मेंढपाळांचा जलमाचा वनवास संपणार तर कधी ?

निवडणुका आल्या की मेंढपाळ बांधवांना अनेक आश्वासने दिली जातात. पण जसजशा निवडणुका संपतात तशा ही आश्वासने केलेल्या घोषणा हवेतच विरून जातात. सत्ताधाऱ्यांना या आश्वासनांची आठवण होते ती पुढच्या निवडणुकीला. मेंढपाळांच्या या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...;

Update: 2022-08-01 13:26 GMT

रानात ठोकलेल्या पालातली तीन दगडांची चूल पेटविण्यासाठी त्यांनी एक डबी उघडली. त्यातून काडी आणि टायरच्या ट्यूब चा एक तुकडा काढला. सतत भिरभिरणाऱ्या वार्यात देखील त्यांनी काडी पेटवून त्या डबीत धरली. त्याने ट्युबचा तुकडा पेटवला आणि त्या पेटलेल्या तुकड्याने तीन दगडांची चूल. कोल्हापूर जिल्ह्यातील नागाव येथून आटपाडी परिसरात आलेल्या मेंढपाळ भगिनी चुलीवर चहाच पातेल ठेवत ठेवत सांगतात," वार्यात चूल पेटत न्हायी, धूर घुटमाळतु. पण तसच कसबस जेवण शिजवून आम्हाला खाव लागत. संडासला जायचं झाल तर अंधार व्हायची वाट पहावी लागते. पाळीच्या दिवसात तर पोट दुखते. तरीही विहिरीतून पाणी काढाव लागत. पुन्हा मेंढरामागे हिंडायच. हे काम थांबल तर आमच पोट थांबत. आजारी पडलं तर जास्तीत जास्त वेळा दुखण अंगावर काढतो. या रानावनात दवाखान्यात जाणार कुठ? दवाखान्यात नेणार कोण?

याच परिसरात आलेल्या एका दुस ऱ्या मेंढपाळ बांधवाच्या आरोग्याची हीच व्यथा आहे. " ते सांगतात जास्त पैसा मिळत नाही. पायली आडशिरी धान्य मिळतं. अशा वेळी कोण आजारी पडल तर मिळालेले पैसे डाकटर ला द्याचे कि त्यावर जगायचं? आसा विचार करून मेंढका दुखणं अंगावरच काढतो. बर्याच वेळेला आमचा वाडा गावापासून लांब रानात असतो या जाग्यावर कुठला आला डॉक्टर आणि औषधं.

स्थलांतरित मेंढपाळांची अनेक कुटुंबे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. दुखणे अंगावर काढतात. यामध्ये स्त्रियांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांना आराम मिळत नाही. या काळामध्ये पाण्याची आवश्यकता अधिक असते. स्त्रियांना पाणी विहिरीतून काढावे लागते. पाण्याची कमतरता असल्याने स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष होते. बहुतांश महिला सॅनीटरी ‍‍पॅडचा वापर देखील करत नाही. यामुळे स्त्रियांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पाणी भरण्याचे काम हे परंपरेने स्त्रियाच करत असल्याने यावेळी घडलेल्या अपघातांमध्ये देखील स्त्रियाच बळी पडतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एक महिला विहिरीतून पाणी काढत असताना गेल्या वर्षी मृत्युमुखी पडलेली होती. मेंढपाळ राहत असलेल्या परिसरात अँब्युलंस पोहचू शकत नाही. तातडीने आरोग्य सुविधा मिळत नाहीत.

कार्तिक महिना संपला कि मेंढपाळांचे स्थलांतर सुरु होते. घोड्यांवर आपले जीवनावश्यक गबाळ टांगून त्यांच्या जगण्यासाठी पायपीट सुरु होते. घोड्यांच्या पाठीवर लादलेल्या या गबाळातून त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर त्यांच्या समस्यादेखील त्यांच्यासोबतच भटकंती करत राहतात. या त्यांच्या भटकंतीचे त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक आयुष्यावर अनेक दूरगामी परिणाम होतात.

चारा नाही पाऊस नाही म्हणून जत आटपाडी या भागातील मेंढपाळ स्थलांतरीत होतात. ते मेंढ्या चारत चारत काही पंढरपूर पर्यंत तसेच काही शिराळ्यापर्यंत जातात. यावेळी मेंढ्या शेतात बसविण्यासाठी कुणी धान्य देते तर कुणी पैसे देते. या पैशावर धान्यावर मेंढपाळ कुटुंबांची गुजराण होते. सदाशिव गारळे सांगतात " कार्तिक पोर्णिमा संपली कि आंम्ही स्थलांतरास सुरवात करतो. तिकडे बत्तीस शिराळ्यापर्यंत जातो. उन्हाळा संपू लागला कि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरवात करतो. आमच्या भागात चारा उपलब्ध नाही. रोजगार नाही. पाणी पाजायला जावावं तर आता ठिबक आलं, भांगलायला जावं तर तणनाशक आलं, बैल पाळावा तर आता टॅ्कटर tractarआल. मग भांडवल नसताना आम्ही जगाव तर कस? या प्रश्नाच उत्तर आम्हाला परंपरेन मेंढ्या चराई हेच दिले आहे. यामुळे अनेकदा हल्ले होतात, शिवीगाळ होते, गावात गेल कि लोक हाकलतात. हे सर्व सहन करत आम्ही आयुष्य काढत असतो.

दुष्काळी भागातील मेंढपाळ स्थलांतर करतात. पण कोल्हापूर सारख्या भागातील मेंढपाळ देखील भटकंती करतात. जास्त पाऊस असल्याने तेथे चराई साठी कुरणच उपलब्ध नाही. यामुळे या भागातील मेंढपाळ तो भाग सोडून आटपाडी पर्यंत स्थलांतर करतात. पण त्यांचे हे स्थलांतर हंगामी नसते. वर्षभर हे मेंढपाळ घरापासून लांब असतात. सन समारंभ निवडणुका असल्यावरच ते आपल्याच घरात पाहुणे यावेत असे एक दोन दिवस जात असतात. पूर्ण कुटुंबाला कधीच घरी येता येत नाही. मेंढरामागे एकाला तरी रहावेच लागते.

दगडू रानगे हे कायम स्थलांतरित मेंढपाळ आहेत. ते सांगतात " आमच्याच घरात कवातरी आम्ही पाहुणे म्हणून जातो. मयत झालं तरी आम्हाला तातडीन जाता येत नाय.आम्ही पावसाळ्यात आटपाडी सांगोला जात पंढरपूर पर्यंत जातो. गणपती आला कि आम्ही पुन्हा मागे फिरतो. उन्हाळा बत्तीस शिराळा परिसरात काढतो. पाऊस सुरु झाला कि पुन्हा परतीचा प्रवास सुरु. या काळात अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते.

मेंढ्या चराई करताना काय त्रास होतो यावर आम्ही सांगोला येथील मेटकरी या शंभरी पार करत आलेल्या एका वृद्ध मेंढपाळाची प्रतिक्रिया जाणून घेतली ते सांगतात " एखादा शेतकरी जवळ ये म्हणतो एखादा हाकलून लावतो. शिव्या देतो. एखादा काठीपण काढतो पण गोड बोलत बोलत काळजात शिरायचं. उलट बोलायचं नाय. पावसाळ्यात तर चीखुल हुतु. चिखलात तरवाडाच फाट टाकून त्यावर झोपलु, हातावर भाकरी घेऊन खाल्ली. इतक्या हालात दिवस काढलं.

मेंढपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न.

चराईसाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्यावर अनेकदा हल्ले होतात. त्यांच्या मेंढ्याची चोरी होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मेंढपाळ आर्मी या मेंढपाळ बांधवांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे नेते अंकुश बीरा मुढे सांगतात " हल्ला झालेला एखादा मेंढका पोलीस ठाण्यात जातो तेंव्हा त्याची दखल घेतली जात नाहि. गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते. यासाठी राज्य सरकारने यासाठी विशेष कायदा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. "

स्थलांतरित असलेले हे मेंढपाळ वर्षभर तर काही सहा महिने भटकंती करत असतात यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर याचे दूरगामी परीणाम होतात. अनेक मुले शाळा सोडून पालकांसोबत येतात. ते शालाबाह्य असतात. पण भटकंती करत असल्याने ते रेकॉर्डवर देखील येत नाहीत. जी मुले गावी असतात त्यांच्या शिक्षणावर लक्ष द्यायला तेथे पालकच नसतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मुलांचा शिक्षणातील रस कमी होतो. अशी मुले इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा स्पर्धेत मागे पडतात.

आर्थिक सुधारणा नाही

मेंढ्या चराई करून मांस उत्पन्न करणार्या मेंढपाळाना हमीभाव मिळत नाही. परिणामी त्यातून त्यांचे जीवनमान देखील उंचावत नाही. हमीभाव नसल्याने उत्पादित माळ व्यापारी कमी किंमतीने खरेदी करतात. परिणामी कष्ट करणाऱ्या मेंढपाळांच्या हातात त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. मेंढपाळ आर्मी या संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ भाऊ गारळे सांगतात, शेतमालाला हमीभाव मिळावा अशी लढाई सुरु आहे. पण शेती पूरक असलेल्या मेंढपाळ बांधवांनी उत्पादित केलेल्या मांस उत्पादनाला हमीभाव नाही. त्यामुळे कष्ट करूनही तो समूह हलाखीत राहत आहे. त्यांना हमीभाव मिळावा यासाठी राज्यभर लढा उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभर मोठी संख्या असलेल्या मेंढपाळांच्यासाठी सरकार योजना आणते पण सरकार तसेच प्रशासकीय उदासीनतेमुळे या योजना प्रत्यक्षात येत नसल्याचे अंकुश मुढे सांगतात " महादेव जाणकार मंत्री असताना सुरु केलेली पशु अँब्युलंस योजना प्रत्यक्षात आली नाही. या अँब्युलंस आज धूळखात पडलेल्या आहेत. मेंढपाळ बांधवांसाठी काम करण्याची प्रशासनाची इच्छाच दिसतं नाही. मेंढपाळ लसीची मागणी करतात तेंव्हा लस दिली जात नाही. पण लसी खराब होइपर्यंत दवाखान्यात ठेवल्या जातात. मला तर एकदा कालमर्यादा संपलेली लस दिली होती. यावर सरकारने विचार करायला पाहिजे, मेंढपाळांसाठी विशेष पॅकेज द्यायला पाहिजे. येत्या काळात या विषयावर राज्यभर संघर्ष उभा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात बहुसंख्य असणाऱ्या मेंढपाळ समुदायाच्या या समस्या अनेक वर्षापासून जैसेथे आहे. मेंढपाळ समुदायात नेता जन्माला येतो तो मोठा होतो पण मेंढपाळ बांधव मात्र घोड्याच्या पाठीवर बिर्हाड टांगून वर्षानुवर्षे तीच मळलेली वाट चालत राहतात. याची शरम ना सरकारला वाटते ना लोकप्रतिनिधीना ना नेत्यांना. हे चित्र बदलणार कधी. विकासाचा सूर्य या पालांवर उगवणार कधी हा खरा सवाल आहे.

Full View

Tags:    

Similar News