पंढरपुरातील सोयी सुविधा बद्दल भाविकातून नाराजी
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर.. असं असलं तरी पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक दाखल झाले असून शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सोयी सुविधा बद्दल असमाधान व्यक्त करीत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा पंढरपुरातून ग्राउंड रिपोर्ट..;
तीर्थक्षेत्राचा दर्जा असूनही म्हणावा तेवढा विकास झाला नसल्याने शासनाच्या कामावरही भाविकातून नाराजीचा सूर एकवयास मिळत आहे. पंढरपूरला बारा महिने भाविकांची रीघ असते. त्यामुळेच शासनाने चंद्रभागा नदीत चांगल्या प्रकारचे घाट बांधावेत. नदीच्या दूषित पाण्याबद्दल लोकांत जनजागृती करावी. शौचालयासाठी कायमस्वरूपी मोठे कॉम्प्लेक्स बांधावे व ते भाडेतत्त्वावर द्यावेत. त्यातून शासनाचा ही फायदा होईल. पंढरपुरातील रस्ते लहान असून ते मोठे करण्यात यावेत. रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्याबाबतही वारकऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकांना राहण्यासाठी शासनाने धर्मशाळेची सोय करावी. त्यामुळे शासनाचा वेळ आणि पैसा ही वाचेल. तसेच मनुष्य बळ ही वाचेल. पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात,असे जालना जिल्ह्यातील वारकऱ्यांनी बोलताना सांगितले.
दिंडीत आल्याने उत्साह वाढतो
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना वारकऱ्यांनी सांगितले,की दिंडीत आल्याने उत्साह वाढून धार्मिक भावना जागृत होतात. महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग आणि माऊलीच्या आळंदी येथे सर्व लोक दुःख विसरून वारीत सहभागी होतात. जालना जिल्ह्यातून येत असताना आम्ही वाहनाने आलो. या वारीत आमच्या गावची दिंडी असून आम्ही त्यात सहभागी झालो आहोत. गावावरून आळंदीला जात असताना दोन दिवस लागले असून आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करण्यासाठी एकोणीस दिवस लागले आहेत. रस्त्याने येत असताना उन्ह, वारा,पाऊस जरी असला तरी माऊलीच्या ओढीने आम्ही पंढरपूरला चालत आलो आहे. त्यामुळे आम्हाला कोणालाही तकलीफ वाटली नाही. या वारीत कोणाला काटा सुद्धा मोडत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. लोक घरी फोमच्या गाडीवर झोपतात,पण वारीत लोक गवतावर आनंदाने झोपतात. तो पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. शासन,प्रशासनाने दिलेल्या सोयी सुविधा काही ठिकाणी चांगल्या आहेत तर काही ठिकाणी कमी आहेत. शासन चालवणारी शेवटी माणसेच आहेत. माणूस म्हणून आपण कमी पडतोच. दहा लाखांच्या वारकऱ्यासमोर शासकीय यंत्रणा कमी पडतेच.ते समजावून घेवून आनंदाने नाचून तल्लीन होत पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. पंढरपुरात आल्यानंतर एकदम समाधान मिळते. समाधान असे मिळते,की जे अब्जाधीशाला मिळत नाही ते आम्हाला मिळते.
पंढरपुरात अनेक सोयी सुविधांचा अभाव
पांडुरंग जगाचा मालक आहे. पण पंढरपुरात थोड्याशा उणीवा वाटतात. या चंद्रभागा नदीत घाट बांधणी केलेली नाही. शासनाकडून धर्मशाळा बांधण्यात याव्यात. पंढरपूरला येणाऱ्या काही भाविंकाकडे काहीच नसते. त्यांना दिंडीत यायला देखील पैसे नसतात. अशा लोकांसाठी शासनाने शासकीय धर्मशाळा बांधाव्यात. तसेच रेडिमेड शौचालयाच्या ऐवजी शौचालयाचे मोठे कॉम्प्लेक्स बांधावीत आणि ती बारा महिने कॉन्ट्रॅक्ट वर चालवायला द्यावीत. त्यामुळे शासनाला फायदा होवून मनुष्य बळ ही वाचेल. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीतील पाणी दूषित असून त्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास होऊन आजारी पडू शकतात. पंढरपूरला महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या बाहेरून लोक येत असतात. त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली असते. त्यामुळे भावीक पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागा नदीत मोठ्या श्रध्देने आंघोळ करत असतात. या मधून सर्व पाप धुवून जातात असे भाविकाना वाटत असते. त्यामुळेच ते चंद्रभागा नदीतील पाणी अंगावर घेत असतात.
या भाविकांना हे माहीत नसते की हे पाणी दूषित असते. काही भाविक मोठ्या आस्थेने चंद्रभागा नदीतील पाणी पितात आणि गावाकडे घेवून ही जातात. भाविक पाणी पिल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होवून आजारी पडू शकतात. त्यामुळे शासनाने या दूषित पाण्यावर काहीतरी उपाय योजना करावी. याच चंद्रभागा नदीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या राख दररोज टाकल्या जात आहे. त्यामुळे या नदीचे पाणी आणखीन दूषित होत चालले आहे. नदीतील पाणी वाहते नसल्याने पाण्यात अनेक घटक मिसळत आहेत. फक्त वारीच्या काळात नदीला पाणी सोडले जाते. इतर काळात पाणी सोडले जात नाही. चंद्रभागा नदीतील पाणी सातत्याने वाहत असते तर या दूषित पाण्याचा वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागला नसता. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महारष्ट्र शासनाने चंद्रभागा नदीत घाट बांधून नदीचे प्रदूषण कमी करावे. असे भाविकांना वाटत आहे.
पंढरपुरातील रस्ते ही खड्डेमय आणि अपुरे
पंढरपूर शहरातील रस्ते हे लहान आकाराचे असल्याने वारीच्या काळात वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहनांची गर्दी होती. त्यामुळे वाहतूक तासनतास खोळंबली जाते. शहरातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. येथे बारा महिने भाविक येत असतात. त्यांना चांगल्या सोयी सुविधा शासनाने देणे आवश्यक आहे. पंढरपूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा असतानाही पंढरपूरचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने वारकऱ्यातून असमाधान व्यक्त केले जात आहे.