विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माहेरी आल्यासारख वाटतयं..
पंढरपूरच्या वारीमध्ये पुरुषांच्या सहभागी बरोबरच महिलांचा सहभागही वाढत आहे. अडीअडचणीवर मात करत पंढरीत माहेरपण अनुभवणाऱ्या नारीशक्तीचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे अशोक कांबळे यांनी...;
पंढरपूरच्या विठूरायाला नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या बाहेरून भाविक भक्त येत असतात. नुकतीच आषाढी एकादशी संपन्न झाली असून या एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. त्या सध्या पंढरपुरात मुक्कमी असून या दिंड्या आपल्या गाव खेड्यातून गेल्या महिनाभरापासून पायी चालत पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. या दिंड्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तितक्याच उत्साहाने सहभागी झालेल्या असून पुरुषांच्या बरोबरीने त्या चालत आलेल्या आहेत. महिला मैलोनमैलचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असल्याने थकवा जाणवत नसल्याचे वारीत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. या वारीत महिला आरोग्याची विशेष अशी काळजी घेतात. त्यांना थकवा अथवा आजारपण जाणवू लागल्यास दिंडीतील सहकारी दवाखान्यात नेतात. पण शक्यतो चालत असताना विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे कोणत्याच प्रकारचा थकवा जाणवत नाही. सातत्याने दिंडीसोबत चालत राहतो. दिंडी ज्या ठिकाणी मुक्कामी असते त्या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना जेवण बनवण्याचे काम महिला वारकरी करतात. याच बरोबर कांदा चिरणे,लसूण सोलने,पुरुषांना चहाचे वाटप करणे यासारखी कामे महिला वारकरी दिंडीत करतात व आपली सेवा बजावतात.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेडगाव या गावातील दिंडी सध्या पंढरपुरात मुक्कामी असून या दिंडीतील महिला वारीसोबत पंढरपुरात येत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगतले. पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माहेरी आल्यासारखे वाटत असून वारीत आल्यानंतर संसाराचा विचार मनाला शिवला देखील नाही. आता पंढरपुरात आल्यानंतर परत माघारी जावू वाटत नाही. कोरोनाच्या लॉक डाऊनच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर पंढरपूरात येवून विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मोठे मानसिक समाधान मिळाले आहे. असे वारकरी महिलेने बोलताना सांगितले.
मानाच्या पालख्यांचा गुरू पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्काम
पंढरपुरात महाराष्ट्रातून अनेक पालख्या येत असतात. या पालख्यामध्ये पुण्यातून येणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या गुरू पौर्णिमेपर्यंत मुक्कामी असतात. गुरू पौर्णिमे दिवशी गुरू आणि शिष्याची भेट होते असे सांगितले जाते. याच मानाच्या पालख्या बरोबर शेगाव ची गजाजन महाराजांची पालखी यासह अनेक पालख्या मुक्कामी आहेत. त्यामुळे सध्या पंढरपुरात अनेक पालख्या मुक्कामी असल्याच्या दिसतात. या पालख्या किंवा दिंड्या तीन ते चार दिवसांनी आपापल्या शहरात,गाव खेड्यात परत जाणार आहेत. पण पंढरपुरात अनेक वारकरी तंबू मारून राहण्यास आहेत. ते सातत्याने भजन,कीर्तन करत आहेत. या वारीत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तितक्याच उत्साहाने सहभागी झालेल्या असतात. त्यांच्यात उच्च-नीच्चता नसते सर्व एकसमान असतात. या वारीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेली असल्याने वारी ही सर्वधर्म सभवाचा संदेश देत असल्याची अनेक वारकऱ्यांची भावना आहे.
दिंडी सोबत चालत असताना कोठेच थकवा जाणवला नाही
सांगली जिल्ह्यातील पेडगावच्या महिला वारकरी लक्ष्मी विश्वनाथ कोळी यांनी बोलताना,की आम्ही पेडगाव पासून आटपाडी पर्यंत ज्यावेळेस चालत आलो,त्यावेळेस आम्हाला थकवा सुद्धा जाणवला नाही. सर्वांच्या सहकार्याने गोड आनंदी वातावरणात आम्ही पंढरपूरला पोहचलो. चालत असताना किती ही कंटाळा आला तरी कंटाळा अथवा थकवा जाणवला नाही. वारीत चालत असताना आनंद एवढा होता,की असला आनंद सोहळा कोठेच मिळणार नाही. दिंडी सारखा आनंद म्हणजे कोठेच शक्य नाही. दिंडीत ताप,थंडी,हातपाय दुखत असल्यास आमचे सहकारी क्षणोक्षणी काळजी घेत होते. त्यामुळे पंढरपुरात यायला आम्हाला अजिबात कंटाळा आला नाही.
पेडगावच्या दिंडीत महिला-पुरुषासह 130 वारकरी सहभागी
पेडगावच्या दिंडीत 130 वारकरी सहभागी झाले असून त्यामध्ये 80 महीला सहभागी झाल्या आहेत. ही दिंडी गावातून 4 जून रोजी निघाली होती. ती 9 जून रोजी पंढरपुरात पोहचली आहे. या दिंडीतील महिलांनी बोलताना सांगितले की, पंढरपुरात आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला आहे,की गावाकडे परत जावू वाटेना गेले आहे. चालत येत असताना आमच्यात एकोपा होता. पण या वारीत घर,संसार काहीच आठवले नाही.
वारकऱ्यांना जेवण्यासाठी महिला वारकरी करत होत्या स्वयंपाक
गावापासून दिंडी निघाल्यानंतर या दिंडीचे चार ठिकाणी मुक्काम झाले. पंढरपूरकडे येत असताना या दिंडीतील महिला वारकरी स्वयंपाक बनवण्याचे काम करत होत्या. याच बरोबर कांदा चिरणे,भाजी करणे,लसूण सोलने यासारखी कामे महिला करत असत. त्याच बरोबर पुरूष वारकऱ्यांना चहा देण्याचे काम महिला वारकरी करत होत्या. कधी-कधी हेच काम पुरूष वारकरी ही करत असत. या वारीतील महिलेने बोलताना सांगितले,की या दिंडीतील पुरूष आणि महिला समानतेने राहत असत. मी पहिल्याच वेळी दिंडीत आले,पण मला दिंडीत आल्यासारखे वाटत नाही. मी माहेरी गेली आहे आणि कृष्णाच्या गोकुळात गेली आहे, अस वाटत आहे. महिला आणि पुरुषांनी वेगवेगळी भजने केली नाहीत. सर्वजण एकसमान राहून भजन आणि किर्तन करत होतो. यामध्ये गाणी म्हणणे,विठ्ठलाचे अभंग म्हणत पायी प्रवास केला. हा प्रवास चांगल्या सुखाने झाला असून आम्ही आज घराकडे परत माघारी चाललो आहोत.
कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर प्रथमच विठ्ठलाचे दर्शन घेत असल्याने मोठे मानसिक समाधान
या दिंडीतील महिलेने सांगितले,की गेल्या दोन वर्षापूर्वी पायी वारी केली होती. त्यानंतरच मी पंढरपुरात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढ महिना कधी येतोय असे वाटत होते. दोन वर्षे देऊळ बंद होते. आता तिसऱ्या वर्षी चालू झाल्याने समाधान वाटत आहे.
ज्या सुखाने देव वेडावला वैंकुंठ सोडूनी संतांच्या दर्शिनी राहिला
पेडगावतून पंढरपुरात दिंडी येत असताना सात दिवस लागले असून दिंडीला किंवा वारीला यायचे म्हणून यायचे नाही. ज्या सुखाने देव वेडावला वैंकुंठ सोडूनी संतांच्या दर्शिनी राहिला. म्हणजे संतांच्या वचनी आपल्याला कोठेतरी विठ्ठल भेटतो. यासाठी ही पायी दिंडीत करायची असते, असे या दिंडीतील महिलेने बोलताना सांगितले.
चालत असताना आरोग्याची योग्य काळजी घेतली
महिलांनी चालत असताना आरोग्याची योग्य काळजी घेतली. पण चालत असताना थोडाही थकवा जाणवला नाही. आमच्या सहकाऱ्यांनी योग्य काळजी घेत. वेळोवेळी सहकार्य करून दवाखान्यात नेहले. आम्हाला उन्ह,वारा,पाऊस याचा काहीच त्रास झाला नाही. नामस्मरणात एकदा तल्लीन होवून गेलो,की आम्हाला काहीच वेदना जाणवत नव्हत्या. असे वारकरी महिलेने सांगितले.
पंढरपुरात आल्यानंतर माहेरी आल्यासारखे वाटत आहे
या वारीतील महीलेने बोलताना,की पंढरपुरात पोहचल्यानंतर अस वाटतय,की माहेरी आले आहे. संसाराचा विचारच मनात आला नाही. आता गावाकडे माघारी जावू वाटेना गेले आहे. या दिंडीत पहिल्याच वर्षी आली असून विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने मोठे समाधान मिळाले आहे.