मेळघाटातील बालमृत्यू केव्हा थांबणार? स्नेहा वासनिक
गेल्या २७ वर्षांत मेळघाटात (Melghat) मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या दहा हजारांवर पोहचली आहे. या सरकारी आकडेवारीनेच अंगावर काटा येतो मग न नोंदविलेले बालमृत्यू वेगळेच आहेत. मेळघाटातील बालमृत्यूचा दर देशाच्या सरासरीपेक्षा मोठा आहे. सरकारने प्रयत्न केले नाहीत असे नाही, मात्र बालमृत्यूच्या आकड्यांनी आजवरच्या अपयशाचे चित्र पुढे आणणारा NFI फेलो स्नेहा वासनिक यांचा रिपोर्ताज....;
२०२० मधील कोरोनाचे संक्रमण आपल्याला बरेच काही शिकवून गेले. विशेषतःआरोग्याच्या बाबतीत साध्या साध्या आरोग्यदायी सवाई पासून ते कोविड लसीच्या नियोजनापर्यंतचा प्रवास आपल्याला भविष्यातील महामारीच्या स्तिथीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.परंतु आदिवासी बहुल भागातील कुपोषण, बालमृत्यू, उपजतमृत्यू, मातामृत्यू,रक्तक्षय यासारख्या काही महत्वाच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत आपण अजूनही समाधानकारक वाटचाल केलेली नाही.अश्या स्तिथीत कोविड १९ सारखी संक्रमणे आपल्याला पुन्हा दोन पावले मागे नेऊन ठेवतात.कोविड-१९ संक्रमणाची दुसरी लाट संपता संपता आरोग्य स्तिथीबाबत काही गंभीर निष्कर्ष समोर आलेले आहेत.त्याबाबत प्रतिबंधात्मक स्वरूपात काम करून शास्वत विकासाच्या उद्दिष्ठाची वाटचाल आपल्याला सहजसोपी करता येण्याजोगी आहे. "आरोग्य साक्षरता" हा आरोग्य सेवांचा पाया राहणे आवश्यक ठरणार आहे.
विदर्भातील समृद्ध वनप्रदेशाची पाश्वर्भूमी असूनही ऐन जंगलातील अनेक आदिवासी गावांपर्यंत आजही आरोग्याच्या कुठल्याही सुविधा पोचलेल्या नाहीत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांच्या मधील हा परिसर जंगलच्या राजासाठी आरक्षित आहे, पण त्याच जंगलाचा एक भाग असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी मात्र तो दारिद्र्य, हलाखी आणि असुविधांचे क्षेत्र बनले आहे.
पावसाळ्यात या भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू ही गंभीर समस्या आहे.सुमारे २६-२७ वर्षांपूर्वी या समस्येविषयी माध्यमे जागरुक झाली असून अनेक बातम्या,छायाचित्रे प्रकाशित करण्यात आले.तेव्हा या विषयाचा वेगळा विचार आणि संशोधन करण्यास सुरवात झाली आणि समस्येला आळा घालण्यास थोड्या फार प्रमाणात मदत झाली.
आदिवासी विभागात आरोग्य विषयक सुविधांची गरज प्रचंड मोठी असून अशा भागात काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या लोकांना सुविधांपासून वंचित राहावं लागतं ही आजची वस्तुस्थिती आहे.आदिवासींच्या आरोग्यासाठी उपाय योजना राबवत असताना त्यांच्या गरजा आणि मागण्या जाणून घेऊनच काम केले पाहिजे.आदिवासींच्या जीवनशैलीला मागास किंवा कमी लेखून आपली व्यवस्था त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे.त्यांच्या समस्यांचे प्राधान्यक्रम आपण जाणून घेऊन आशा सेविका,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,ए.एन.एम. या सर्वांचा समन्वय राहिला पाहिजे,तसेच जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,सिव्हिल सर्जन,जिल्हा आरोग्य अधिकारी,सी.एच.ओ. यांनी एकत्रित या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे.
मेळघाट
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या डोंगरदऱ्या व जंगलांनी व्यापलेल्या दोन तालुक्यांच्या निसर्गरम्य प्रदेशाला मेळघाट या नावाने ओळखले जाते.चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे एकमेव ठिकाण आहे.तसा हा व्याघ्रप्रकल्पासाठी राखीव असलेला वनप्रदेश सुद्धा आहे.मेळघाटात कोरकू आदिवासींचे वास्तव्य सर्वाधिक आहे. याशिवाय गोंड, निहाल, बलई, गवलान, गवळी, राठिया, मोंग्या इत्यादी जाती जमाती काही प्रमाणात आहेत.
चिखलदरा आणि धरणी ह्या दोन तालुक्यात एकूण ३२४ गावे आहेत.धारणी तालुक्यात १६९ गावे व चिखलदरा तालुक्यात १५५ गावे आहेत.भौगोलिक दृष्ट्या मेळघाटचे क्षेत्रफळ मोठे आहे.मेळघाट परिसर हा १९७४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.सद्यास्थितीत एकूण क्षेत्र सुमारे १६७७ चौ.किमी आहे. रिझर्व्ह क्षेत्रापैकी ३६१.२८ चौ किमी जागा ही गूगामल राष्ट्रीय उद्यान कोर क्षेत्र करिता तसेच ७८८.२८ चौ.किमी क्षेत्र रिझर्व्ह,मेळघाट वाघ अभयारण्य क्षेत्र बफर असे एकत्र मेळघाट अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.पूर्वी, मेळघाट वाघ अभयारण्य १५९७.२३चौ.किमी एक क्षेत्र १९८५ मध्ये स्थापन करण्यात आले. त्यारनंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान १९८७ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
बालमृत्यू, उपजत मृत्यू, मातामृत्यू म्हणजे काय ?
“५००ग्राम पेक्षा कमी वजनाचे बाळ प्रसूत होऊन एकही श्वास न घेता किव्वा जिवंतपणाचे एकही लक्षण न दाखवता मृत पावणे म्हणजे उपजत मृत्यू होय.”
“०ते ५ वर्षाखालील किव्वा १ महिना ते ५ वर्षातील बालकाचा मृत्यू म्हणजे बालमृत्यू होय.”
“स्त्रीचा गरोदरपणात,प्रसूतीच्या वेळी अगर प्रसूती किंवा गर्भपातानंतर ४२ दिवसांत होणारा मृत्यू म्हणजे मातामृत्यू होय.”
मेळघाट मधील बालमृत्यू –
निसर्गाने नटलेल्या व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असलेल्या मेळघाटात गेल्या २७ वर्षांपासून ३२४ गावांतील बालमृत्यू अद्यापही थांबलेले नाही.१९९३ पासून सुरू झालेली ही मालिका आजही कायम आहे.सरकार,अधिकारी,प्रशासनातील कर्मचारी तसेच जग बदलले,मात्र मेळघाटचे वास्तव बदलत नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.
मेळघाट या आदिवासीबहुल भागात कुपोषित बालके आणि बालमृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे सांगून सरकारी यंत्रणा पाठ थोपटून घेत असल्या तरी १९९३ ते मे २०२२ या काळात विविध कारणांमुळे दहा हजारांवर बालकांनी जगाचा निरोप घेतल्याचे वास्तव आहे.त्यामुळे आजही मेळघाट कुपोषणमुक्ती कागदावरच दिसून येत आहे.
जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती, ऍन्सपेक्सिुया, सेप्टिसिमिया यामुळे अर्भक मृत्युदर अधिक असून विविध आजारांमुळे ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. सोबतच बालमृत्यू टाळण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना, आरोग्य संस्थेत प्रसूती, पोषण आहार, बालउपचार केंद्र, आशामार्फत गृहभेटीद्वारे पाठपुरावा, जंतुनाशक व जीवनसत्त्व ’अ’ मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी, अशा उपाययोजना राबवण्यात येतात, पण अजूनही बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही.
मेळघाट मधील बालमृत्यूची सदस्थिती-
मेळघाट मध्ये जागतिक महामारी म्हणजे कोविड १९ काळातील बालमृत्यू, उपजत मृत्यू, मातामृत्यूची संख्या पुढील प्रमाणे आहे,
बालमृत्यू
२०१९ ते २०२० एकुण २४६
२०२० ते २०२१ एकुण २१३
२०२१ ते मे २०२२ एकुण २१७
उपजत मृत्यू
२०१९ ते २०२० एकुण १४६
२०२० ते २०२१ एकुण १४२
२०२१ ते मे २०२२ एकुण १२७
मातामृत्यू
२०१९ ते २०२० एकुण ८
२०२० ते २०२१ एकुण १०
२०२१ ते मे २०२२ एकुण ५
पावसाळ्याच्या ऋतू मध्ये बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते. आणि कोविड १९ संक्रमणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. गर्भवती महिला, महिलेच्या गर्भातील बाळ, नवजात बाळ, स्तनदा माता, आणि बाळ वयाच्या ५ वर्षांपर्यंत काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलण्याचे काम अंगणावाडी सेविका आणि मदतनीस करत असतात. मात्र, कोविड १९ संक्रमणामुळे अंगणवाड्या तसेच इतर शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे गर्भवती महिलांना पोषक आहार मिळत नाही. परिणामी महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे उपजत बाळ जन्माला येण्याची भीती अधिक आहे.सोबतच कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कोविड १९ संक्रमणाच्या काळात वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
मेळघाट मधील आरोग्य प्रशासन -
कोविड १९ संक्रमणाच्या काळात सुद्धा मेळघाटमधील अपुरी आरोग्य सुविधा हे सुद्धा उपजत मृत्यू, मातामृत्यू, बालमृत्यूला जबाबदार आहे.
१. प्रा.आ. पथक टिटबा, चार्कदा, सुसर्दा, दहेंद्री, रायपुर, प्रा. आ. केंद्र हतरु, धुळघाट रेल्वे, फिरते पथक रंगुबेली, बोड, खारी, चुनखडी, दहेद्री, आयु . दवा चटवाबोड, आयु दवा हिराबबई ( डॉ . पाटसे बैअ राणीगांव डॉ . गाडेकर आयु दवा एकताई , बिना परवानगीने गैरहजर आहेत.) - इत्यादी ठिकाणी वैदकीय अधिकारी गट ब च्या १४ जागा रिक्त आहेत.
२. प्रा.आ.केंद्र , हरिसाल , बिजुधावडी (बदलीने रिक्त) - या ठिकाणी आरोग्य सहाय्यक (राज्य) च्या ०२ जागा रिक्त आहेत.
३. प्रा.आ.कें . हरिसाल विजुधावडी , बैरागड , साद्रावाडी, धुळघाट, कळमखार, चिखलदरा, सेमाडोह, हातरु, प्रा. आ. पथेक सुसर्दा (सदर प्रकरणे न्यायप्रविष्ठ) - इत्यादी ठिकाणी आरोग्य सहाय्य्क च्या (जी. प.) ११ जागा रिक्त आहेत.
४. प्रा.आ. पथक चार्कदा , टिंटंबा , सुस , रायपुर , दहेंद्री . प्रा.आ.केंद्र बिजूधावडी, बैरागड, धुळघाट रेल्वे, सेमाडोह ( सदर प्रकरणे न्यायप्रविष्ठ ) - इत्यादी ठिकाणी आरोग्य सहाय्यिकाच्या ०८ जागा रिक्त आहेत.
५. उपकेंद्र टिंटंबा सुसर्दा , रेहटया , कुसुमकोट , मोगर्दा , चिपोली , चौराकुड , चटवाबोड , धरणमहु , नादुरी , बेरदाबल्डा , पुळघाट रेल्वे गोलाई , कळमखार गांगारखेडा खडमल डोमा प्रा.आ.केंद्र हरिसाल प्रा. आ. पथक दहेंद्री केलपाणी , रायपुर , जामली ( सदर पदे न्यायप्रविष्ठ ) प्रा.आ. केंद्र हतरु , उपकेंद्र झिलागपाटी प्राआपयेक रायपुर , उपकेंद्र कळमखार प्राआकेंद्र कळमखार , हरिसाल ( बदलीने रिक्त ) - इत्यादी ठिकाणी आरोग्य सेविकेच्या २९ जागा रिक्त आहेत.
६. उपकेंद्र सुसर्दा झिल्पी , दाबिदा , कळमखार , जम्बु , डाकणा , बोबदो , धुळघाट, रेल्वे , जुटपाणी चौराकुड , गौलखेडा बाजार , लवादा - इत्यादी ठिकाणी आरोग्य सेविकच्या (राज्य ) १२ जागा रिक्त आहेत.
७. उपकेंद्र रत्नापुर, भुत्रुम, गै. बाजार, धोदरा इत्यादी ठिकाणी आरोग्य सेविकच्या (जी. प. ) ०४ जागा रिक्त आहेत.
८. भरारी पथक ढाकरमल, कासमार मानवसेवी वैदकीय अधिकारीच्या ०२ जागा रिक्त आहे.
याशिवाय सामुदाईक आरोग्य अधिकारी ०५, आरोग्य सेविका कंत्राटी ०१, परिचालिका ४३, गटप्रवर्तिका ११ जागा मेळघाट मध्ये रिक्त आहेत.
"खोज" संस्थेअंतर्गत केलेल्या अभ्यासानुसार मेळघाट मधील बालमृत्यूची समस्या गेल्या २७-२८ वर्षांपासून आजही तशीच आहे. जुन ते डिसेंबर ह्या सात महिन्यात बालमृत्यूचे प्रमाण सहसा जास्त दिसून आले आहे.पावसाळा व हिवाळा मेळघाट मधील मुलांना कठीण जात असतो ह्या संदर्भात विशेष विचार करून कोविड १९ संक्रमणासारख्या इतर अनेक आजारामध्ये अधिक बालमृत्यू होऊ नयेत या करिता मेळघाटामधील आदिवासींसाठी वेगळ्या उपाय योजना करणे फार महत्वाचे आहे .
मेळघाट मधील बालमृत्यूची कारणे –
कोविड १९ संक्रमणाच्या काळात मेळघाट मध्ये पोषण आहार वेळेवर मिळालेला नाही, आरोग्य सेवा गावा गावात पोहचविण्यासाठी वाहने नाहीत, आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत, रस्ते, वीज, रोजगार, पिण्याचे स्वच्छ पाणी, नाही, गरिबी किंवा वंचितावस्था हे जरी बालमृत्यू साठी मूलभूत कारणे मानले तरी त्याला इतरही विविध कारणे आहेत. "खोज" संस्थेअंतगॅत केलेल्या अभ्यासातुन पुढील कारणे सुद्धा बालमृत्यूला जबाबदार आहेत.
१. मेळघाटमधले आदिवासी शेती करत असले तरी अन्न पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही. ही शेती प्रामुख्याने कोरडवाहू आणि तिच्यामधून कोणत्याही कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य निर्माण होत नाही.
२.फळभाज्या,पालेभाज्या,निरनिराळ्या प्रकारची फळे यांचे प्रमाण मर्यादित आहे. दूधदुभत्याचा वापर गवळी समाजातच आहे. मांस किंवा मासे विकत घेऊन खाण्याची परिस्थिती नाही. स्निग्ध पदार्थांचा वापर आवश्यकतेपेक्षा खूप कमी प्रमाणात आहे.
३.मेळघाट हा जंगलाचा प्रदेश असला तरी त्यात प्रामुख्याने साग लावलेला असल्याने पूरक अन्नाची गरज भागवेल अशा तऱ्हेची वनोपज तयार होत नाही.शिकारीवर बंधने आहेत. त्यामुळे प्रमाणित प्रथिनांची गरज भागवली जात नाही.
४.लहान मुलांना वाढवण्याच्या संदर्भातले विशेषतःत्यांच्या आहाराबाबतीतले आणि पोषणाबाबतीले अज्ञान हे त्यांच्या आरोग्याला मारक ठरत आहे. हीच गोष्ट गरोदर मातांच्या बाबतीतही दिसून येते. ज्या पारंपरिक समजुती आणि पूर्वग्रह होते त्यांच्या आधाराने समाज चालत आहे.स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असणे हीसुद्धा या संदर्भातील मोठी अडचण आहे
५.मेळघाटमध्ये पावसाचे प्रमाण कमी नसले तरी पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची टंचाई होते. उघड्या आणि दूषित पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
६. दूरदूरच्या खेड्यांमध्ये लसीकरण योग्य रितीने होत आहे कि नाही याची नोंद नाही.
७.डॉक्टर्स पेक्षा गावातील “भुमका” म्हणजे पुजाऱ्यावर जास्त विश्वास आहे.अंधश्रद्धा हि देखील मेळघाटमधील मोठी समस्या आहे.
८. आश्रम शाळेमध्ये शारीरिक शिक्षण दिले जात नाही.
शासकीय उपाययोजना –
मेळघाट मधील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून जननी-शिशू सुरक्षा योजना, ग्राम बालविकास केंद्रे,जीवनसत्त्वपुरवठा,जंतुनाशक मोहीम,आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष,धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र,भरारी पथक योजना,लसीकरण कार्यक्रम,राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.कुपोषण संपवण्याच्या नावावर अनेक सेवाभावी संस्था वाढत असताना मेळघाटात माता आणि बालमृत्यू कमी व्हावे यासाठी आशा वर्कर आणि अंगांवाडी सेविका यांचीच भूमिका खऱ्या अर्थाने महत्वाची असल्याचे दिसून येते.कोरोना काळात सुद्धा घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करणे,लोकांना कोरोना विषयक शिक्षण देणे,त्यांचे प्रबोधन करणे,मुलांसाठी छोटे विडिओ फोटो चित्र तयार करून दाखवणे,शिवाय स्तनदा माता गरोदर माता,किशोर सक्षमीकरण कार्यक्रम, अनौपचारिक शिक्षण अशी वेगवेगळी प्रकारची कामे करणे सध्या अंगणवाडी सेविका करतांना दिसत आहे.
१९९६-९७ मध्ये ‘नव संजीवनी’ योजनेअंतर्गत आदिवासी लाभाच्या नऊ योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले होते.यामध्ये रोजगार कार्यक्रम (रोहयो आणि मनरेगा),आरोग्यसेवा (प्राथमिक आरोग्यसेवांची तरतूद आणि शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे),पोषण कार्यक्रम (एकात्मीकृत बालविकास योजना आणि शालेय पोषण कार्यक्रम),अन्नधान्य पुरवठा,खावटी कर्ज योजना आणि धान्य बँक योजना यांचा समावेश होता.ही ‘नव संजीवनी’ योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून जिल्हा स्तरावरचे संबंधित सर्व अधिकारी त्यात सामील केले गेले होते.
उपाययोजना –
बालमृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कारणाचा अभ्यास केल्यानंतर खालीलप्रमाणे उपाययोजना सुचवता येतील.
१.बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवतींना रोज भेटून आरोग्यशिक्षण देण्यात यावे.
२.प्रथमोपचारांची माहिती आणि आवश्यक तिथे कीट देण्यात यावे.
३.शासकीय आरोग्य सुविधा आणि आदिवासी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जावा.
४.या भागात आजारावर अजूनही जडीबुटी वा जादूटोणा,मांत्रिक यावर विश्वास ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता पटवणे हेच काम आधी करण्यात यावे.
५.एक वर्ष वयाच्या बालकांच्या घरी दैनंदिन भेट देऊन आरोग्यविषयक आणि आहारविषयक मार्गदर्शन करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
६.सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना होणारे आजार, तक्रारी याकडे लक्ष पुरविण्यात यावे.
७.पारंपरिक उपचारांवर असलेला आदिवासींचा दृढ विश्वास आणि श्रद्धा नं दुखावता त्यांना या पद्धतीच्या मर्यादा समजावून सांगणं गरजेचं आहे.त्यांना शिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
८.पारंपरिक दाई/वैदू यांच्याच सहकार्यातून वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
९. आश्रम शाळेमध्ये शारीरिक शिक्षण तसेच अन्नशाश्त्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.
१०. अंगणवाडी मध्ये लहान मुलांसाठी अभ्यासक्रम निच्चीत करून त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण देण्यात यावे.
११. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावर स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या.
मागील अनेक वर्षांमध्ये मंत्र्यांचे दौरे झाल्यानंतरही स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या जागा भरल्या जात नाही आणि आरोग्य सुविधा व्यवस्तीत केल्या जात नाही, तसेच आदिवासींच्या मूलभूत गरजा भागविल्या जात नसतील तर कुणाला दोष द्यायचा?
८० आणि ९० च्या दशकात "आरोग्य चळवळीचे" अनेक प्रयोग झाले. डॉ. राणी बंग-अभय बंग आणि डॉ. शुभदा देशमुख- सतीश गोगुलवार (गडचिरोली), डॉ. मंदाकिनी आमटे-प्रकाश आमटे (हेमलकसा),डॉ. मेंबेल-रजनीकांत आरोळे (जामखेड),डॉ.शुभांगी अहंकारी-शशिकांत अहंकारी(तुळजापूर),आणि मेळघाटमध्ये डॉ.स्मिता कोल्हे-रवींद्र कोल्हे आणि अडव्होकेट पौर्णिमा उपाध्याय आणि अडव्होकेट बंड्या साने मंडळींनी सर्वंकष आरोग्याबाबत ग्रामीण तसेच आदिवासी भागात यशस्वी प्रयोग केलेले आहेत.आधिनिक शाश्त्राला पारंपरिक ज्ञानाची जोड देत आरोग्यासोबत सेंद्रिय शेती, वाणसौरक्षण, पशुपालन, औषधी वनस्पती, पारंपरिक बीजांचे जतन,रोपवाटिका,असे उपक्रम राबवत "समग्र आरोग्याचा" विचार केलेला दिसतो. कुपोषण निमोनिया मुळे होंणारे बालमृत्यू हे अविकसित, दुर्गम भागातील प्रश्न स्थानिक संसाधनांचा उपोयोग करून अत्यंत कमी खर्चात सोडवता येऊ शकते, या त्यांच्या प्रयोगाचे अनेक देशामध्ये अनुकरण होत आहे.त्यांनी दिलेला आरोग्य साक्षरतेच्या कामाचा वसा आपण सर्वांनी मिळून पुढे नेण्याचा प्रयत्न केला तरच कोविड १९ संक्रमणासारख्या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात मेळघाटमधील बालमृत्यू कमी होण्यास मदत होईल.