पंढरीतील तुळशीच्या माळांवर चायनीज आक्रमण
तुळशीच्या माळा पंढरपुरातील अनिल नगरमधे बनवल्या जात असून वारीच्या काळात या माळांची खरेदी-विक्रीची उलाढाल एक कोटीच्या आसपास होते. अलीकडच्या काळात चायनिज माळाच्या विक्रीमुळे स्थानिक तुळशीच्या माळींच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;
पंढरपूर महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी समजली जाते. या राजधानीत बारा महिने विठ्ठल भक्तांची रीघ लागलेली असते. पंढरपुरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या दर्शनाला लोक येत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरूनही भाविक भक्त पंढरपुरात येतात. हे भाविक भक्त घराकडे परत जात असताना विठ्ठलाची आणि पंढरपूरची आठवण म्हणून काहीतरी वस्तू खरेदी करून घेवून जातात. पंढरपुरात भाविक भक्त कुटुंबासह येत असल्याने अध्यात्मिक साहित्य आणि इतर साहित्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. राज्याच्या बाहेरून आलेले भाविक भक्त पंढरपुरात मुक्कामी असतात. त्यामुळेच येथे हॉटेल व्यवसाय तेजीत चालतो. त्याचबरोबर शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतात. या उद्योग व्यवसायाची उलाढाल कोट्यावधी रुपयांत असते. पंढरपुरात भाविक भक्त येवून त्याने तुळशीची माळ खरेदी केली नाही. असा एकही भाविक भक्त किंवा वारकरी दिसणार नाही. प्रत्येक वारकरी तुळशीची माळ खरेदी करतोच. या तुळशीच्या माळा पंढरपुरातील अनिल नगर येथे बनवल्या जात असून मोठ्या वारीच्या काळात या माळांची खरेदी-विक्रीची उलाढाल एक कोटीच्या आसपास होते. अशी माहिती तुळशीच्या माळा बनवून विक्री करणारे शिवचरण टमटम यांनी दिली.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ
पंढपूरला भाविक भक्त बारा महिने येत असतात. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील मंदिरासह देशभरातील मंदिरे दोन वर्षे बंद होती. त्यामुळे मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊन उठल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. परंतु राज्यातील मंदिरे म्हणाव्या तेवढ्या प्रमाणत खुली झाली नव्हती. मंदिरांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये व पुन्हा कोरोनाचा उद्रेक होवू नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मंदिरांवर निर्बंध लादले होते. कोरोनाच्या काळात मंदिर परिसरात असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना लॉक डाऊनचा मोठा फटाका बसला. राज्यातील,पंढरपूर,तुळजापूर,शिर्डी या ठिकाणच्या व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला. गेल्या वर्षभरापासून परिस्थिती पूर्वपदावर येत असून सर्व बाजारपेठा,शाळा,कॉलेज,महाविद्यालय, एसटी वाहतूक,खासगी वाहतूक,सिनेमा थिएटर खुली झाली आहेत. सर्वसामान्य लोकांचे जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोनाच्या काळात अनेकांची कामे गेली होती. तेच लोक आता कामावर जावू लागले आहेत. कोरोनाच्या काळात राज्यातील मंदिरे बंद असल्याने पंढरपुरातील तुळशीच्या माळा बनवून विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला. याच काळात या व्यावसायिकांनी घरी बसून तुळशीच्या माळा बनवल्या. लॉकडाऊन उठल्यानंतर पंढरपुरात दोन वर्षानंतर माघी वारी भरली,या वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात तुळशीच्या माळा विकल्या गेल्या. त्यानंतर दररोज पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत जावू लागली त्याच काळात तुळशीच्या माळाचीं विक्री पण वाढली. अलीकडेच आषाढी वारी संपन्न झाली असून या वारीमध्ये पंढरपुरात जवळपास 10 लाख भाविकभक्त दाखल झाले होते. याच दरम्यान वारीच्या काळात तुळशीच्या माळाच्या विक्रीची उलाढाल जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास झाली होती. अशी माहिती माळा बनवून विक्री करणारे शिवचरण टमटम यांनी दिली.
चायनिज माळाच्या विक्रीमुळे तुळशीच्या माळावर परिणाम
पंढरपूरच्या मंदिर परिसरात चायनिज माळा विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने तुळशीच्या माळा बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर परिणाम झाला असल्याचे येथील तुळशी माळाचे विक्रेते सांगतात. चायनिज माळाच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला असून त्यामुळे तुळशीच्या माळा बनविणाऱ्या व्यवसायिकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. यावर शासन,प्रशासनाने उपाय योजना करावी,असे येथील व्यवसायिकांना वाटत आहे. या चायनिज माळावर बंदी घालण्याची मागणी तुळशीच्या माळा बनविणाऱ्या व्यवसायिकाकडून करण्यात येवू लागली आहे. यावर शासन,प्रशासन काय निर्णय घेतेय याकडे तुळशीच्या माळा बनविणाऱ्या व्यवसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तुळशीच्या माळाची पंढरपुरात बारा महिने होते विक्री
पंढपूरामध्ये वर्षातील बारा महिने विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात. त्यामुळे येथे तुळशीच्या माळांची विक्री मोठ्या प्रमाणात चालते. मंदिराच्या पुढे असणाऱ्या महाद्वार घाटावर तुळशीच्या माळा घेवून विक्रेते विकण्यासाठी बसतात. तसे पाहिले तर पंढरपूरच्या अनेक भागात या माळा विक्रीसाठी उपलब्ध असतात. भाविकांना तुळशीच्या वृदावनापासून बनवलेल्या तुळशीच्या माळा आवश्यक असतात. पूर्वीच्या काळापासून वारकरी संप्रदाय तुळशीच्या माळा गळ्यात घालत आहे. कपाळी केशरी गंध आणि गळ्यात तुळशीच्या माळा घातलेला व्यक्ती भेटल्यास हमखास समजायचे,की हा व्यक्ती विठ्ठलाचा भक्त आहे. पंढरपूरचे एसटी आगार नेहमीच वारकऱ्यांनी गजबजलेले असते. या परिसरासह पंढरपूरच्या विविध भागात तुळशीच्या माळा बनविणारे आणि विक्रेते करणारे लोक आढळतात.
वाढत्या महागाईमुळे तुळशीच्या माळाच्या किंमतीत वाढ
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना तुळशी माळ विक्रेते शिवचरण टमटम यांनी सांगितले,की पंढरपूरला येणारा जो वारकरी संप्रदाय आहे,तो मोठ्या आस्थेने तुळशीच्या माळा खरेदी करतो. या तुळशीच्या माळा तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या असतात. ही तुळशीची लाकडे मंदिर समितीच्या वतीने दिली जात असून या लाकडाना तुळशी वृदवन,असे म्हणतात. पांडुरंगाला तुळशी प्रिय असून ती तुळस पांडुरंगाला वापरली जाते. आम्ही अडीचशे लोक सध्या माळा बनवण्याचे काम करत आहोत. या तुळशीच्या माळेत 108 मणी असून या माळाची विक्री 10 रुपयांपासून सुरू होवून ती 100 रुपयांच्या आसपास थांबते. कोरोनाच्या काळात या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माघी वारीच्या काळात 25 ते 30 लाख रुपयांच्या आसपास उलाढाल होते तर आषाढी वारीच्या काळात एक कोटीच्या आसपास उलाढाल होते. कोरोनाच्या काळात आम्ही ज्या तुळशीच्या माळा बनवून ठेवल्या होत्या. त्या वारीच्या काळात विकल्या. वाढत्या महागाईचा या व्यवसायांवर परिणाम झाला असून तुळशी माळा खरेदी करणारा ग्राहक कमी झाला आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. त्याच बरोबर बाजारात चायनिज माळा विक्रीसाठी आल्याने त्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला आहे. वाढत्या महागामुळे तुळशीच्या माळाचे भाव वाढवावे लागले आहेत. तुळशीच्या माळेचे होल लहान असते तर चायनिज माळेचे होल मोठे असते. पण जुन्या पिढीतील वारकरी तुळशीच्या माळा खरेदी करण्याला पसंदी देतात. तुळशीच्या माळा धारण केल्यानंतर व्यक्ती मांसाहार आणि दारूचा त्याग करतो. तुळशीची माळ जो धारण करेल तो थोडक्यात संत आणि भाविक असतो.
https://www.maxmaharashtra.com/max-reports/tulasi-mala-sellers-in-pandharpur-facing-threat-of-chinese-mala-1162300?infinitescroll=1