नेमका फरक वाचा धुळवड आणि रंगपंचमी मधला...

देशामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. मात्र नागरिकांना होलिका दहन, धुळवड आणि रंगपंचमी यामध्ये नेमका फरक काय आहे, हे अद्यापही ओळखता येत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत रंगपंचमी आणि धुळवड यामध्ये नेमका काय फरक आहे ते...;

Update: 2023-03-07 15:12 GMT

 फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते. आणि शहरामध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे. मात्र होळीनंतर ४ ते ५ दिवसांनी रंगपंचमी येते आणि गावखेड्यामध्ये रंगपंचमी त्या दिवशी खेळली जाते. उत्तर भारतीय परंपरांच्या प्रभावामुळे आपल्याकडे सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत गेले. अशा बदलामुळे नेमकी रंगपंचमी कधी खेळली पाहिजे यांची माहिती सर्वसामान्यांना अद्यापही नाही. उत्तर भारतामध्ये होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. आणि त्याचा प्रभाव आपल्याकडे पडल्यामुळे आपण सुद्धा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्यास सुरवात केली.

पण खऱ्या अर्थाने होलिका दहन झाल्यानंतर त्या मोळीची उरलेली राख एकत्र करुन त्या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड राज्यात खेळली जाते. या राखेमध्ये मातीचा सुद्धा समावेश असतो. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट एकमेकांच्या शरीराला ही राख लावून धुळवड साजरी करतात. गावी आजही अशाप्रकारे धुळवड साजरी करण्याची प्रथा आहे. धुळवडला धूलिवंदन असेही म्हटले जाते. तसचे दुसरीकडे फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी महाराष्ट्रभर रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. तसे पाहिले तर खऱ्या अर्थाने या दिवशी रंग खेळण्याची आपल्याकडे प्रथा आहे. होलिका दहनानंतर पाच दिवसांनी येणाऱ्या रंगोत्सवाला ग्रामीण भागात रंगपंचमी म्हटले जाते आणि त्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

तर उत्तर भारतामध्ये होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. ती प्रथा आता आपल्याकडे रुढ झाली आहे. कालानुरुप या परंपरेचा प्रभाव आपल्याकडे जाणवू लागल्याने त्याचे अनुकरण करत आपणही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्यास सुरवात केली. पण यामुळे धुळवड आणि रंगपंचमी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि काही जणांना तर हे जाणवू लागले की, धुळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही सण एकच आहेत. पण असे नसून धुळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही सण वेगवेगळे आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  

Tags:    

Similar News