'ती'च्या डोक्यावरील समस्यांचा हंडा उतरणार तरी कधी ???

पाण्याचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आजपर्यंत स्त्रियांनीच पार पाडलेली आहे. आज देखील स्त्रियांच्या डोक्यावरील पाण्याच्या जबाबदारीचा हंडा खाली आलेला नाही. पाण्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यावर होणारे विविध परिणाम वाचा सागर गोतपागर यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये......;

Update: 2023-06-08 09:00 GMT

घरात बाया असल्यामुळे माणसं पाणी भरत नाय, आमालाच पाणी भरावे लागते. पाणी भरल्याशिवाय बाईला पर्याय नसे सकाळी लवकर उठून आमी सरकारी विहिरीवर पाण्याले जातोन. विहीर पुष्कळ खोलात हाय, डोस्किवरून पाणी आणावं लागते. कंबर दुखते डोका दुखते हातपाय दुखते हा दरोजचा तरास आमाले सहन करावे लागते. घरात नळ नाय नळ आला तर आमचा हा सगळा तरास कमी होऊन जाईल

घड्याळातील सेकंद काट्याप्रमाणे डोक्यावर भरलेला पाण्याचा हंडा घेऊन दररोज घर ते विहीर असंख्य येरझाऱ्या मारत पाणी भरणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील दुधमळा गावच्या लीलाबाई तुळशीराम कोकोडे यांची हि वाक्ये आहेत. पाणी भरण्याचा त्रास सहन करणारे या जिल्ह्यातील तसेच देशातील केवळ हे एकच गाव नाही. अनेक गावातील स्त्रिया पाणी भरण्याच्या या त्रासाला दररोज तोंड देत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वताच्या माथ्यावर अनेक दुर्गम धनगरवाडे आहेत. यामधील बहुतांश गावांपर्यंत नळ योजनाच पोहचलेली नाही. रायगड, सातारा, कोल्हापूर ते कोकणाच्या सीमेपर्यंत अशी नळ सुविधा नसणारी असंख्य गावे आहेत. या कुटुंबातील पाणी भरण्याची तसेच त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते. त्यामुळे त्यांना शारीरिक मानसिक त्रासाला नेहमीच सामोरे जावे लागते. पालघरसारख्या भागात तर आदिवासी महिलांना पाणी धुंडाळून आणावे लागते. घरी नळ नसल्याने सार्वजनिक विहीर, डोंगरातील पाण्याचे झरे, तलाव, जलाशय यातील पाणी भरून ते डोक्यावरून कडेवरून आणण्याचे जोखमीचे काम स्त्रियांना करावे लागते.



 


यामध्ये अनेक गर्भवती स्त्रियांचे गर्भपात तसेच विहिरीमध्ये पडून मृत्यूदेखील झालेले आहेत. पाईपमधून किचनमध्ये झुळझुळ वाहणाऱ्या नळातील पाण्याचा प्रवास आरामदायी असतो. पण डोंगरातील एखाद्या खडकाळ पायवाटेवरून भरलेला हंडा कंबरेवरून घरापर्यंत पोहचवण्याचा त्रास असह्य, वेदनादायी असतो. हा कठीण प्रवास करण्याची जबाबदारी इथल्या पुरुषी व्यवस्थेने पाणी वाहून घट्टे पडलेल्या महिलांच्याच कंबरेवर आणि डोक्यावर लादली आहे. डोक्यावरचा पदर सावरत महिला पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारीही पार पाडत असतात.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रेडेवाडी या गावातील विद्यार्थिनी रेशमा शेडगे सकाळी सहा वाजताच डोंगरातील झऱ्यावर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी येते. ती सांगते "आई आजारी असल्याने मला लवकर उठून डोंगरातील खडकाळ रस्त्याने पाणी भरण्यासाठी जावे लागते. यामुळे ८ किमी दूर असलेल्या मुरुड येथील माझ्या शाळेत जायला देखील उशीर होतो". याच सातारा जिल्ह्यातील बहुतांश दुर्गम गावांमध्ये हीच परिस्थिती आहे.




 


भारतात नळ सुविधा पोहचविण्याची जबाबदारी ज्या विभागाची आहे त्या जल विभागाच्या आकडेवारीनुसार अद्यापपर्यंत केवळ ३० टक्के नळ पुरवठा करण्यात सरकारला यश मिळाले आहे. याची दुसरी बाजू हि आहे की अद्याप ७० टक्के लोकांपर्यंत नळ पुरवठा होऊ शकलेला नाही. हा बहुतांश भाग ग्रामीण आदिवासी आहे. या क्षेत्रातील घरांमध्ये पाणी भरण्याचा तसेच पाण्याच्या व्यवस्थापनाचा भार हा स्त्रियांच्याच डोक्यावर आहे. शंभर टक्के नळ पुरवठा करण्याचे सरकारचे ध्येय आहे. परंतु त्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न फारच मर्यादित आणि तोकडे आहेत. पाणी हि निसर्गाची देणगी असून त्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. असे असतानाही पाण्याचे विषमतामुलक वाटप होण्याबरोबरच त्यांच्या सुविधा देण्यामध्ये देखील शहरात बिल्डिंग, झोपडपट्टी, ग्रामीण, आदिवासी असा भेद भारतात अस्तित्वात आहे. या सर्व भागात पाणी आणण्यासाठी जे कष्ट उपसावे लागतात ते कष्ट बहुतांश स्त्रियाच्याच वाट्याला येत असतात. पाण्याचे स्त्रियांच्या आयुष्यावर विविध दूरगामी परिणाम होतात

या संदर्भात स्त्री अभ्यासक मुक्ती साधना सांगतात " आजपर्यंत स्त्रियांनीच निसर्गाचे तसेच पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन केल्याचे दिसते. जिथे दुष्काळ असतो त्याचा सर्वात जास्त परिणाम देखील स्त्रियांवरच होतो. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोठमोठ्या धरणांच्या तसेच जलाशयाच्या बाजूला असलेल्या आदिवासी भागातील स्त्रियांना पायपीट करून पाणी धुंडाळून आणावे लागते. यामुळे स्त्रियांना मणक्याचे आजार होतात. स्त्रीला मासिक पाळी येत असल्याने स्वच्छतेसाठी पाण्याची गरज जास्त असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी आढळते. अनेक भागात सरकारने शौचालये बनवण्याच्या योजना काढल्या. शौचालये उभी राहिली. पण पाणीच नसल्याने त्याचा वापर केला जात नाही. शौचास जाण्यासाठी अनेक भागातील स्त्रीया अंधार होण्याची वाट पाहतात. शौचाची नैसर्गिक प्रक्रिया रोखून धरतात त्यामुळे स्त्रियांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. ओटी पोटाचे, पाण्याच्या कमतरतेमुळे आतड्यांचे, मणक्याचे आजार होतात. पाण्याचे व्यवस्थापन करताना ते पुरवून वापरताना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते.

पाण्यासंदर्भातील व्यवस्थापनाची हि अवस्था केवळ ग्रामीण आणि आदिवासी भागातच नाही. तर शहरातील झोपडपट्टीमध्ये देखील आढळते. शहरातील एकाबाजूला इमारतीच्या दहाव्या मजल्यावर मुबलक पाणी पोहचते तर त्याच्याच शेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये टँकर येतो. काही ठिकाणी रात्री उशीरा किंवा पहाटे पाणी सुटत असते. यासाठी इतर काम करूनही आराम करण्याच्या काळात स्त्रिया पाणी भरण्यासाठी सकाळी लवकर उठत असतात. राजश्री या मुंबईतील चेंबूर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गृहिणी आहेत. त्या सांगतात पाणी भरण्यासाठी मी सकाळी पाच वाजता उठते. उठायला थोडा जरी उशीर झाला तर पाणी पुरत नाही. भरलेले पाणी धुणी धूने, भांडी धुणे, अंघोळ यासाठी पुरेल याची काळजी दररोज घ्यावी लागते.




 


पाण्याच्या उपलब्धतेपासूनच जलव्यवस्थापन करण्यामध्ये स्त्रियांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अनेक जागतिक परिषदांमध्ये स्त्रिया आणि पाणी प्रश्नांवर चर्चा झाल्या आहेत. यामध्ये यासंदर्भात विविध ठराव देखील झाले आहेत. स्त्रियांचे मानसिक शारीरिक शोषण थांबवायचे असेल तर पाण्याच्या सुविधा घरापर्यंत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत भारतात काम सुरू आहे. या कामामध्ये स्त्रियांना सामावून घेतल्यास त्यांना त्या विषयाचे शात्रोक्त प्रशिक्षण दिल्यास त्यांच्याजवळ असलेल्या उपजत कौशल्याच्या आधारावर त्या आपले योगदान देऊ शकतील.

Full View

Tags:    

Similar News