Max Investigation : बारावी नापास तरुणाने शेतकऱ्यांना असा लावला ५०० कोटींचा चुना

Update: 2021-11-20 10:00 GMT

मराठवाड्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि max maharashtra च्या पाठपुराव्यामुळे समोर आलेला 'तीस-तीस' घोटाळा सद्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. 1 हजारपेक्षा अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि 500 कोटींपेक्षा अधिकची रक्कम घेऊन या योजनेचा मास्टरमाइंड संतोष उर्फ सचिन राठोड सद्या फरार आहे. तर औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भविष्यात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र सुरवातीला हा 'तीस-तीस' घोटाळा नेमका आहे तरी काय हे समजून घेऊ यात....

'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील रह्वासी संतोष राठोड नावाच्या तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे डीएमआयसीचे सर्वाधिक पैसे आलेल्या बिडकीन आणि परिसरातील गावांना यराठोड याने केंद्रबिंदू बनवलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या राठोडने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं.

पुढे काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय प्रकल्प असलेल्या भागातील शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला मिळाला होता. दरम्यान राठोड नावाच्या व्यक्तीने या शेतकऱ्यांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे जमा करायला सुरुवात केली. ज्यात शेतकऱ्यांप्रमाणे शासकीय अधिकारी, राजकीय नेते यांनी सुद्धा कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र गेल्या वर्षभरापासून व्याज सोडा मोबदला सुद्धा गुंतवणूकदार यांना परत मिळाला नाही.

आणि गुन्हा दाखल झाला...

आठ महिन्यापासून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहे. तर पोलिसात तक्रार केल्यास पैसे बुडून जातील या भीतीने कुणीच तक्रार करण्यास समोर येत नव्हते. मात्र तारीख वर तारीख देणाऱ्या राठोड विरोधात जांभळी येथील महिला शेतकरी ज्योती ढोबळे यांनी हिम्मत करत बिडकीन पोलिसात तक्रार केली आणि राठोड विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. राठोड याच्या विरोधात फसवणूक आणि एएमपीआयडी प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असून आरोपी राठोड विरोधात लुक ऑऊट नोटीस जारी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

असा आला 'तीस-तीस' घोटाळा समोर...

तीस-तीस घोटाळ्याची सुरवात २०१६ पासून झाली. मात्र २०१८ नंतर याचा व्याप वाढत गेला आणि २०२१ मध्ये या घोटाळ्याची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. त्यामुळे या प्रकरणाची max maharashtra चे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता, ही योजना अधिकृत नसून लोकांची मोठी फसवणूक होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे तीस-तीस योजनेची सर्वात आधी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी max maharashtra ने पहिल्यांदा बातमी करून या सर्व प्रकरण बाहेर आणले. त्यांनतर गेली दहा महिने या योजनेतील घोटाळ्याचा सतत पाठपुरावा केला आणि अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक माध्यमांनी याची दखल घेतली.

मास्टरमाइंड संतोष राठोडचं राष्ट्रवादी-शिवसेना कनेक्शन?

मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या या 'तीस-तीस' घोटाळ्यात मुख्य सूत्रधार संतोष राठोडवर गुन्हा दाखल झाला असून, सद्या तो फरार आहे. मात्र संतोष राठोडला वाचवण्यासाठी आता राजकीय नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचं बोलले जात असून, हे राजकीय नेते कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर येतो त्या-त्या वेळी अशा घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप नेहमीच पाहायला मिळतो. असंच काही आता 'तीस-तीस' घोटाळ्यात पाहायला मिळत आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेतेमंडळी मध्यस्थी असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला असून, त्यांच्या या आरोपाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गुंतवणूकीवर भरघोस व्याजाचे आमिष दाखवून संतोष राठोडने 30-30 योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितलं. सुरुवातीला बँकांकडून मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक नफा देऊन संतोष राठोडनं स्वतःची ओळख निर्माण केली.

घोटाळ्यात सापडलेली 'डायरी' राजकीय भूकंप आणणार

गेली दहा महिने सतत पाठपुरावाकरून Max Maharashtra ने उघड केलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात नवनवीन माहिती समोर येत आहे. तर यासर्व घोटाळ्याच्या मास्टर माईंड संतोष उर्फ सचिन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले असून ज्यात आमदार,खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

राठोड याचाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कन्नड आणि औरंगाबाद शहरातील घराची झाडाझडती घेतली. ज्यात पोलीसांना अनेक नेते, अधिकारी यांच्या नावाच्या चिठ्या असलेली डायरी सापडली आहे. विशेष म्हणजे यात असलेल्या नेत्यांची नावं समोर आल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासदार आणि आमदारसह एका माजी मंत्र्यांचं सुद्धा यात नाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस तपासात आणखी काय-काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बारावी नापास तरुणांने लावला चुना....

तीस-तीस घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष उर्फ सचिन राठोड याचं शिक्षण १२ पर्यंत झाले असून, त्यात ही ती बारावी नापास असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील शासकीय नौकरीत असतांना हि संतोषला शिक्षणात रस नव्हता. मात्र शिक्षण नसतानाही बारावी नापास तरुणाने तब्बल ५०० कोटींचा घोटाळा करत लोकांना सहजपणे गंडा घातला. विशेष म्हणजे या बारावी नापास तरुणाच्या गळाला उच्चशिक्षित लोकं आणि उच्चपदावर असलेले अधिकारी सुद्धा लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गुंतवणूकदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आता अनेक गुंतवणूकदार पोलिसात जाऊन तक्रार देत असल्याचे समोर आले आहे. तर याच तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक करणाऱ्या नितीन चव्हाण नावाच्या व्यक्तीने मंगळवारी ( ता. १६ ) रोजी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिडकीन पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

शेतकरी मोठ्याप्रमाणावर अडकले

तीस-तीस घोटाळा अंदाजे ५०० कोटींपेक्षा अधिकचा असून, यात हजारो लोकं अडकली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक शेतकरी अडकले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान ५०० पेक्षा अधिक शेतकरी या घोटाळ्यात अडकले असून, आज त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

बंजारा समजातील सर्वाधिक गुंतवणूकदार

तीस-तीसचा मोहरक्या संतोष राठोड हा बंजारा समाजाचा असल्याने त्याने सर्वात आधी आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या जाळ्यात ओढले. पुढे त्याने आपली मार्केटिंग करत जिल्ह्यातील सर्वच तांडे आणि बंजारा समाजातील नागरिक राहत असलेल्या वस्तीवरील लोकांचा विश्वास जिंकत त्यांना गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. सुरवातीचे दोन-तीन वर्षे फक्त बंजारा समाजातील लोकांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर संतोष याने इतर गावांना आपलं केंद्रबिंदू बनवले आणि कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा करून आता समोर येत नाही.

स्थानिक राजकीय नेते मध्यस्थी

या सर्व घोटाळ्यात सर्वाधिक लोकांची गुंतवणूक करण्यासाठी स्थानिक नेत्यांची मध्यस्थी आहे. विशेष म्हणजे आपल्या भागातील आणि रोजच्या संपर्कात असलेले राजकीय नेते मध्यस्थी असल्याने लोकांनी लगेच विश्वास ठेवला. तसेच कोणतेही कागदपत्री नोंद न करता किंवा लेखी न करता विश्वासावर नागरिकांनी थेट पैसे गुंतवणूक केले. त्यामुळे आता या राजकीय नेत्यांचे करीयर सुद्धा धोक्यात आले आहे.

प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

तीस-तीस घोटाळ्याची व्याप्ती पाहता या प्रकरणाचा तपास आता औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शिलवंत नांदेडकर यांच्याकडे देण्यात आले असून त्यांची टीम या गुन्ह्यात काम करणार आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया...

या सर्व प्रकरणावर बोलतांना औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमत गोयल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तीस-तीस नावाची फसवी योजना सुरु असल्याचे वाचनात आले होते. मात्र थेट तक्रार करण्यासाठी आतापर्यंत कुणीच समोर आले नव्हते. मात्र याबाबत आता तक्रार आलीअसून याप्रकरणी विवध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात दोन आरोपींचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे आता आम्ही सुद्धा लोकांना आवाहन करतोय की, ज्यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे, त्यांनी समोर यावे आणि आपली तक्रार दाखल करावी, असं पोलीस अधीक्षक गोयल Max Maharashtra शी बोलतांना म्हणाले.

तीस-तीस स्कॅममध्ये पोलिसांकडून फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र पोलिसात तक्रार केल्यास पैसे बुडातील अशी धमकी मध्यस्थी आणि राठोडच्या जवळ्याच्या लोकांकडून दिली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले आहेत.

पोलीस कॅम्प लावणार..

तीस-तीस घोटाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक लोकांची फसवणूक झाली असल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांच्या तक्रारी घेण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून वेगवेगळ्या तीन ठिकाणी कॅम्प लावण्यात येणार आहे. ज्यात दिनांक २२/११/२०२१ रोजी चिकलठाणा पोलीस ठाणे, दिनांक २३/११/२०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि दिनांक २४/११/२०२१ रोजी पोलीस ठाणे बिडकीन येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता...

तीस-तीस घोटाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांपैकी अनेकांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी या योजनेत गुंतवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर अनके जन मध्यस्थीच्या घरी चकरा मारत आहे. तसेच काही ठिकाणी छोटे-मोठे वाद सुद्धा होतायत. पण प्रकरण पोलिसात गेल्यास आणखी अडचणी वाढतील म्हणून मध्यस्थी आपल्या पातळीवर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता लोकांचा संयम संपत चालला असल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.

मास्टरमाइंड जामीन पण...

तीस-तीस घोटाळ्यातील मास्टरमाइंड संतोष राठोडवर गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र पोलीस आपल्याला कधीही अटक करू शकतात म्हणून अटक पूर्व जामीनसाठी त्याने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला पुढच्या तारखेला न्यायालयात हजर राहण्याची अट आणि 15 हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर केली होती. मात्र 23 तारखेला संतोष राठोड तारीख असतांनाही न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे पोलीसांची बाजू जाणून घेतल्यानंतर राठोड याची जामीन कोर्टाकडून रद्द केली जाण्याची शक्यता आहे.


कोट्यवधी रुपये आले आता बाजाराला नाही पैसे

औरंगाबाद बिडकीन परिसरात डीएमआयसी प्रकल्प आला होता. ज्यात शेतकऱ्यांना 23 लाख प्रतिएकर असा मोबदला मिळाला. सुरवातीला बँकेत एफडी ठेवलेल्या शेतकऱ्यांनी पुढे चांगला व्याज मिळत असल्याने तीस-तीस मध्ये पैसे गुंतवणूक केले.तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये आलेल्या याच लोकांकडे आता आठवडी बाजार करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे चित्र आहे.

नातीगोतींमध्ये वादावादी...

तीस-तीसमध्ये थेट 20 ते 25 टक्के मासिक परतावा मिळत असल्याने लोकांना लॉटरी लागल्या सारखं वाटत होते. त्यामुळे अनेकांनी स्वतः तर पैसे गुंतवलेच पण अनेक नात्यातील लोकांना सुद्धा पैसे गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. त्यामुळे अनेकांच्या बोलण्यावरून नात्यातील लोकांनी पैसे गुंतवणूक केले. मात्र आता माध्यमांमध्ये घोटाळ्याच्या बातम्या आल्यानंतर आपल्या पैशांसाठी नातेवाईक तगादा लावत आहे. त्यामुळे नातीगोतींमध्ये वादावादी सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

तरूणांनी धरला कंपनीचा रस्ता

शेतीचे आलेले आणि जवळ असलेले सर्व पैसे तीस-तीसमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अनेक जणांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. त्यात तीस-तीसचे पैसे येण्याची अपेक्षा सुद्धा कमी असल्याने कुणी उधार सुद्धा देत नाही. त्यामुळे घर चालवण्यासाठी अनेक तरुण मुलं आता कंपनीत कामाला जात आहे. तर अनेक जण मोलमजुरी करून घर चालवत आहे.

चारचाकी गाड्या जागेवरच उभ्या...

तीस-तीसमध्ये सुरवातीला चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जणांनी महागड्या चारचाकी गाड्या आणल्या होत्या.अनेकांनी 3030 तर काहींनी व्हीआयपी नंबर घेण्यासाठी हजारो रुपये मोजले. पण आता अनेकांना गाड्यात पेट्रोल-डिझेल टाकण्यासाठी पैसे नसल्याने गाड्या जागेवरच उभ्या आहेत. तर काहींनी विक्रीसाठी काढल्या आहेत.

अभ्यासक काय म्हणतात...

या सर्व घोटाळ्यावर बोलतांना अर्थव्यवस्थेचे अभ्यासक देवीदास तुळजापूरकर म्हणतात की, सद्या बाजारात अनेक बिगर बँकिंग संस्था आणि चीटफंड लोकांना गंडावत आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक ग्रामीण भागातील लोकांना टार्गेट केलं जात आहे. कारण ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेचा अभाव असून, पैसा येतो कसा पैसा जातो कसा आणि आलेला पैसा कुठे गुंतवणूक करायला पाहिजे याबाबतीत ग्रामीण भागात अजूनही हवी तशी जनजागृती झालेली नसल्याचं, तुळजापूरकर म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News