गुलछडी फुलांच्या विक्रीतून शेतकरी महिन्याला कमातोय 40 हजार रुपये
कोरोना संकटानंतरही शेती प्रभावीत होती. जनजीवन सुरळीत झाल्यानंतर मंदीरं सुरु झाल्यानंतर डिमांड वाढली आहे, पंढरपुरातील शेतकरी अजीम शेख यांनी गुलछडी फुलाच्या लागवडीतून महीना चाळीस हजाराचे गणित बसवले आहे, फुलशेतीच्या या गुलछडी मॉडेलचा अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...
कोरोना महामारीच्या लॉकडाऊनचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असल्याचे दिसते. अचानक सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोकांची तारांबळ उडाली होती. सर्व प्रकारची वाहतूक बंद झाल्याने त्याचा शेती क्षेत्राला फटका बसला. कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच मार्केट बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून होता तर काही शेतकऱ्यांनी खरबूज,कलिंगडे कवडीमोल दराने गावोगाव फिरून विकली. या काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले होते. सलग लॉकडाऊन असल्याने शेतात पिके घेता येत नव्हती आणि कोरोनाच्या भीतीने कुठे फिरता ही येत नव्हते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. अचानक सर्व मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. लोकांची देणी कशी द्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. याच काळात राज्यातील सर्व मंदिरे बंद झाल्याने त्याचा परिणाम फुल शेतीवर झाला असल्याचे पहायला मिळाले. शेतातील फुले जागच्या जागी कोमेजून गेली. लॉकडाऊन उघडल्यानंतर राज्यातील मंदिरे खुली करण्यात बराच कालावधी गेला. त्याचबरोबर गावोगाव च्या यात्रा बंद असल्याने त्याचा परिणाम फुलशेतीवर झाला. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेती क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. शेतकरी शेतात विविध प्रकारच्या पिकांची उत्पादने घेताना दिसू लागले आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर दोन वर्षांनी मंदिरे चालू झाल्याने फुलांचा बाजार सध्या बहरला असून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे फुलांच्या शेतीकडे शेतकरी वळले आहेत. अशीच गुलछडी या फुल बागेची शेती पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील शेतकरी अजीम शेख यांनी फुलवली असून महिन्याला 40 हजार रुपये कमवत आहेत. त्यांच्या या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
बाजारात फुलांची वाढती मागणी
सध्या सर्व मार्केट व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे सर्वच बाजार तेजीत आहेत. लग्नसराई सुरू असून गावोगावच्या यात्रा देखील सुरू आहेत. सर्वच मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढली आहे. या फुलांना चांगला भाव मिळू लागला आहे. कोर्टी गाव पंढरपूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने शेतकरी अजीम शेख सकाळी लवकर उठून कुटुंबासह फुलांची तोडणी करतात. त्यांनतर गुलछडीची फुले मार्केटला विकण्यासाठी नेहली जातात. याठिकाणी ढिगावर फुले विकली जातात. फुलांचे मार्केट पंढरपूर येथे असून येथे पंढरपूर, सांगोला,मंगळवेढा, मोडनिंब येथून व्यापारी फुले खरेदीसाठी येतात. सण-उत्सव असल्यास फुलांचा भाव वाढतो. त्याची विक्री चढ्या दराने होते. त्यातून चांगले पैसे ही मिळतात. दररोजचा सर्व खर्च जाऊन शेतकरी अजीम शेख यांना रोज कमीत-कमी 4 ते 5 हजार रुपये मिळतात. या पैशातून दररोजचा खर्च भागत असल्याचे शेतकरी अजीम शेख यांनी सांगितले.
अवकाळी पावसाचा गुलछडीच्या फुल शेतीवर परिणाम होत नाही
जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पाऊसात द्राक्ष बागा,गहू,ज्वारी या पिकांचे नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले होते. पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. याच तालुक्यातील कासेगाव आणि खर्डी गावात काढणीला आलेल्या द्राक्ष बागा अवकाळी पावसामुळे जमिनीवर पडल्या होत्या. यामध्ये खर्डी गावातील शेतकऱ्याचे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तर कासेगाव येथील शेतकऱ्याचे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. पण या अवकाळी पावसाच्या दरम्यान गुलछडीच्या शेतीवर काहीच परिणाम झाला नाही. उलट अवकाळी पावसाचे वातावरणात दुप्पट फुले निघतात. असे शेतकरी अजीम शेख यांचे म्हणणे आहे.
गुलछडी च्या उत्पादनातून महिन्याला मिळतात 40 हजार रुपये
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी अजीम शेख यांनी सांगितले की,गुलछडी च्या शेतीतून रोजच्या रोज ताजा पैसा मिळतो. याच्या लागवडीसाठी खर्च कमी येतो. तसेच पाणी कमी लागते. गुलछडी ची लागण करत असताना एक एकर शेत तयार करून घेतले. सरी सोडत असताना 4 फुटावर सोडली. या सरींवर गुलछडीचे गड्डे लावले. जे कांद्यासारखे असतात. रोपे लावत असताना दोन्ही रोपांच्या मध्ये अर्ध्या फुटाचे अंतर ठेवण्यात आले. गुलछडी च्या वाढीसाठी 10:26,19:19 ही खते वापरण्यात आली तर ड्रीपद्वारे 12:61 खत देण्यात आले. या गुलछडी च्या बागेवर दोन ते तीन महिन्यांतून फवारण्या केल्या जातात. गुलछडी च्या बागेवर अवकाळी पावसाचा काहीही परिणाम होत नाही. उलट अवकाळी पावसाचे वातावरण असले की,जास्त फुले निघतात. बागेची लागवड करून तीन महिने झाल्यानंतर फुलाचे उत्पादन सुरू होते. ही निघणारी फुले पंढरपूर येथील मार्केट ला विकली जातात. तेथे सकाळी अकरा वाजता लिलाव सुरू होते. त्याठिकाणी ढिगावर फुले विकली जात असून साधरण एक ढीग दीड किलोचा असतो. एक ढीग 300 ते 350 रुपयाला विकला जातो. सर्व खर्च जाऊन महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये रहात असल्याचे शेतकरी अजीम शेख यांनी सांगितले.
पंढरपूर ला बाहेरच्या राज्यासह राज्यभरातून वारकरी दर्शनासाठी येतात. विठ्ठलाच्या मंदिराबरोबरच येथे कुंडलिक मंदिर व इतर मंदिरे आहेत. तसेच पंढरपूर ला व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दुकान उघडल्यानंतर देवाची पूजा करण्यासाठी फुलांची गरज भासते. ती गरज पंढरपूर च्या ग्रामीण भागातील शेतकरी पूर्ण करतात. तसेच पंढरपुरात भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दररोजच्या पूजेसाठी फुले लागतात. ती फुले पंढरपूरच्या आसपासच्या शेतीतीतून शेतकरी पुरवतात. या फुलांच्या शेतीवर या भागातील शेतकऱ्यांची उपजीविका चालत आहे. येणाऱ्या काळात पंढरपूर तालुक्यात फुलांची शेती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.