंतरच थांबला. जिल्ह्यात 3 उपजिल्हा रुग्णालये, 5 ग्रामीण रुग्णालये आणि 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 86 रुग्णवाहिका रुग्णांच्या दिमतीला दिल्याची घोषणा आमच्या पालकमंत्र्यांनी 26 जानेवारीच्या आपल्या भाषणात केली.मात्र जिल्ह्यात आजही 900 च्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक महत्वपूर्ण पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत." अशी टीका विवेक पंडीत यांनी केली आहे.
पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करीत असल्याच्या दाव्यातील हवा अजयच्या दुर्दैवी मृत्यू ने काढून टाकली, असल्याची टीका त्यांनी केली आहे. ह्याला सर्वस्वी जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि राज्याची आरोग्य यंत्रणा असल्याचा आरोप विवेक पंडित ह्यांनी केला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोपही विवेक पंडित ह्यांनी केला आहे. लोक रुग्णालयात उपचार करून बरे होण्यासाठी जातात. मात्र जिवंत येत नसल्याचे विदारक असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आपल्याकडे सर्जनशील आरोग्य सेवा दुर्लक्षित असून यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य सेवेला जबाबदार धरावे लागणार असून एखादे वैद्यकीय अधिकारी किंवा अब्युलन्स चालकांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, असे सांगत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.