अफगाणिस्तानमधील महिला पत्रकारांवर बंदी येईल का?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तिथल्या महिलांच्या अधिकारांवर साधारणपणे कोणकोणती बंधन येतील? यासह मधील महिलांच्या नोकऱ्यांवर बंदी येईल का? अफगाणिस्तानमधील महिला पत्रकारांचं काय होणार? वाचा काय आहे तज्ज्ञांची मत?;

Update: 2021-08-19 03:08 GMT

अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानं सामान्य नागरिकांसह स्त्रियांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. गेल्या 20 वर्षात ज्या मुली शिकल्या त्या मुली आता कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, तालिबान्यांच्या विजयानंतर त्यांना पुन्हा एकदा घरात बसावं लागतं की काय? त्यांच्या पुढच्या पिढ्याचं काय होणार? असा प्रश्न आता त्यांना सतावत असताना अफगाणिस्तान मधील महिला पत्रकारांच्या करिअरसोबत आता जीव देखील धोक्यात आलं आहे.

तालिबान्यांनी महिलांना पुन्हा बुर्खा घालण्याची सक्ती केली आहे. घरातून बाहेर एकटं न पडण्याची सक्ती केली आहे. अशा परिस्थितीत महिला पत्रकार बाहेर पडून नव्याने सत्तेत आलेल्या या तालिबान्यांना जनतेचे प्रश्न थेट विचारले तर काय होईल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

त्यामुळं आता अफगाणिस्तानमधील महिला पत्रकारांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यात अफगाणिस्तानमध्ये पत्रकारीतेसाठी पोषक वातावरण नाही. पुरुष पत्रकार या ठिकाणी व्यवस्थेविरोधात पत्रकारिता करण्यासाठी घाबरतात. सततच्या हिंसाचारात स्वत:चा जीव मुठीत घेऊन इथं पत्रकारिता करायची असते. भारताचा फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी चा अफगाणिस्तानमध्ये बातमी कव्हर करताना मृत्यू झाला. यावरून तिथली दहशत आपल्या लक्षात येत असेल.

फेब्रुवारी 2021 ला संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2018 पासून 30 पत्रकार आणि इतर मीडिया हाऊस कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पत्रकारासाठी जगातील सर्वात धोकादायक देशापैकी एक देश आहे.

अफगाणिस्तानमधील मोजक्या महिला पत्रकारांमध्ये ज्या पत्रकारांचं नाव घेतलं जात अशा अएशा सांगते... "बरीच वर्षे मी एक पत्रकार म्हणून काम केले. विशेषत: अफगाणी महिलांचे प्रश्न मांडले. पण आता आमची ओळख नष्ट केली जात आहे'' आता आम्ही काही करु शकत नाही. अशी हतबलता अएशा ने द गार्डिएन ला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे.

ती सांगते गेल्या 24 तासात तिचं जीवनच बदलून गेलं आहे. आम्ही आमच्या घरातच बंदीस्त झालो आहोत आणि प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती आम्हाला वाटते. 2001 पासून अनेक महिला पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. टोलो न्यूजला पत्रकार म्हणून काम करणारी अएशा घरून निघताना दररोज भीतीमुळे आपला रस्ता बदलत त्यांना जावं लागतं. त्यांनी गेल्या काही वर्षात त्यांचे अनेक सहकारी गमावले आहेत. असं ती बीबीसी शी बोलताना सांगते...

तालिबानच्या एकूण परिस्थितीने तेथील महिला पत्रकारिता धोक्यात आली आहे का? असा सवाल आम्ही परराष्ट्र धोरण विश्लेषक कौस्तुभ कुलकर्णी यांना केला असता, ते म्हणाले...

त्या महिला स्थानिक पत्रकार असतील तर त्यांची पत्रकारीता आता धोक्यात आली आहे. त्यांच्या मनामध्ये ही नुसती दहशत आहे का? असा विचार तुम्ही करत असाल तर नाही. फक्त दहशत नाही तर भविष्यातील त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा विचार देखील इथल्या महिला करत आहे. या मुलींवर हे तालिबानी लोक भयंकर अत्याचार करतील. अत्याचाराची सीमा गाठतील.

खान म्हणून अफगाणी महिला आता इजिप्त राहतात... त्यांच्या मते पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या महिलांनी तालिबान्यांना प्रोत्साहन दिलं आहे. त्या ज्या पद्धतीने गेल्या आहेत. त्याची जाणीव त्यांना करुन द्यायची आहे. ही फक्त पत्रकार वर्गाची भीती नाही. ही सर्व महिला वर्गातील भीती आहे. या अगोदर सत्तेत आल्यावर देखील त्यांनी महिलांना शिक्षण दिलं जाईल. असं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी नंतर कशा प्रकारे अत्याचार केले हे जगाने पाहिलं आहे. असं मत कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.

2001 तालिबान्यांचं वर्चंस्व असताना नक्की महिलांवर कोणती बंधन होती. हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. कौस्तुभ कुलकर्णी यांनी तालिबान या अगोदर सत्तेत आल्यानंतर महिलांचा सन्मान केला जाईल. असं म्हटलं होतं. मात्र, आताही त्यांनी इस्लामच्या नियमांप्रमाणे महिलांना स्वातंत्र्य दिलं जाईल असं म्हटलं आहे. 2001 ला इस्लामच्या नियमाप्रमाणे नक्की कोणती बंधन होती. https://2001-2009.state.gov/g/drl/rls/6185.htm

महिलांनी चेहरा आणि हात पूर्ण झाकावे. महिलांनी कामासाठी बाहेर पडू नये. जर फारच महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावे. महिलांनी शिक्षण घेऊ नये. महिलांसोबत कोणी पुरुष नसेल तर त्यांनी घराबाहेर एकटीने पडू नये. स्त्रियांनी फक्त विशेष बसने प्रवास करावा. टॅक्सीने प्रवास करताना सोबत पुरुष नातेवाईक सोबत असावा. स्रिया त्यांचे नातेवाईक नसलेल्या व्यक्तींसोबत रस्त्यावर एकट्या फिरु शकत नाही. ज्या घरात महिला आहेत. त्या घरातील खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असाव्यात. ज्यामुळं शेजारील व्यक्ती घरात डोकून पाहणार नाहीत. महिलांच्या आरोग्यासेवावर बंदी

असे नियम तालिबान्यांनी घातले होते. या पार्श्वभूमीवर आत्ताच्या स्थितीला 20 वर्षानंतर तालिबानची परिस्थिती बदलेल का?

या संदर्भात आम्ही परराष्ट्र धोरण विश्लेषक जतीन देसाई यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले.. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. गेल्या 20 वर्षात इथल्या लोकांनी जो स्वातंत्र्याचा आनंद घेतला त्यावर आता गदा येणार आहे. 60-70 च्या दशकात इथल्या महिला मिनी स्कर्टवर फिरताना दिसायच्या. मात्र, पत्रकार परिषदेत तालिबान्यांनी महिलांनी इस्लामिक पद्धतीने वागावे लागेल. असं सांगितलं आहे. यावरून महिलांना आता अत्यंत कडवट प्रकारची वागणूक मिळेल. असं दिसून येतंय. आपल्याकडील मौलांनी इस्लामचं अर्थ गठण करताना उदारमतवादाने इस्लाम स्विकारला. मात्र, काही देशांनी तशा पद्धतीने तो स्विकारला नाही. त्यामुळं इथल्या महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली.

तालिबानच्या पुन्हा एकदा वर्चस्वामुळे येथील फक्त पत्रकार महिलांच्या स्वातंत्र्यावरच नाही तर एअरलआईन्समध्ये, एनजीओमध्ये, शाळेत, बॅंकेत काम करणाऱ्या महिलांवर बंधन येण्याची भीती आहे. यावर पुर्वी पेक्षा काही बदल होतील असं वाटतं का? असा सवाल केला असता जतीन देसाई म्हणाले... ही मानसिकता आहे. तालिबानी लोकांनी या अगोदर देखील महिला पत्रकारांना मारलं आहे. तालिबान आफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्यानंतर इथल्या महिलांच जगणं कठीण झालं आहे. असं मत जतीन देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरींत दोनही तज्ज्ञांचे कोट पाहिले असता, सर्वच महिलांच्या जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात ज्या महिला शिकल्या आहेत. त्यांना त्यांच्या अधिकाराची अन्यायाची शिक्षणामुळे जी जाणीव झाली आहे. त्यांच्या अधिकारांवर आलेल्या या बंधनांमुळे त्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags:    

Similar News