पृथ्वीवरची आणीबाणी, मानवजात वाचवण्यासाठी लढा

उत्तराखंडमध्ये हिमनदी वितळून झालेल्या दुर्घटनेला तापमानवाढ कारणीभूत असल्याचे दावे केल जात आहेत. पण मुळातच पृथ्वीवर पर्यावरणीय आणीबाणी निर्माण होण्यास मानवाची हीच धारणा कशी चुकीची ठरते आहे याचे विश्लेषण केले आहे पर्यावरण तज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी...;

Update: 2021-02-20 01:30 GMT

उत्तराखंडात हिमनदी वितळून झालेल्या दुर्घटनेने अनेकांना जागतिक तापमानवाढीबाबत जाग आली. यावेळी डोंगरांमधील बांधकाम आणि वाढते तापमान या दोन गोष्टी जबाबदार आहेत येथपर्यंत आकलन पोहोचले. परंतू तरीही धरण ही चूक आहे आणि आधुनिक बांधकाम करूच नये असे अजूनही वाटत नाही. तसेच जागतिक तापमानवाढ जबाबदार आहे, म्हणजे नक्की काय, हे देखील अजून सर्वसाधारण जनताच नव्हे तर उच्चशिक्षितांच्याही लक्षात येत नाही, कारण काही पिढ्या कृत्रिम जगात वाढल्या आहेत.

सन १८२४ मधे फ्रान्समधे सिमेंटचा शोध लागला आणि बांधकामांचे स्वरूप बदलले. १८७०-८० च्या दरम्यान आरसीसी पध्दतीच्या बांधकामाचा शोध लागला आणि न्यूयॉर्क - मॅनहटनमध्ये गगनचुंबी टॉवर्सचे युग सुरू झाले. १८७९ मधे एडिसनच्या कंपनीने न्यूयॉर्क शहराला वीजपुरवठा सुरू केला आणि जगात शहरीकरणाचा स्फोटक अध्याय सुरू झाला. सन १८९३ मधे अमेरिकेत 'टेन्नेसी' नदीच्या खोऱ्यात टेन्नेसी व्हॅली ऑथॉरिटीने आरसीसी बांधकामांवर आधारित आधुनिक प्रचंड धरण बांधणी सुरू केली. रस्ते, महामार्ग, बंदर, विमानतळ, रिफायनऱ्या, औष्णिक विद्युत केंद्रे बांधली जाऊ लागली. याला प्रगती व विकास मानून जगभर याचे अंधानुकरण सुरू झाले.

भारतही मागे राहिला नाही. पुढे मोटार आणि दुचाकींच्या शोधांबरोबर सिमेंट - स्टील निर्माण व रस्ते, महामार्गांच्या निर्मितीचे जाळे जग व्यापत गेले. वीजेबरोबर उद्योग, बांधकाम, वाहतुक आणि वस्तुनिर्मितीसाठी पृथ्वीची कोट्यवधी वर्षांची जडणघडण उखडली जाऊ लागली. त्यात धरणांशी जोडलेल्या रासायनिक-यांत्रिक शेतीने भर घातली.

Source: Google.com (Representative Image)

कृत्रिम जगाने मानवी जीवन व मन व्यापले. माणूस अस्सल जगाचा भाग राहिला नाही. आता त्याच्या वर्तनामुळे पृथ्वीवर जीवनासाठी शेवटचा अंक सुरू झाला आहे. तरी रूढ विचारांची पठडी तो मोडू इच्छित नाही. अस्सल जगात येऊ इच्छित नाही. उत्तराखंडातील हिमस्खलन केवळ तेथे बांधकाम झाले म्हणून होत नाही. ते जगात कोठेही बांधकाम, वीजनिर्मिती, उद्योग, वाहतूक व रासायनिक - यांत्रिक शेती झाली तरी होते. तीच गोष्ट इतर पर्वतांवरील आणि आर्क्टिक, अंटार्क्टिकावरील वेगाने वितळणाऱ्या बर्फाबाबत आहे.

१५ जून २०१३ रोजी दोन हिमनद्या खाली घसरल्याने केदारनाथची दुर्घटना झाली. हे पावसाळ्यात घडले. हजारो वर्षे पावसाळा सुरू झाल्याबरोबर हिमालयातील तापमान शून्याखाली जात होते. बर्फ वितळत नव्हते. हिमनद्या हिवाळ्यात बर्फ जमा होणाऱ्या काळात वितळल्या. केदारनाथ दुर्घटनेच्या आधी दि. १२ मे २०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड वायूने ४०० पीपीएम ( १ पीपीएम = ३०० कोटी टन ) ही धोकादायक पातळी ओलांडली होती. दि. २८ मे २०१३ रोजी अमेरिकेत 'ओक्लाहोमा' शहरातून गेलेल्या नरसाळ्याच्या आकाराच्या वादळाने ( टोर्नेडो ) शहर बेचिराख केले. या वादळाचा ३२० किमी प्रतितास हा वेग त्या प्रदेशातील विक्रम होता. ४०० पीपीएम ओलांडल्यापासुन पृथ्वीवर ऐतिहासिक स्वरूपाच्या अभूतपूर्व दुर्घटना सातत्याने घडत आहेत. आता भर हिवाळ्यात हिमालयात तापमान शून्याच्या बरेच वर गेले म्हणून बर्फ मोठ्या प्रमाणात वितळले व दुर्घटना घडली, असे हजारो वर्षे घडत नव्हते.

Source: Google.com (Representative Image)

जगभरातील बर्फाचे आवरण वाढत्या तापमानामुळे घटत आहे. पृष्ठभाग तापत असल्याने पर्वत उघडे पडत आहेत. थंडावा असलेल्या वरच्या भागातच फक्त बर्फ उरत आहे. उघडे झालेले पर्वत वनस्पती वा गवताच्या आवरणाशिवाय आहेत. माती, दगड भराभर धुपून जात आहे. हिमकडे त्यांना घेऊन कोसळत आहेत. खालील धरणे, जलाशय फुगत आहेत. आता लागोपाठ मोठ्या दुर्घटनांची साखळी सुरू होईल.

धरणे बांधणे ही चूक होती. वाहणे हा नदीचा धर्म आहे. त्या जैव विविधतेची धारणा करतात. नद्या करोडो वर्षे जीवनाचा आधार होत्या. त्या, कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषणाऱ्या हरितद्रव्याचे साठे आहेत. नदीतील वरच्या बाजूला असलेली जीवसृष्टी जंगल बुडाल्याने आणि खालील जीवसृष्टी धरणांमुळे नदी सुकल्याने नष्ट झाली. आधुनिक माणसांना वीज देण्यासाठी नद्या वाहत नाहीत. धरणे औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्थेसाठी बांधली गेली, शेतीसाठी नाही.

मोटार व इतर वाहन कुठेही धावले, सिमेंट, स्टील व लाद्यांचे बांधकाम कुठेही झाले, कारखाने, उद्योग कुठेही चालले, वीज कुठेही बनली वा वापरली, रासायनिक शेती कुठेही केली तरी कार्बन उत्सर्जन होते. उष्णता वाढते आणि हिमालयातील बर्फ वितळते, हिमनदी कोसळते.

याचा अर्थ आपण याला जबाबदार आहोत. या आकलनापर्यंत सरकार आणि पर्यावरणवादीही पोहचत नाहीत. १९९० पासुन अर्थव्यवस्था दामटण्यासाठी प्रसारमाध्यमांमधे संपादक पेरले गेले. कालपर्यंत तापमानवाढीची खिल्ली उडवणारे यातील काही महाभाग आता, कंत्राटदारकेंद्री विकासाला दोष देत आहेत व पुन्हा दिशाभूल करत आहेत. यांना स्वयंचलित यंत्रापासून आलेली पृथ्वीविरोधी व जीवनविरोधी विकास कल्पना सोडायची नाही. एखाद्या मद्यप्याप्रमाणे यांची स्थिती आहे.

Source: Google.com (Representative Image)

आधीच खुप उशीर झाला आहे. तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. गतवर्षी ऑगस्ट २०२० मध्ये २°सरासरी वाढीची मर्यादा ओलांडली गेली. 'पॅरिस करार' अयशस्वी झाला आहे. पर्यावरणीय विभाग दरवर्षी ३५ मैल या भयंकर गतीने विषुववृत्तापासुन ध्रुवांकडे सरकू लागले आहेत. आता कार्बन उत्सर्जन कमी करण्याने भागणार नाही. सौर, पवन इ. ऊर्जास्त्रोत तापमानवाढ रोखणार व आपणास वाचवणार हे अज्ञान आहे. पृथ्वी व निसर्गाची व्यवस्था जी स्वतः व्यवस्थापन करते तिच्या हाती तात्काळ मानवजातीला सोपवणे व आपला हात काढून इतर जीवमात्रांप्रमाणे निसर्गाला व्यवस्थापन करू देणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे. वितंडवाद घालण्याची, माहितीचा कीस काढण्याची ही वेळ नाही. याने फक्त अहंकार सुखावेल, बौद्धिक आनंद मिळेल पण मानवजातीचे उच्चाटन होईल. काय निवडाल ?

या प्रश्नाबाबतचे समाजाचे आकलन अपुरे आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने झाडांची किंमत ठरवली. कार्बन क्रेडिट किंवा झाडांची वा पृथ्वीच्या घटकांची किंमत ठरवणे, ही अर्थव्यवस्थेमुळे मिळालेली विचारांची चुकीची दिशा आहे. अशाने मानवजात व जीवसृष्टी वाचणार नाही.

आपल्या मुला-नातवंडांचे अस्तित्व, की मोटार बाईक, वीज, सिमेंट, मार्बल, टीव्ही, काँप्युटर, मोबाईल, फ्रीज, धुलाई यंत्र, एसी इ., कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा, पृथ्वीच्या घडणीचा नाश घडवणाऱ्या, प्रगती, विकास, सुख, सोय व प्रतिष्ठेच्या नावाने, संमोहित करणाऱ्या गोष्टी. यातील एकच अस्तित्व निवडता येईल. पर्यावरणासोबत, खरेतर जीवनासोबत, भौतिक ऊर्जाग्राही विकास शक्य नाही.

पृथ्वी या असाधारण ग्रहावर सर्व जीवमात्र जीवनाच्या देणगीने समाधानी आहेत. फक्त आधुनिक माणुस कृत्रिम जगाच्या आहारी गेला आहे. त्या गोष्टी पृथ्वी निर्माण करत नसल्याने त्याला पैसा लागतो. म्हणून असंबद्ध, अतार्किक, अवैज्ञानिक, अशाश्वत व अनैतिक अर्थशास्त्राला तो सर्वात महत्त्वाचे मानतो. त्यापायी तो स्वतःला आणि निसर्गाधारित जीवन जगणाऱ्या निरपराध मानवांना आणि जीवसृष्टीला नष्ट करण्यास तयार झाला आहे.

Source: Google.com (Representative Image)

अर्थशास्त्राने पर्यावरणाला क्षुल्लक मानले आणि आर्थिक वाढीला डोक्यावर घेतले. आता भूतानसारखा निरपराध देशही फळे भोगत आहे. भूतानच्या हिमनद्या वेगाने आकसत आहेत. वितळणाऱ्या पाण्याची प्रचंड तळी बनली आहेत व ती पूर आणत आहेत. तरी तेथील तज्ञही ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुर्घटना होत आहेत हे सांगत असतानाच पायाभूत संरचनेची आणि अर्थव्यवस्थेची यामुळे हानी होते असे म्हणत आहेत व या आकलनात काही चूक होत आहे, असे मानत नाहीत. औद्योगिक युगाने खरोखर आपल्याला निसर्गाविरूध्द म्हणजे आपल्याच अस्तित्वाविरूध्द उभे केले आहे. सन १९९४ मधे पुरामुळे मोठे नुकसान होऊनही तो देश जलविद्युत प्रकल्पांचा नाद सोडत नाही. दुर्घटनेचा इशारा देणारी यंत्रणा बसवणे हा उपाय समजला जातो. पूरावर लक्ष ठेवण्यासाठी माणसे नेमली जातात.

सन १९९४ मध्ये अमेरिकेत मिसिसिपी नदीला ऐतिहासिक महापूर आला. त्यात शेकडो लहानमोठी शहरे आणि धरणे उध्वस्त झाली. नंतर जाहीर झाले की हा तापमानवाढीचा परिणाम होता. पण ही दुर्घटना जगात व भारतात जनतेला समजली नाही. त्याऐवजी मायकेल जॅक्सनच्या नाचगाण्यात जगाला गुंगवले गेले. हे प्रसारमाध्यमांतर्फे केले जाते. याचा परिणाम, मुंबईच्या महापूरानंतर दि. २७ ऑगस्ट २००५ रोजी चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे मिसिसिपी नदीच्या खाजणात भराव घालून वसलेले न्यू ऑर्लिन्स शहर भयंकर स्वरूपात बुडाले. संरक्षणाच्या नावाने बांधलेली व अभेद्य समजली जाणारी काँक्रीटची भिंत कोसळली आणि शहर महिनाभर समुद्राचा भाग बनले. मोठी प्राणहानी व वित्तहानी झाली. शहर उध्वस्त झाले. आपल्या देशात टाईम्स ऑफ इंडियासह जवळपास सर्व वृत्तपत्रे व टीव्ही चॅनल सन १९९० पासून तापमानवाढ व हवामान बदलाचे सत्य लपवत आली. त्यामुळे मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन फक्त तीन - चार दशकात पूर्ण होणार असूनही देश विकासाच्या नशेत ठेवला आहे.

Source: Google.com (Representative Image)

शेजारी भारत देशाला भूतान वीज निर्यात करतो. जलविद्युत प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज हा भूतानच्या महसूलाचा, आर्थिक उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. हा स्त्रोत तो गमावू इच्छित नाही. उन्हाळ्यांबरोबरच हिवाळा व पावसाळाही अधिकाधिक उष्ण होत आहे. नियमित हिमवर्षाव कमी होत आहे. तापमानवाढीमुळे लवकरच नद्या सुकतील. मग आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद होईल. इथे मेख आहे. वीजच या अनर्थाला मोठे कारण आहे. जगातील ४३% कार्बन उत्सर्जन कोळसा जाळून वीज करताना होत आहे. जलविद्युत प्रकल्प देखील जंगल बुडवतात आणि धरणांच्या खालील बाजूला नद्या सुकवुन हरितद्रव्याचा नाश करतात आणि कशाही पध्दतीने वीज तयार केली तरी निर्मितीत आणि वापरात अंतिमतः कार्बन उत्सर्जन, डोंगर व जंगलाचा, हरितद्रव्याचा नाश होतोच.

आर्थिक उत्पन्न व वाढ ही संकल्पना मानवजातीला नष्ट करत आहे. उत्पन्न कशासाठी? तर कृत्रिम जीवनशैलीसाठी. जीवनासाठी नाही. आर्थिक उत्पन्न घटेल याची सर्वांना काळजी. पण आर्थिक उत्पन्नाशी, महसूलाशी जे जे जोडले आहे त्यामुळेच तर ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. आर्थिक उत्पन्न थांबवले नाही तर ग्लोबल वॉर्मिंग कसे थांबेल? भूतानसारख्या देशालाही आर्थिक उत्पन्न हवे आहे. त्यासाठी निसर्गाच्या विनामूल्य क्षमतेचा वापर करून निर्माण केलेली वीज विकायची आहे.

भारत, ६४% वीज कोळसा जाळून निर्माण करतो. त्यासाठी रोज १५ लाख टन कोळसा जाळला जातो व २२ लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. वीजनिर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर जलविद्युत आहे. ही एक ऊर्जाग्राही जीवनशैली आहे जी उच्चाटनाकडे नेत आहे. आता वीज, वाहन, सीमेंट, व इतर वस्तू जिथे वापरल्या जातात त्या वापरण्यावर विचार हवा. त्यासाठी सरकारांनी 'पर्यावरण आणिबाणी' जाहीर करण्याची मागणी करण्याची गरज नाही. तशी ती केली म्हणून इंग्लंड व स्कॉटलंड देशांनी, लंडन आणि मँचेस्टर शहरांनी कार्बन उत्सर्जन शून्य केले का?

Source: Google.com (Representative Image)

ही समस्या वाफेचे इंजिन या स्वयंचलित यंत्राच्या शोधापासुन सुरू झाली. पुढे अर्थव्यवस्थेसाठी, खाणकाम, रेल्वे, कापड गिरण्या, नंतर सिमेंट, वीज, मोटार, विमान करता करता हजारो प्रकारच्या करोडो यंत्र व वस्तुंचे रोज उत्पादन होत गेले. यातील काहीही मानवी अस्तित्वासाठी आवश्यक नव्हते. उलट तो अस्तित्व संपवण्याचा प्रवास होता.

चालू दशकात सरकार, कॉर्पोरेटस एवढेच नाही तर औद्योगिकरण विसर्जित होणार आहे. या संकल्पनांच्या पलिकडे जाऊन एक सजीव म्हणून हवा, पाणी व अन्न या मुलभूत गरजांवर थांबण्यासाठी प्रत्येकाने कृती केली. जी करण्यापासुन कुणी अडवलेले नाही, तर वाचण्याची शक्यता तयार होईल. लॉकडाऊनमधे याचे प्रात्यक्षिक झाले आहे.

सरकारला दोष देऊ नये आणि सरकारकडून अपेक्षा आणि विनंत्याही करू नये. आपली मुले आपण जन्माला घालतो. सरकार नाही. शंभर वर्षांपूर्वी देशाने त्याग केला तेव्हा हे सरकार आले. आज त्या त्यागाचा विस्तार होण्याची गरज आहे आणि याला त्याग तरी कसं म्हणायचं? जर या भौतिक वस्तुंच्या सापळ्यातून आपण सुटलो नाही, तर जीवन सोडावे लागेल. मग ज्या कृतिमुळे जीवन रक्षण होईल त्याला त्याग कसे म्हणायचे? जे अनैसर्गिक व विकृत आहे, त्याला आपण कवटाळून बसलो आहोत आणि प्रकृतीला दूर लोटत आहोत. मानवजात ऊर्जावेडातुन बाहेर पडली तरच वाचणार आहे. ज्यात मानवनिर्मित ऊर्जांची गरज नाही, पृथ्वीचे लचके तोडले जात नाहीत आणि हरितद्रव्याचा नाश होत नाही अशी जीवनपद्धती सर्वांनी स्वीकारली तरच मानवजात वाचेल. अर्थात जर उद्योगपूर्व ऊर्जाविरहित शाश्वत जीवनाकडे वळलो तर हे शक्य आहे.

हे निर्वेर कार्य आहे. पृथ्वीने अपेक्षा न केलेल्या आणि तिच्या विरोधात जाणाऱ्या आपल्या मनाच्या इच्छांशी लढायचे आहे. हे शाश्वत जीवन टिकवणारे भारतीय तत्त्वज्ञान व अध्यात्म आहे. विज्ञान तोच मार्ग सांगत आहे. तो योग आहे.

चळवळीतर्फे लवकरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऊर्जाविरहित शाश्वत जीवन शिबिरे घेतली जाणार आहेत. यात पृथ्वीवर निर्माण झालेल्या आणिबाणीची माहिती दिली जाईल आणि नैसर्गिक शेती, चरखा - हातमाग आणि माती- बांबूची घरे बांधण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. संपर्क करावा. मानवजात वाचवण्याच्या प्रयत्नात सामील व्हावे.

- अॅड. गिरीश राऊत

निमंत्रक

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

दू. ९८६९ ०२३ १२७

Tags:    

Similar News