भिल्ल समाजाची घरासाठीची परवड कधी थांबणार?

Update: 2021-03-10 12:44 GMT

छप्पर हरवलेला समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिल्ल समाजाची ओळख आहे. आदिवासी समाजातील भिल्ल ही एक प्रमुख जात समजली जाते या समाजाचा इतिहास देशाच्या उभारणीत आजही गर्वाने मांडला जातो. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे विविध उठाव झाले. त्यामध्ये भिल्ल समाजाने केलेला उठाव हा देखील अतिशय मोलाचा मानला जातो. मात्र, असं असतानाही भिल्ल समाज आजही विकासापासून दूर आहे.

साधारणपणे महाराष्ट्रात मराठवाड्यासह इतर राज्यात भिल्ल समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यामध्ये मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांतही आजही पाहायला मिळतात.

तुटक्या-फुटक्या झोपड्या बांधून हा समाज वस्ती करून राहतो. मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने औरंगाबादच्या लोहगाव येथील गायरान जागेवर वस्ती करून रहाणाऱ्या भिल्ल वस्तीला भेट देऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वस्तीत आम्ही शिरलो तेव्हा गरिबी आणि दारीद्र्य काय असते याचे पुरावेच पुरावे प्रत्येक ठिकाणी दिसत होते.

याच वस्तीत गेल्या 13 वर्षांपासून राहणाऱ्या गोदावरी निकम यांची व्यथा मनाला पाझर फोडणारी आहे. स्वतःच घर नसल्याने मिळेल तिथे झोपडी करून राहण्यात संपूर्ण आयुष्य गेल्याच त्या म्हणतात. लग्न झाल्यापासून आतपर्यंत साधं पत्र्याचा घर सुद्धा त्यांना नशीब झालं नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी विविध जिल्ह्यात जाऊन ऊसतोडणी करून दोन पैसे कमवण्यातच त्यांचं आयुष्य चाललं,त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी वेळ मिळाला नाही.मुलांच शिक्षण व्हावं म्हणून, सुरवातीला आजी-आजोबांकडे ठेवून आम्ही ऊसतोडणीला जात होतो.मात्र पुढे तेही शक्य झालं नसल्याने मुलांना शिक्षण आर्ध्यातच सोडावे लागल्याचं गोदावरी निकम सांगतात...

त्यामुळे आता मुलंही आमच्यासोबत ऊसतोडणीला येतात तर कधी कुठं वीटभट्टीवर रोजंदारीने कामाला जातात.त्यात राहण्यासाठी घर नसल्याने गेल्या 13 वर्षांपासून आमचं कुटुंब एका झोपडीत राहतात असेही त्या बोलताना म्हणाल्या..

याच वस्तीवरील तरुण अरुण निकम याचीही कहाणी काही वेगळी नाही. तोही गेल्या अनेक वर्षांपासून याच भिल्ल वस्तीवर आपल्या कुटुंबासोबत राहत असतो.

अनेक लोकं येतात मदतीचे आश्वासने देतात मात्र, प्रत्यक्षात आमच्यापर्यंत विकास पोहोचतच नाही अशी खंत अरुण व्यक्त करतो. वस्तीत 100 पेक्षा जास्त कुटुंब राहतात,पण आजही या सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. यामुळे जुलाब, सर्दी, पोटदुखी सारख्या आजारांची लागवण होते,असही अरुण म्हणतो..!

सातपुडा पर्वत रांगांमध्ये विखुरलेला प्रदेश म्हणून ओळखला जाणार 'सातपुडा प्रदेश' प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. यातील गुजरात आणि मध्य प्रदेशातील पर्वतरांगांचा भाग सोडला तर सातपुडा पर्वतांच्या रांगा महाराष्ट्रात अमरावती, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत पसरलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील भिल्ल जमात ही 'प्रमुख आदिवासी जमात'म्हणून ओळखली जाते. बहुतांश भिल्ल हे कष्टकरी किंवा मजुरी करतात. काहीजण जंगली माळ गोळा करून त्याची विक्री करतात. तर मराठवाड्यातील भिल्ल समाजातील अनेक जण ऊसतोड आणि वीटभट्टीवर मोठ्याप्रमाणात आढळतात.

या समाजात काही अटी व शर्ती प्रामुख्याने पाळल्या जातात. ज्यात, मुलीकडून हुंडा घेतला जात नाही. याउलट मुलाकडून मुलीला दहेज दिले जाते. तर लग्नसमारंभासाठी शनिवार व अमावास्येचा काळ सोडून कधीही लग्न लावतात येते,त्यामुळे शुभ-अशुभ यांचा मुहूर्त याचा प्रश्नच येत नाही.

Full View

हक्काचं घरच नाही!

भिल्ल जमातीतील लोक आजही अनेक ठिकाणी गायरान किंवा ग्रामपंचायतच्या गावठाण जमिनीवर झोपड्या करून राहतात.तर स्वतःचं हक्काचं घर या समाजाला देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याला सरकार किंवा प्रशासन हवं तसं प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ऊन,वारा,थंडी आणि पावसाळ्यात त्यांना आपल्या झोपड्यांमध्ये राहूनच आयुष्य जगावं लागतं.

मुलं शिक्षणापासून वंचीत!

भिल्ल समाजातील वस्ती करून राहणाऱ्या लोकांच कोणतेही एक ठिकाण नसते. सहा महिने घरी तर सहा महिने ऊसतोड आणि इतर रोजगाराच्या शोधात इतर ठिकाणी जावे लागते.त्यामुळे मुलांच शिक्षण पूर्ण होत नाही. यामुळे भिल्ल समाजात शिक्षणाचा टक्का खुपचं कमी आहे.

अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी 'एकलव्य इंग्रजी माध्यम निवासी शाळा' अशी योजना राबविली जाते. तर या निवासी शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु ह्या योजनांपासून हा समाज आजही दुरुच आहे. त्यामुळे याचं कारण शोधणे महत्वाचे आहे.

समाजात बदल होतोय!

भिल्ल समाज म्हणजे गुन्हेगार, चोर, दरोडेखोर जमात असा काहीसा इतिहास अनेकांनी लिहून ठेवले आहे. मात्र भारतीय स्वातंत्र लढ्यात तंट्या उर्फ तात्या भिल्ल याने बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळो कि पळो करून सोडलं होतं.मात्र आजही ह्या समाजाकडे गुन्हेगारांच्या नजरेने बघितलं जातं.

मात्र आज हा समाज कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतोय ही खरी परिस्थिती आहे. मराठवाड्यातील अनेक वीटभट्ट्यांवर याच समाजातील लोक काम करताना पाहायला मिळतात.त्यामुळे आता हा समाज बदलतोय हेही तेवढंच सत्य आहे.

समाजातल्या नेत्यांची प्रतिक्रिया!

भिल्ल समाज अजूनही विकासापासून दूर आहे.एवढच नाही तर त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर सुद्धा मिळत नसल्याचं भिल्ल एकलव्य आदिवासी भिल्ल समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोक बर्डे म्हणाले. तर अनेक ठिकाणी घरकुल मंजूर झाले आहेत,मात्र गावात गावठाणची जागा नसल्याने त्यांना घर बांधता येत नाही,असा आरोप बर्डे यांनी केला.

तर गेल्या २० वर्षापेक्षा जास्त काळापासून राहत असलेली जमीन शासनाने नावावर न केल्याने भिल्ल समाजातील आदिवासींना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोपही बर्डे यांनी केला.

भिल्ल समाजातील हजारो कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक गावातील गायरान व गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून राहतात. विशेष म्हणजे शासनाचे आदेश असतानाही त्यांच्या नावावर जमिनी केल्या जात नाहीत.

यामुळे भिल्ल समाजातील नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच जागा नावावर नसल्याने त्यांना इतर सुविधाही मिळत नसल्याचं अशोक बर्डे म्हणाले.

Tags:    

Similar News