नवी मुंबईत १०० एकरावरील मानवनिर्मित जंगलासाठी आदिवासी बांधवांचा पुढाकार

Update: 2021-10-07 04:43 GMT

"हे जंगल वाढताना आणि नष्ट होताना बघितलेली एकमेव बाई मी असेन, माणसाचं आणि झाडाचं नातं तुटलं की झाड मरतं...शहरीकरणामुळे इमारती उभ्या राहिल्या...त्या उभ्या राहताना ज्यांनी हे जंगल जतन केलं, त्यांना हाकललं जातं. जंगल नष्ट करून सिमेंटचे जंगल उभे केले जाते..परंतु मी एकवेळ मातीत जाईन पण माझ्या परिसरातील हा आमचा हिरवा देव नष्ट होऊ देणार नाही".

'स्वतः मरेन पण या हिरव्या देवाला वाचवेन' हा निर्धार आहे रायगड जिल्ह्यातील धामोळे या गावातील शिमगी भवर या आदिवासी आजीचा... या आदिवासी आजींसह संपूर्ण धामोळे गावातील आदिवासी समुदायाने केलेला हा निर्धार म्हणजे केवळ घोषणा नाही. सुमारे १०० एकर परिसरात मानवनिर्मित जंगल उभे करण्याचा प्रयोग तीन वर्षापासून रायगड जिल्ह्यातील धामोळे या गावातील वनहक्क समिती, वातावरण फाउंडेशन आणि वनविभागाने केला आहे. 



 


धामोळे हे पाण्याचे दुर्भिक्ष असलेले गाव. लोकांच्या पिण्याच्या पाण्याची कमतरता असताना या गावातील लोकांनी तब्बल पंधरा हजारापेक्षा जास्त झाडे लावलेली आहेत. विशेष म्हणजे यातील नव्वद टक्के झाडे ही आज जिवंत आहेत. खैर, आवळा, चिंच, साग, पेरू, आंबा, सीताफळ आणि बांबू यासारखी झाडे लावून त्यांचे जतन केले आहे. पोटच्या मुलांप्रमाणे या गावातील आदिवासी समुदायाने ही झाडे जपली आहेत. या पांडवकडा धबधब्यापासून खाली आलेल्या नाल्यातून कॅन तसेच ड्रमाने पाणी आणत या झाडांना नियमित पाणी दिले जाते. त्यासाठी या गावात पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये दहा ते पंधरा लोकांचा चमू आहे.

धामोळे वनहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष बाळाराम पारधी सांगतात "आमचे आज्जा पंजे इथेच राहिले, इथेच मेले त्यांनी हे जंगल राखले. जंगल कधीही ओरबाडले नाही. जंगलाला देव मानून त्याची पूजा केली परंतु आज सगळीकडे हे जंगल नष्ट होत आहे. या काळात आम्ही नवी मुंबईतील सर्वात मोठे मानवनिर्मित जंगल उभे करणार आहोत. वातावरण फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जात आहे. वातावरण फाउंडेशन आणि वनविभागाच्या सहकार्याने या कामाची सुरवात आम्ही केली आहे.



 


२०१७ यावर्षी धामोळे या गावातील १०० हेक्टर क्षेत्राचा सामूहिक वनहक्क दावा मंजूर झाला. यातील सुमारे १०० एकर परिसरात मानवनिर्मित जंगल उभा करण्याचा निर्धार या गावातील आदिवासी समुदायाने केलेला आहे.

याबाबत वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट सांगतात " गेल्या २० वर्षात ३० टक्क्याहून अधिक जंगलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलांमध्ये सातत्याने लागणारे वणवे, त्यामुळे वन्यजीवांचा होणारा ऱ्हास, वाढते हवा प्रदूषण, वाढती दुष्काळजन्य परिस्थिती हे सर्व पर्यावरणीय बदलाचे परिणाम आहेत व आजच्या काळातील आपली पिढी ही पृथ्वी वाचवू शकणारी शेवटची पिढी असल्याने पृथ्वी वाचवण्याच्या ह्या लढाईत आपण व आपल्या सारख्या सर्व लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे."



 

नवी मुंबई ही हवाप्रदूषणाच्या संकटाला सामोरी जात आहे, असे असताना धामोळेकरांनी केलेला घनदाट जंगल उभारण्याचा निश्चय म्हणजे नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याच्या दिशेने टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. याचबरोबर जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय बदलासारख्या गंभीर समस्येचा निपटारा करण्यासाठी महत्वपूर्ण कृती आहे. तसेच सर्व नवी मुंबईकरांनी धामोळे गावातील आदिवासी समुदायाच्या जंगल उभारणीच्या निश्चयाचे स्वागत करून या प्रक्रियेमध्ये कृतिशील योगदान द्यावे" असे आवाहन त्यांनी नवी मुंबईकरांना केले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे जंगलाचे क्षेत्र झपाट्याने नष्ट होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक राज्यात किमान ३३% वनक्षेत्र असणे बंधनकारक असताना महाराष्ट्रात केवळ १९.४३ टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. महाराष्ट्रात शिल्लक असलेले हे वनक्षेत्र सर्वात जास्त आदिवासी भागातील आहे. आदिवासी बांधवांची ही कृती पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.



 


याबाबत पनवेल उप वनविभागाचे वनसंरक्षक संजय वाघमोडे यांनी धामोळेवासियांच्या या कृतीबाबत त्यांचा गौरव केला आहे. उप वनविभाग पनवेल व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह आणि महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त धामोळे गावास वनहक्क कायदा २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या सामुदायिक हक्क जमिनीवर वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना वाघमोडे (उप वनसंरक्षक, पनवेल) म्हणाले, "एखाद्या ठिकाणी वन्य जीवांचे अतित्व असणे हे त्या ठिकाणी जंगलाचे अस्तित्व शाबूत असल्याचे, माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये समतोल असल्याचे लक्षण असते. आजच्या काळात वन्यजीवांचा दिवसेंदिवस होत चाललेला ऱ्हास म्हणजेच जंगले नष्ट होण्याचा काळ आहे. माणूस आणि जंगल यांच्यातील नाते संपत चालल्याचे हे वेदनादायी सत्य आहे. एका बाजूला मोठमोठ्या इमारती निर्माणाची संस्कृती आणि दुसरीकडे निसर्गाला प्रमाण मानणारी आदिवासी समुदायाची संस्कृती आहे. आजच्या जंगल उद्धवस्तीकरणाच्या परिस्थितीमध्ये निसर्गाला मध्यवर्ती माणून निसर्गाचे रक्षण करणारी आदिवासी समुदायाची संस्कृती ही मानवी समुदाय आणि निसर्ग यांच्यातील समतोल अबाधित ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. आदिवासी समुदायाच्या संस्कृतीमध्ये जंगल आणि वन्यजीव यांना अमूल्य असे स्थान असल्याने सर्व वन्यजीव, जंगल, डोगर दऱ्या म्हणजेच पर्यायाने निसर्ग रक्षणाच्या मोहिमेमध्ये धामोळेकरांनी जंगल निर्माणचा जो निश्चय केला आहे तो स्वागतार्ह आहे".




 


याबाबत वातावरण फाऊंडेशनचे समन्वयक राहुल सावंत सांगतात, "जगभरातील 30% जैवविविधता ही आदिवासी समुदायामुळे टिकून आहे. जशी हवेशिवाय श्वासाची कल्पना करता येणे शक्य नाही तसेच आदिवासी समुदायाशिवाय जंगल, डोंगर, दऱ्या, जैवविविधतेची, शुद्ध हवा, निसर्गाचे अस्तित्व शाबूत राहण्याची कल्पना करता येणे शक्य नाही. जंगलांच्या अस्तित्वासाठी आदिवासी समुदायाचे अस्तित्व महत्वाचे आहे. त्यांचे अधिकार त्यांना बहाल करणे गरजेचे आहे. जंगला बरोबर सबंध पृथ्वी वाचवण्याच्या लढाईचे नेतृत्व आदिवासी समुदाय करू शकतो हे सत्य आपण सर्वांनी मान्य करायला हवे. धामोळेतील आदिवासी समुदायाला वनविभाग आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणेने केलेले सहकार्य मोलाचे आहे".

एका बाजूला जंगल तोडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. डोंगरावरील झाडे तोडून डोंगर पोखरून इमारती उभ्या करुन निसर्गाचे बेसुमार नुकसान करून नफा कमावला जात आहे. जंगले नष्ट होत असलेल्या काळात निसर्गाला हिरवा देव मानून त्याचे जतन करण्याचा त्याला पुन्हा उभा करण्याचा धामोळे येथील आदिवासी समुदायाने केलेला निर्धार हा नवी मुंबईतील वाढत्या प्रदूषणात श्वास घेण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक नवी मुंबईकरांसाठी मोकळा श्वास घेण्यासाठी आशेचा किरण आहे.

Tags:    

Similar News