आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांच्या मृत्यूनंतर मर्कटवाडीला मिळणार रस्ता

आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचे मृत्यू प्रकरण विधानसभेतही गाजले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन तातडीने आदिवासी भागातील मर्कटवाडीच्या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Update: 2022-08-27 15:18 GMT

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना दुसरीकडे एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जुळ्या बालकांना प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. हे प्रकरण मॅक्स महाराष्ट्राच्या वृत्तानंतर चर्चेत आले. तसेच हे प्रकरण विधानसभेतही गाजले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आदेश दिले. त्यानंतर ठाणे बांधकाम विभागाचे अधीक्षक विलास कांबळे यांनी रस्त्याची पाहणी केली घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटूंबांचे सांत्वन केले.

मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला रस्ता नसल्याने वंदना यशवंत बुधर या सात महिन्याच्या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या यावेळी कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला. आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली. तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या. तिची प्रसूती घरातच झाली. तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते. त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करणे आवश्यक होते. काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.

दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती. तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तिला अँबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेत गाभिर्याने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी 27तारखेला शनिवारी मर्कट वाडीला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी आठ दिवसात या रस्त्याची शासकीय प्रकिया पूर्ण करून 4 कोटी 15लाखाच्या कामाला मंजुरी दिली जाणार आहे. तसेच तीन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News