एक रुपयात नाश्ता आणि 10 रुपयात जेवण, तृतीयपंथींचा उपक्रम
1 रुपयात नाश्ता आणि 10 रुपयात पोटभर जेवण...हा कोणत्याही सरकारचा उपक्रम नाही तर काही तृतीयपंथींनी पुढाकार घेत हजारो लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. पाहा प्रसन्नजीत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट...
वाढत्या महागाईच्या काळात तुम्हाला १ रुपयात नाश्ता मिळाला आणि १० रुपयांत पोटभर जेवण मिळाले तर?...आणि हो हे दर शिवभोजन योजनेअंतर्गत नाहीयेत...तर हा उपक्रम राबवला आहे १५ तृतीयपंथींनी....कल्याणमध्ये ख्वाहीश फाऊंडेशनच्या मदतीने शेकडो गरिबांचे पोट भरण्याचे काम हे तृतीयपंथी करत आहेत...कोरोना संकटाच्या काळात सुरू झालेल्या शिवभोजन थाळ्यांचे स्टॉल्स अनेक ठिकाणी बंद पडले आहेत. पण कल्याणमध्ये गरिबांना या उपक्रमाचा फायदा होतो आहे.
शिवभोजन योजनेला राज्य सरकारतर्फे अनुदान आहे, पण तृतीयपंथींनी कोणत्याही अनुदानाशिवाय हा उपक्रम सुरू ठेवला आहे. दहा रुपयात जेवणामध्ये भात डाळ लोणचं भाजी आणि चपाती याचा समावेश आहे. त्याचबरोबर एक रुपयाच्या नाष्ट्यामध्ये कधी कांदे पोहे, शिरा, उपमा, तर कधी इडली या पदार्थांचा समावेश असतो. कोरोना काळात गरिबांचे, रस्त्यावर भिक मागून जगणाऱ्यांचे खूप हाल झाले. ते पाहिल्यानंतर या लोकांसाठी आपण काही केले पाहिजे, असे वाटल्याने हा उपक्रम सुरू केल्याचे ते सांगतात. यातील काही तृतीयपंथी हाऊसकीपिंग, रिसेप्शनिस्ट, जेवण वाढण्याचे काम करत असतात.पण आपल्या परिस्थितीचा विचार न करता जनसेवेचे व्रत घेतलेल्या या लोकांचे कौतुक होते आहे.
समाजाने कायम दूर सारलेल्या तृतीयपंथींनी आज समाजातील गरिबांसाठी दोनवेळच्या जेवणाची सोय करत आपणही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. आता तरी समाजाने या तृतीयपंथींची आणि त्यांच्या समाजसेवेची दखल घेण्याची गरज आहे.