अवकाळी पावसाने द्राक्ष,डाळींब,कांदा पिकांचे नुकसान
शेती आणि शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबायला तयार नाही. धोरण आणि बाजार भावानी शेतकरी नाडला असताना आता अवकाळी पावसाने झोडपल्याने सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.. प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने जिल्ह्यातील द्राक्ष,डाळींब,कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.यामुळे द्राक्ष,डाळींब उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील द्राक्ष ,डाळींब बागांचे नुकसान झाले आहे.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात द्राक्ष बागांची शेती केली जात असून तेथील बागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याचे शेतकरी समाधान घायाळ यांनी सांगितले.जिल्ह्यात अवकाळी पाऊस सर्वच तालुक्यात पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी शासन,प्रशासनाकडे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पंढरपूर, करमाळा, माळशिरस, माढा या तालुक्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मागील चार दिवसांपासून हजेरी लावल्याने पंढरपूर, करमाळा, माळशिरस, माढा या भागातील द्राक्ष बागांवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.त्यामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अवकाळी पाऊस द्राक्ष बागांसाठी नुकसानकारक असून त्यामुळे द्राक्षांवर भुरी,दावण्या या रोगांचा प्राधुर्भाव वाढत चालला आहे.त्यामुळे यावर्षी द्राक्षेचे उत्पादन वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतुन व्यक्त केली जात आहे.अवकाळी पावसामुळे फ्लोरा अवस्थेतील फळ गळून पडले आहे.यामुळे तयार झालेल्या द्राक्ष घडांचे नुकसान झाले आहे.
कांदा,डाळींब,केळी उत्पादक शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले
जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या कांदा पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे.या अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या शेतात साठल्याने कांदा पीक नसून जाण्याची भीती शेतकऱ्यांतुन व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांनी गेली चार महिने कांदा पिकासाठी घेतलेली मेहनत वाया जाणार आहे.कांद्याला सोलापूर मधील मार्केटमध्ये कवडीलमोल किंमत येत आहे.कांद्याच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी फवारणी,नांगरणी, खुरपणी,काढणी यासाठी केलेला खर्च कांदा विक्रीतून मिळेना गेला आहे.मार्केटला कांदा नेहण्यासाठी वापरलेल्या वाहनाचे भाडे शेतकऱ्यांना खिशातून द्यावे लागत आहे.त्यात अवकाळी पाऊस कांदा पिकाचे नुकसान करू लागल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.अवकाळी पावसाने डाळींब उत्पादक शेतकरी ही धास्तावले आहेत.अवकाळी पावसामुळे डाळींबाचे फ्लोरा गळून पडू लागले आहेत.डाळींब बागेत पाणी साचले असल्याने फवारणीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बागेमध्ये घेऊन जाता येत नाही.चिखलामुळे बाग पंपाने फवारने शक्य नाही.त्यामुळे डाळींबाचे उत्पादन वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.या अवकाळी पावसाचा परिणाम केळी या पिकांवर सुद्धा झाला असून केळी मार्केट मध्ये कमी दराने विकली जात आहे.अवकाळी पाऊस जिल्ह्यात थैमान घालत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता व्यक केली जात आहे.
अवकाळी पावसाने ऊस तोडणी खोळंबली
अवकाळी पावसाने ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असल्याने ऊस तोडणीवर त्याचा परिणाम झाला आहे.शेतात बैलगाडी,ट्रॅक्टर जात नाहीत.त्यामुळे कमी प्रमाणात ऊस वाहतूक होत आहे.या अवकाळी पावसाने ऊसतोड मुजुरांची ही दाणादाण उडवली आहे.त्यांच्या झोपड्यात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे.ऊसतोड मजूर निवार्यासाठी इतर ठिकाणाचा शोध घेत आहेत.तर काही ऊसतोड कामगारांनी आहे,तेथेच राहणे पसंद केले आहे.झोपडीत आलेले पाणी त्यांनी भांड्यांचा सहाय्याने बाहेर काढून टाकले आहे.ऊसतोड मजुरांवर या अवकाळी पाऊसाची अवकृपा झाली आहे.त्यामुळे ऊसतोड मजूर चिंतेत आहे.तर जिल्ह्यातील नदी,नाले,तळी, यांना अवकाळी पावसामुळे पाणी वाढू लागले आहे.
उत्पादन कमी आणि खर्च जास्त
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी समाधान घायाळ यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,आमच्या गावामध्ये द्राक्षांचे छाटणी करून सध्या फ्लोरा व फळ धारनेच्या स्थितीत असणारे 30 ते 40 प्लॉट होते.अवकाळी पावसामुळे त्या बागा 100 टक्के पूर्णपणे संपल्या आहेत,असे वाटते.बागा पूर्णपणे गळी आणि कुज मध्ये गेल्या आहेत.आता येथून पुढच्या छाटण्या होत्या.त्या बागा साधारण वीस, पंचवीस त्या तीस दिवसाच्या होत्या.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर दावण्या आणि करप्या रोगांचा प्राधुर्भाव झाला आहे.द्राक्ष बागांवर महागडी औषधे आणून फवारली जात आहेत.अवकाळी पावसामुळे त्याचा रिझल्ट मिळेना गेला आहे.पावसामुळे द्राक्षांचा गळ आणि कूसमध्ये जवळ-जवळ 20 टक्के भाग गेला आहे.कासेगाव परिसरातील 70 ते 80 टक्के द्राक्षांच्या बागा दावण्या व करप्या या रोगांमुळे गेल्या आहेत. या बागांची पावसामुळे होणारी दैनिय अवस्था आम्हाला पाहवत नाही.त्यामुळे कोणी कोणतेही फवारणीचे औषध सांगितले.तर तेही आणून द्राक्ष बागांवर फवारतो.त्याचा रिझल्ट ही या वातावरणामुळे मिळेना गेला आहे. औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.त्यामुळे उत्पादन कमी आणि बागांवर खर्च जास्त होत आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा वाया जाण्याची भीती
द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधान घायाळ यांनी बोलताना सांगितले की,शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.मागील दोन वर्षे कोरोनामुळे द्राक्षांचा हंगाम वाया गेला आहे.द्राक्षांचा हंगाम मार्च ते जून महिन्यात असतो.परंतु मार्च ते जून लॉकडाऊन पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षांचा हंगाम वाया जात आहे.त्यामुळे द्राक्ष बागांचा गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला काही फायदा झाला नाही.आमचा द्राक्ष बागांवर झालेला खर्च सुद्धा निघाला नाही.यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष बागांचे जवळ-जवळ 100 टक्के नुकसान झाले आहे.आधीच कोरोनाने दोन वर्षे द्राक्षांचा हंगाम वाया गेला आहे.आता अवकाळी पावसाने जात आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी.
द्राक्ष उत्पादनातून एकरी 1 लाख रुपये वर्षाकाठी मिळतात
द्राक्ष बागांना दोन छाटण्याचा खर्च मिळून कमीत-कमी एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो.नुसत्या फवारणी आणि मजुरांचा हा खर्च आहे.द्राक्ष बागांचे वर्षाला कमीत-कमी 3 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले जाते.यातून 2 लाख रुपये बागेला खर्च होतात.तर 1 लाख रुपये नफा मिळतो.गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आलो आहोत. बागांच्या देखभालीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. एवढा खर्च करूनही अवकाळी पाऊसमुळे द्राक्ष येईल का नाही याची शास्वती नाही.त्यामुळे बँकांचे कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न उभा राहिला आहे.