दिवसेंदिवस पंढरपूर शहरात लोकसंख्या वाढत असून त्यासाठी या शहराची व्यवस्थित नगर रचना व्हावी,यासाठी तीर्थ क्षेत्र विकास आराखडा मंजूर कण्यात आला आहे. या विकास आराखड्यात पंढरपूरच्या आजूबाजूला असणाऱ्या सहा गावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये वाखरी गावचाही समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सहभागी होण्यास वाखरी गावाने तीव्र विरोध दर्शवला असून विशेष ग्रामसभा घेवून प्रस्तावित तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सहभागी न होण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
पंढरपूरला ऐतिहासिक महत्व असून याठिकाणी पांडुरंगाचे प्राचीन मंदिर आहे. पंढरपूरला दररोज हजारो भाविक-भक्त येत असतात. विविध प्रकाराच्या होणाऱ्या एकादशीला पंढरपुरात गर्दी होत असते. यामध्ये आषाढी आणि माघी एकादशी महत्वाची मानली जाते. या दोन्ही एकादशीना पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा जनसमुदाय एकवटलेला असतो. या शहरात बारा ही महिने भाविक-भक्तांची रीघ लागलेली असते. त्यामुळेच या ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग स्थिरावले असून दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढतच चालला आहे. पंढरपूर शहरात नगर पालिका असून दररोज या नगर पालिकेला नागरिकांना सोयी-सुविधा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारीच्या काळात तर नगर पालिकेची मोठी तारांबळ उडते.
आषाढी वारी आणि माघी वारीच्या काळात पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूने पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,महसूल प्रशासन असे अनेक विभाग रात्रंदिवस काम करत असतात. यामध्ये एसटी महामंडळ देखील महत्वाची भूमिका बजावते. वारीच्या काळात एसटी महाराष्ट्राच्या विविध भागात वारकऱ्यांना पोहचवण्याचे काम करते. त्यामुळे पंढरपूर मधील गर्दी कमी होवून प्रशासना वरचा ताण कमी होण्यास मदत होते.
दिवसेंदिवस पंढरपूर शहरात लोकसंख्या वाढत असून त्यासाठी या शहराची व्यवस्थित नगर रचना व्हावी,यासाठी तीर्थ क्षेत्र विकास आराखडा मंजूर कण्यात आला आहे. या विकास आराखड्यात पंढरपूरच्या आजूबाजूला असणाऱ्या सहा गावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये वाखरी गावचाही समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सहभागी होण्यास वाखरी गावाने तीव्र विरोध दर्शवला असून विशेष ग्रामसभा घेवून प्रस्तावित तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सहभागी न होण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात वाखरी गावचा समावेश झाल्यास आमच्या गावातील लोकांना टॅक्स भरणे सुद्धा अवघड होवून बसणार आहे. या आराखड्यात गावचा समावेश झाल्यास नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणीचा सामना देखील करावा लागणार आहे. त्यासाठी प्रस्तावित तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सहभागी न होण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याचे वाखरी गावच्या सरपंच धनश्री साळुंखे यांनी सांगितले.
वाखरी गावात असतो पालख्यांचा मुक्काम
वाखरी गाव पंढरपूरला अगदी चिटकुन असून या ठिकाणी पालखी तळ आहे. वारीच्या काळात याठिकाणी पालख्यांचा मुक्काम असतो. लाखो वारकरी वाखरी गावच्या मैदानावर थांबतात. आषाढी वारीला पुण्यातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने येतात. यामध्ये लाखो भाविक-भक्त सामील झालेले असतात. वारकरी पंढरपूरच्या दिशेने येत असताना ठिकठिकाणी मुक्काम करत येतात. या दिंड्याचे रिंगण सोहळे देखील होत असतात. दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी असतात,त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती वारकऱ्यांना प्राथमिक सोयी - सुविधा देण्याचे काम करतात. शेवटी पंढरपूरच्या जवळ दींड्या आल्या नंतर शेवटचा मुक्काम आणि रिंगण सोहळा वाखरी गावात होतो. पालख्यांच्या मुक्कामासाठी वाखरी गावातील सातारा रस्त्याला लागून असलेली सुमारे दीडशे एकरच्या आसपास जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. वाखरी गावच्या रिंगण सोहळ्याला वर्षानुवर्षांची परंपरा असून या पालख्याना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचे काम वाखरी गावची ग्रामपंचायत करत आली असल्याचा दावा सरपंच धनश्री साळुंखे करतात. आजपर्यंत असुविधांच्या बाबतीत कोणाची तक्रार आली नसल्याचे आवर्जून त्या नमूद करतात. वाखरी गावाला ऐतिहासिक महत्व असून ते पुसले जाईल,अशी भीती येतील ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांना टॅक्स वाढण्याची भीती
वाखरी गावातील नागरिकांचे उपजीविकेचे साधन शेती असून शेतीवर अवलंबून असणाऱ्या मजुरांची संख्या निम्मी असल्याचे सांगितले जात आहे. या गावचा तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाल्यास टॅक्स दुप्पट होण्याची भीती येथील गावकऱ्यांना आहे. येथील बहुसंख्यांक वर्ग शेतमजूर असल्याने त्यांना नगरपालिकेचा दुप्पट टॅक्स भरण्यास पैशाची अडचण येणार असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातील नागरिकांची काही कामे निघाल्यास ते नगर परिषदेमध्ये जावू शकणार नाहीत. त्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आता पंढरपूर नगरपालिकेपेक्षा चांगल्या प्रकारच्या सुविधा वाखरी ग्रामपंचायत देत आहे. गावात चांगले रस्ते,गटारी,पाणी याच्या उत्तम सुविधा असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्याचबरोबर टॅक्स ही कमी प्रमाणात भरावा लागतो. त्यामुळे वाखरी गावच्या ग्रामस्थांचा तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट होण्यास तीव्र विरोध असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
वाखरी गावची जमीन विविध प्रकारच्या विकास कामांसाठी संपादित करण्यात आली
वाखरी गाव पंढरपूर शहराला चिटकुन असल्याने वाखरी गावाने पंढरपूर शहराच्या वाढत्या लोक संख्येला आपल्या पोटात सामावून घेतले आहे. वाखरी गावच्या आसपास असणारी मोकळी जमीन विविध विकास कामासाठी संपादित करण्यात असल्याचे येथील नागरिक सांगतात. या गावाच्या खालच्या बाजूने पालखी मार्ग गेला आहे. त्यासाठी या गावातील शेतकऱ्यांची जमीन काहीशा प्रमाणात अधिग्रहण करण्यात आली आहे. तसेच याच गावच्या परिसरातून सातारा हायवे गेला आहे. या रस्त्यासाठी सुद्धा या गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमीन गेली आहे. वाखरी गाव च्या परिसरात विमानतळ आणि पोलीस स्टेशन साठी सुद्धा शेतजमीन संपादित करण्यात आली असल्याचे येथील नागरिक सांगतात. याच गावच्या परिसरात गुरांचा बाजार देखील भरला जातो. त्यामुळे पंढरपूर शहराच्या दृष्टीने वाखरी गाव अतिशय महत्वाचे आहे. पंढरपूर शहराचा वाढता विस्तार ही या गावात येवून ठेपला आहे. त्यामुळे या गावची लोकसंख्या वाढत चालल्याचे दिसून येते. आमच्या गावातील जागा,शेतजमिनी कमी होत असल्या तरी गावाला ऐतिहासिक महत्व असल्याने कोणत्याही परिस्थितीत आम्ही या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात सामील होणार नसल्याची ठाम भूमिका वाखरी गावच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.
विशेष ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतीने केला ठराव
वाखरी गावच्या ग्रामस्थांनी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात आमच्या गावाला समविष्ट करण्यात येवू नये,यासाठी विशेष ग्रामसभा घेवून तशा प्रकारचा ठराव देखील केला आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. येणाऱ्या काळात वाखरी गाव आणि प्रशासनात संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विकास आराखडा म्हणजे काय
एखाद्या शहराचा नियोजन पूर्वक विकास करण्यासाठी पुढील अनेक वर्षाचा विचार करून रस्ते,गटारी,हॉस्पिटल, एमआयडीसी,बाजार,जागा आरक्षित केल्या जातात. यामध्ये रस्ते मोठे करत असताना आराखड्यात येणारी अतिक्रमणे देखील काढण्याचे काम केले जाते. यामध्ये पंढरपूर शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पंढरपूर शहरातील नागरिक देखील आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहेत.