एलॉन मस्क Twitter चे मालक, Mission Impossible की Endgame?
एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटरवर पूर्ण मालकी मिळवली आहे. या व्यवहाराकडे आर्थिक, सामाजिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या दृष्टीने पाहिले जाते आहे...पण त्याचबरोबर मस्क यांच्या अंतराळातही वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीकोनातून विचारल केला तर यानिमित्ताने टेक्नोक्रसीचा मुद्दाही चर्चेच आला आहे...
हॉलिवूडमधल्या अनेक सायफाय सिनेमांनी अख्ख्या जगाला वेड लावले आहे....अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वैज्ञानिकच कसे भविष्यातील जग चालवणार आहेत अशी मांडणी या सिनेमांमध्ये आहे....पण हे प्रत्यक्षात देखील होऊ शकते का, असा प्रश्न कुणी विचारला तर अनेकांचे उत्तर नकारार्थी येईल....पण कॅनडामध्ये अनेक दशकांपूर्वी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक चळवळ उभी राहिली होती...या चळवळीचे नाव होते टेक्नोक्रसी मुव्हमेंट....अर्थात वैज्ञानिकांनीच हे जग चालवावे, तेच उत्तम प्रकारे शासन आणि प्रशासन चालवू शकतात अशी धारणा या चळवळीतील लोकांची होती...याच चळवळीचे नेते होते ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांचे आजोबा....
एलॉन मस्क यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, अवकाश संशोधन यामधील आवडीचे आणि प्रगतीचे हेसुद्दा एक कारण असू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मुद्दा इथे का...याचे कारण जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच ट्विटरवर आता जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी आपला कब्जा केला आहे. मस्क यांनी ट्विटरचा काही टक्के हिस्सा खरेदी केल्यानंतरही कंपनीच्या संचालक मंडळात येण्यास नकार दिला होता, तेव्हाच मस्क यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे चालले आहे, याचा अंदाज सगळ्यांना आला होता. अखेर अपेक्षित ते घडले आहे आणि मस्क यांनी आता अख्खं ट्विटर विकत घेतले आहे. तब्बल ४४ बिलियन डॉलरला ट्विटरची खरेदी मस्क यांनी केली आहे.
ट्विटर कुणी खरेदी केले आणि ते कोण चालवणार यापेक्षा त्यावर वापरकर्त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले जाणार का प्रश्न आहे. एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीनंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे आणि ट्विटर हा असा डिजिटल टाऊन स्क्वेअर आहे ज्यावर मानवतेशी संबंधित विषयांवर वादविवाद होतात आणि चर्चा होतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ट्विटरमध्ये आणखी नवीन काही फिचर्स जोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. विश्वासार्हता, बॉट्सवर निर्बंध बंदी घातली जाईल तसेच भविष्यात कंपनीसाठी आणखी काही गोष्टी करण्याचा मनोदय मस्क यांनी व्यक्त केला आहे.
मस्क यांनी ट्विट खरेदी करण्याची चर्चा आताची असली तरी २०१७मध्येच त्यांनी ट्विटर खरेदीचा विचार जाहीरपणे बोलून दाखवला होता. तसे ट्विटच आता व्हायरल झाले आहे. पण मस्क यांनी ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती टेक्नोक्रसी चळवळीची....इतिहासतज्ज्ञ जील लिपोर यांनी या चळवळीच्या अनुषंगाने एलन मस्क यांच्या कृतींचे विश्लेषण केले आहे. मस्क यांच्या भांडवली धोरणाची पाळंमुळं याच विज्ञानवादी धोरणात असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे मस्क ट्विटरसारख्या प्रभावी सोशल मीडियाचा वापर कसा करतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर वापरकर्त्यांच्या राईट टू प्रायव्हसीचा आदर राखला जातो का, या माध्यमातून समाजविघातक अजेंडा राबवण्यावर निर्बंध येणार की अभिव्यक्तीच्या नावाखाली सूट मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे... मस्क यांचा दृष्टीकोन विज्ञानवादी असला तरी हॉलिवूडच्या साय-फाय सिनेमांनी विज्ञानाच्या अतिरेकी वापराचे धोकेही दाखवले आहेत....त्याचा विचार मस्क करणार का असेही मत ट्विटरवरच काहींनी व्यक्त केले आहेत..