ऊसतोड स्थलांतर थांबवण्याचा गावकऱ्यांचा निर्धार
वर्षानुवर्षांचा दुष्काळ, दुष्काळामुळे पिकांचे नुकसान. या परिस्थितीत ऊसतोडीसाठी स्थलांतर करणे हेच उदरनिर्वाहाचे साधन. ऊसतोडीमुळे होणारी वणवण थांबवण्यासाठी बीड जिल्ह्यातील या गावानेच पुढाकार घेतलाय. वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट…;
कायमस्वरूपी दुष्काळाची परिस्थिती. उन्हाळयात तर पाखराला प्यायलाही थेंबभर पाण्याची वणवण. शेतात उत्पन्न नाही. त्यामुळे ऊसतोडी साठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या स्थलांतराचे मुलांच्या शिक्षणावर स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या ध्येयाने बीड जिल्ह्यातील केतूरा या गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.
खालावलेली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातुन या गावात जे सी बी मशीन देण्यात आले आहे. या माध्यमातुन जलाशयातील गाळ काढणे विविध पाणलोट उपचार ग्रामस्थ स्वतः श्रमदान करुन करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गावाला पाणीदार करण्याचा निर्धार गावाने केलाय. गावातील जलाशयात साचलेल्या गाळामुळे पाणीसाठा कमी होतो. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात विनामूल्य देण्यात येत असल्याची माहिती बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे.
गावाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी केतुरा गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. लोकांचा सहभाग शासनाचा पुढाकार या समीकरणातून गावाला पाणीदार करण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे. नाम फाऊंडेशनने मशीनची मदत केली आहे. तरीही या कामासाठी डिजेलची आवश्यकता आहे. तरी संस्था संघटना आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन या ग्रामस्थांनी केलंय…