ज्याला दारूबंदी नको तो नगरसेवक आम्हाला नको
ताई माई अक्का विचार करा पक्का.. हा निवडणुकीचा प्रचाराचा फंडा बाहेर पडून जनसामान्यांचे प्रश्न आता निवडणुकीच्या तोंडावर आले आहे. गडचिरोलीत नगरपंचायत निवडणुकीत होतेय अनोखी मागणी पुढे आली असून दारुबंदी करणार नसला तर असा नगरसेवकच नको अशी भुमिका महीला मतदारांनी घेतली आहे.... प्रतिनिधी सागर गोतपगार यांचा रिपोर्ट...;
गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुका दारूबंदीच्या मागणीने नेहमीच चर्चेत असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत " जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्याला निवडणुकीत नक्कीच पाडू " उमेदवारांना असे आव्हान दारूबंदीच्या चळवळीत काम करणाऱ्या महिलांनी दिले होते. जिल्ह्यात आता ९ नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबरला होणार आहेत. निवडणुका आल्या कि प्रचारात दारूचे आमिष हे ठरलेले असते. दारूच्या आहारी गेलेले पुरुष या काळात दारू पिवून तर्र असतात. याचे त्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम होतात. यामुळे घरातील स्त्रीला यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. या काळात दारूचा वापर वाढत असतो. शहराशहरात झालेली दारूची अंमलबजावणी या काळात कमजोर होत असते. दारूची तस्करी देखील वाढते. हे लक्षात ठेवून या भागातील महिला नेहमीच सजग असतात. वेगवेगळ्या माध्यमातून त्या जनजागृती करत असतात.
निवडणुकीत मते मिळविण्यासाठी होणारा दारूचा वापर टाळण्यासाठी या जिल्ह्यात आता दारूमुक्त निवडणुक अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत निवडणुकी दरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे दारूचा वापर करणार नाही, असे जाहीर लेखी वचन नगर पंचायत उमेदवार देत आहेत. तसेच वार्ड सभेचे आयोजन करून 'दारूचा वापर करू देणार नाही, दारू स्वीकार करणार नाही व तसेच शुद्धीत राहूनच मतदान करणार' असे ठराव घेतले जात आहेत.
यंदाची नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी मुक्तिपथ अभियानाने जागृती सुरु केली आहे. शहरातील विविध वॉर्डांमध्ये बॅनर, पोस्टर व नागरिकांशी चर्चा करून जनजागृती केली जात आहे. 'शुद्धीत राहूनच मतदान करणार' असा ठराव विविध वार्डातील नागरिक सभा घेऊन घेत आहेत. या सोबतच उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी वचन लिहून देण्याचे आवाहन मुक्तिपथने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत विविध नगरपंचायचे उमेदवार सुद्धा 'नगरपंचायत निवडणुकीत मी मते मिळविण्यासाठी दारूचा वापर करणार नाही' अशा आशयाच्या पत्रावर स्वाक्षरी करीत संकल्प घेत आहेत.
निवडणूक काळात मतदात्याला दारू पाजून मत विकत घेण्याचा विकृत प्रकार चालतो. यात मतदारांचे आणि पर्यायाने लोकशाहीचे नुकसान होत आहे. त्यामुळे निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानाने केले आहे. लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच यंदाची नगरपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी प्रशासन व जनतेच्या सहकार्याने प्रयत्न सुरु आहेत.
दारूमुक्त राहून मतदान करा, व मतदाना द्वारे नगर दारूमुक्त करा. पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे आवाहन नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त करा. दारू पिउन मतदान करू नका. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मतदानाचा मिळालेल्या हक्काचा सन्मान करून जागृत होऊन मतदान करा, व अशा उमेदवारांना नगरसेवक म्हणून निवडून द्या, की जे नगर दारूमुक्त करतील.
निवडणुकीत दारू वाटणार नाही, दारू पिणार नाही, असे वचन देणाऱ्या उमेदवाराला मत द्या. वचननाम्यावर सही न करणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका. शहराचे, वार्डाचे सक्षम नेतृत्व निवडण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये असते. दारूच्या नशेत जर आपण मतदान केले तर आपला उमेदवार चुकीचा निवडला जाऊ शकतो. वार्ड व आपले शहर दारूमुक्त करेल अशाच उमेदवाराला आपल्या शहराचा नगराध्यक्ष बनवले पाहिजे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील ३० वर्षापासून कायद्याने दारू बंद आहे. मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षापासून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. पण निवडणूक काळात मतदात्याला आपल्या बुद्धीचा वापर करू न देता दारू पाजून मत विकण्याचा विकृत प्रकार चालतो. यामुळे मतदाराचे आणि पर्यायाने लोकशाहीचे नुकसान आहे. त्यामुळे हे आवाहन मतदार, उमेदवार आणि पर्यायाने सर्व जनतेला आहे.
याकरिताच निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराकडून लिखित वचननामा घेतला पाहिजे. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे वचन त्यांनी दिले पाहिजे. लोकशाहीत जनतेचा विजय झाला पाहिजे. जनतेला असे आवाहन पद्मश्री डॉ अभय बंग यांनी केले आहे. निवडणुकीत दारू वाटणार नाही, दारू पिणार नाही उमेदवारांनी दिले लेखी वचननामे
५४७ पैकी ५०८ उमेदवाराने लिखित तर २२१ नी दिले व्हिडीओ रेकॉर्डेड वचननामे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या ९ तालुक्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुक २०२१ करिता उभे असलेल्या एकूण ५४७ उमेदवारापैकी ५०८ उमेदवाराने दारूमुक्त निवडणूकिला पाठींबा दिला आहे. या ५०८ ने लिखित तर २२१ उमेदवाराने व्हिडीओ द्वारा रेकॉर्डेड वचननामे दिले आहे. मुक्तिपथ द्वारा दिलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत मतदारांना कुठल्याही प्रकारे दारूचे प्रलोभन दाखविणार नाही, दारू वाटप करणार नाही असे सांगत दारूबंदीला समर्थन दिले आहे, असे वचन त्यांनी दिले आहे.
उमेदवारांनी लिहून दिलेल्या वचननाम्यामध्ये 'जनतेला जाहीर वचन देतो की, नगरपंचायत निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळविण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास वॉर्डातील व शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन, मी दारू पिणार नाही. असे वचन देतो' अशा आशयाचा समावेश आहे.
कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत ६१ पैकी ६१ उमेदवारांनी वचनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. कोरची ५४, धानोरा ५२, चामोर्शी ४०, मुलचेरा ४६, एटापल्ली ६०, भामरागड ६२, अहेरी ७० व सिरोंचा ६३ अशा एकूण ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. मागील दोन आठवड्या पासून नगरपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या ९ तालुक्यात मुक्तिपथ टीम व स्वीप मतदाता कार्यकम जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्नातून मतदान जागृती व दारूमुक्त निवडणुकी साठी आवाहन करण्यात आले. शहरामध्ये मोठे बॅनर वार्डा-वार्डात मुख्य ठिकाणी पोस्टर, घरो घरी माहितीपत्रक, वार्ड सभा, ऑडीओ क्लिप, शॉर्ट व्हिडीओ इत्यादी विविध पद्धती वापरून जन जागृती करण्यात आली.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मतदानाचा मिळालेल्या हक्काचा सन्मान करून जागृत होऊन मतदान करा. दारू पिणाऱ्या, वाटणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका. दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू वार्डाचे सक्षम नेतृत्व निवडण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे. वार्ड व आपले शहर दारूमुक्त करेल अशाच उमेदवाराला आपल्या शहराचा नगराध्यक्ष बनवले पाहिजे. असे विविध संदेश या जनजागृती मधून देण्यात आले. या दारूमुक्त निवडणुकीच्या अभियानातून गडचिरोली जिल्ह्यात मागील ३० वर्षापासून कायद्याने असलेल्या दारूबंदीला व दारूमुक्त निवडणूक अभियानाला बळकटी मिळाली आहे.