दोन तरुणींची यशोगाथा,आधुनिक पद्धतीने घेतले 5 टन कलिंगडाचे उत्पादन
शेतकरी महिलांच्या यशोगाथा आपण पाहत असतो किंवा वाचत असतो. पण रायगड जिल्ह्यातील सुधागडमध्ये कृषी अभ्यासक्रम शिकणाऱ्या दोन तरुणींनी शेतीमध्ये अनोखा प्रयोग करत आदर्श घडवला आहे. पाहा धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट....
रायगड : जीवनात मोठं ध्येय बाळगून त्याला कृती व परिश्रमाची जोड दिली तर कोणतीही गोष्ट कठीण नसते, हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यासारख्या दुर्गम व आदिवासी बहुल भागातील दोन तरुणींनी दाखवून दिले आहे. सुधागडमधील या दोन तरुणींची यशोगाथा तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी प्रेरक ठरु शकते आहे. पायरीची वाडी गावाजवळील स्वतःच्या शेतात या दोघींनी आधुनिक पद्धतीने कलिंगड लागवड करत 5 टन उत्पादन घेतले आहे.
कृषी अभ्यासक्रम शिकत असतांनाच या दोन तरुणींनी या वर्षी एप्रिलमध्ये भर उन्हाळ्यात कलिंगड लागवड केली. तब्बल 4 ते 5 टन कलिंगड पीक घेतलेले आहे. पालीतील ऐश्वर्या सचिन जवके आणि साक्षी पवार या दोन तरुणींनी मोठ्या परिश्रमाने भर लॉकडाऊन काळात कलिंगडाचे पीक घेण्याचा संकल्प केला. माळरान भागात असलेल्या आपल्या शेतीत पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ऐश्वर्या जवके बीएससी ऍग्रीकल्चर तर साक्षी पवार बीएससी हॉर्टीकल्चरचे शिक्षण घेत आहे. कलिंगड लागवडीचा सिजन नाही, वेळ निघून गेली होती, त्यात कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आहे, बापाचे पैसे वाया घालवाल असे टोमणे त्यांना काहींनी मारले.
पण या टीकेमुळे दोघींनी कृषी आपले पाऊल मागे घेतले नाही. त्यांनी जमीन कसण्यास सुरुवात केली, आधुनिक पद्धतीने रोप लागवड केली आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून दाखवलं आहे. मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, "कोरोना काळात युवा पिढी बेरोजगारीच्या विळख्यात सापडली, अशा परिस्थितीत आम्ही शेती हा सर्वोत्तम पर्याय मानून शेती करण्याचे ठरवले. आम्ही शेती करताना प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आम्ही मल्चिंग पेपरच्या सहाय्याने शेती केली आहे. आम्ही शेतात ड्रीपर लावलेले आहेत. त्यामुळे पाणी कुठेही वाया जात नाही. प्रत्येक रोपाला समान पाणी मिळते. लॉकडाऊनमुळे शेती लागवडीला उशीर झाला. आम्ही मार्चमध्ये प्लान्टेशन करून सिलिंगला सुरवात केली. तर पिचवर एप्रिल महिन्यात रोपं लावली. अवकाळी पाऊस व वादळाने देखील धडक दिली, मात्र आम्ही डगमगलो नाही. सतत पिकांची निगा राखल्याने शेती बहरली. चांगले उत्पादन देखील मिळाले. चार ते पाच टन कलिंगडाचे उत्पादन आम्ही घेतले आहे."
यापुढे शेतात मशरूम, हळद आणि इतर फळभाज्या घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगिततले. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात साधारण 2200 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भातशेती केली जाते. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भातशेतीवर भर देतात. मात्र विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळी फळं, भाजी पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून इतर पिकांची देखील लागवड करण्यावर भर दिला पाहिजे. जिल्ह्यात इतर भाज्या व पीक लागवड कमी क्षेत्रात केली जाते.
जिल्ह्याती तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी वणवण न भटकता शेती क्षेत्राकडे वळून वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करावे, त्यामुळे विविध पिकांचे भरघोस उत्पादन घेऊन सधन होता येईल, असे ऐश्वर्याने सांगितले. साक्षी पवारने मॅक्स महाराष्ट्शी बोलताना सांगितले की, "कलिंगड लागवडीचा हंगाम संपल्यानंतर आम्ही कलिंगडाची शेती करण्यासाठी पाऊल टाकले. लोकांनी हंगाम संपला, पावसाळ्यात कलिंगडाचे पीक कसे येईल, मेहनत व पैसे वाया जातील अस अनेकांनी म्हणत अनेकांनी आममचा उत्साह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही जिद्दीने कलिंगडाची आधुनिक शेती करण्याचे निश्चित केले व त्यादृष्टीने आम्ही पावले टाकली. आम्ही नामदेव उमाजी बियाणे वापरून 1000 सिलिंग द्वारे लागवड केली. मोठ्या कष्टाने आमचा मळा बहरला, मोठे उत्पन्न निघाले. यापुढे आम्ही याच शेतीत वेगवेगळे पीक घेण्याच्या दृष्टीने प्रयोग करणार आहोत. असे साक्षीने सांगितले.